shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

निकालासह शुभेच्छापत्रे आणि विविध प्रकल्पांचा अनमोल साठा विद्यार्थ्यांना प्रदान


 
श्रीरामपूर (शौकतभाई शेख) - तालुक्यातील उंबरगांव येथील जिल्हा परिषदेची मराठी माध्यमाची शाळा एक आगळी वेगळी शाळा असून या शाळेत विद्यार्थ्यांना नवनवीन उपक्रमास प्रोत्साहन दिले जात असल्याचे पाहून समाधान वाटले असल्याचे प्रतिपादन पढेगांव येथील सेजल उद्योग समूहाचे जितेंद्र तोरणे यांनी व्यक्त केले.

महाराष्ट्र दिनी एरव्ही ध्वजवंदन झाल्यानंतर विद्यार्थ्यांना निकाल वाटून सुट्टीचा आनंद घेण्यासाठी सर्वजण तयार असतात मात्र उंबरगांव येथील जिल्हा परिषदेची प्राथमिक शाळा ही मात्र यास अपवाद ठरली. येथील उपक्रमशील शिक्षक शकील बागवान यांच्या संकल्पनेतून इयत्ता सातवीच्या विद्यार्थ्यांना विशिष्ट कार्यक्रमाने निकाल देण्यात आला.पढेगांव येथील सेजल उद्योग समूहाचे प्रमुख जितेंद्र तोरणे प्रमुख पाहुणे म्हणून यावेळी उपस्थित होते.त्यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना पेढा भरवत निकालपत्रक सोबतच विद्यार्थ्यांनी संपूर्ण वर्षभर राबवलेले विविध प्रकल्पांची एकत्रित भेट बालपणाची आठवण रहावी म्हणून देण्यात आले.मात्र सर्व प्रकल्प सीलबंद पाकिटात देण्यात आले त्यासोबत शिक्षक शकील बागवान यांनी त्यांच्या संकल्पनेतून दिलेल्या शुभेच्छापत्र देण्यात आले.या सीलबंद पाकिटाचे वैशिष्ट्य म्हणजे विद्यार्थ्यांनी हे पाकीट शिक्षण पूर्ण झाल्यानंतर किंवा दहा वर्षानंतर उघडायचे आहे असा संकल्प करण्यात आला.

प्रारंभी श्रावणी राऊत,सार्थक गुंजाळ,अजिंक्य राऊत,यश काळे,प्रियांका मोरे,सागर गायकवाड यांनी आपल्या भाषणातून संपूर्ण वर्षभर शाळेत राबवलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली.विशेषत: शाळेतील पिठलं भाकर आणि बाल आनंद बाजार हे आम्ही कधीही विसरू शकणार नसल्याचे विद्यार्थ्यांनी यावेळी बोलुन दाखविले,गायत्री काळे व वैष्णवी काळे यांनी शाळेत राबवलेल्या दररोजच्या वर्तमानपत्राचे वाचनाने त्यांच्या जीवनात झालेल्या अमुलाग्र बदलाची माहिती दिली.त्यासाठी आमचे शिक्षक शकील बागवान यांनी मराठी,हिंदी आणि इंग्रजी वर्तमानपत्रे वेळोवेळी उपलब्ध करून दिल्याचेही म्हटले.

प्रमुख अतिथी जितेंद्र तोरणे यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करताना उंबरगांव शाळा ही एक गुणवत्तापूर्ण शाळा असून येथे विद्यार्थ्यांमध्ये भविष्यकाळात कोणत्याही अडथळ्यांना सामोरे जाण्याचे सामर्थ्य निर्माण केले जाते.या शाळेत राबविण्यात येणारे उपक्रम इंग्रजी माध्यमांच्या शाळांना लाजविणारे असेच आहेत. मराठी माध्यमांच्या शाळा या विद्यार्थ्यांना समृद्ध करतात, विद्यार्थ्यांनी केलेल्या आदरतिथ्य व  सादरीकरणाने आपण भारावून गेल्याची भावना तोरणे यांनी बोलून दाखवली.विद्यार्थ्यांनी स्वतःच्या अभ्यासात सातत्य ठेवावे व येणाऱ्या प्रत्येक अडचणीवर मात करून शिक्षण अखंडपणे चालू ठेवावे असे आवाहनही तोरणे यांनी केले.श्री शकील बागवान हे एक आदर्श व विद्यार्थ्यांसाठी दिशादर्शक शिक्षक ठरले आहेत असेही ते म्हणाले. यावेळी तोरणे यांनी सेजल उद्योग समूहाच्यावतीने शाळेस भेटवस्तू दिली.याप्रसंगी कार्यक्रमास मुख्याध्यापिका लताबाई पालवे,माजी सरपंच चिमाजी राऊत,शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सुनील काळे, अण्णासाहेब कांदळकर,मनोज पवार आदी उपस्थित होते.  सूत्रसंचालन श्रावणी राऊत तर आभार प्रदर्शन गायत्री काळे या विद्यार्थिनीने केले.
close