shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

मुंबई इंडियन्सचे आव्हान परतवून लावत सनरायझर्स हैद्राबादची धुगधुगी कायम !



          मंगळवारी मुंबईच्या वानखेडे स्टेडीयमवर मुंबई इंडियन्स व सनरायझर्स हैद्राबाद यांच्यात विद्यमान पर्वातला पासष्ठवा सामना खेळला गेला. प्रत्यक्ष सामन्याचा अंतिम निकाल लागेपर्यंत खेळाचे काटे सतत बदलत होते आणि अतिशय उत्कंठावर्धक झालेल्या सामन्यात सनरायझर्स हैद्राबादने स्पर्धेतील आव्हान आधीच संपलेल्या मुंबई इंडियन्सला अवघ्या तीन धावांनी हरवून आपली प्ले ऑफ मध्ये पोहोचण्याची धुगधुगी कायम ठेवली पण ती " जर तर " च्या गणितावर अवलंबून असेल.

          नाणेफेकीचा कौल मुंबईच्या बाजूने लागताच रोहित शर्माने हैद्राबादला प्रथम फलंदाजीस पाचारण केले. यावेळी विल्यमसन मधल्या फळीत खेळला तर त्याच्या ऐवजी प्रियम गर्ग सलामीस आला आणि त्याने हैद्राबादचे भाग्यच बदलवले. हैद्राबादने सहा बाद १९३ धावा केल्या. प्रत्युत्तरात मुंबई सात बाद १९० धावांपर्यंतच पोहोचू शकली. परिणामतः हैद्राबादचे प्ले ऑफमध्ये पोहोचण्याचे स्वप्न तूर्त तरी जिवंत राहीले आहे.
           या सत्रात आपला पहिलाच सामना खेळणाऱ्या प्रियम गर्गचा डावाच्या सहाव्या षटकात डॅनियल सॅम्सच्या गोलंदाजीवर संजय यादवने झेल सोडला. त्यावेळी प्रियम फक्त दहा धावांवर खेळत होता. याचा लाभ उठवत त्याने २६ चेंडूत ४२ धावा ठोकल्या शिवाय राहुल त्रिपाठीसह ७८ धावांची भागीदारी करून हैद्राबादला मजबूती दिली.
           तिसऱ्या क्रमांकावर खेळून राहुल त्रिपाठीने पुन्हा एकदा आपली उपयुक्तता सिध्द करताना स्वतः ४४ चेंडूत ७६ धावा ठोकल्याच शिवाय गर्ग व पूरनसह प्रत्येकी ७८ व ७६ धावांची भागीदारी करून सनरायझर्सचा सुर्यास्त होणार नाही याची दखल घेतली.
           प्रियम गर्ग, राहुल त्रिपाठी व निकोलस पूरन यांच्या चांगल्या कामगिरीला सोनेरी मुलामा लावण्यात एडेन मार्करम, कर्णधार केन विल्यमसन व वॉशिंगटन सुंदर कमी पडल्याने हैद्राबादची फुगू शकणारी धावसंख्या मर्यादित राहिली.
         मुंबई इंडियन्सचा नवोदित अष्टपैलू खेळाडू रमणदिप सिंगने तीन षटकात वीस धावा देऊन प्रियम गर्ग, राहुल त्रिपाठी व मार्करम या तिघांना महत्वाच्या क्षणी बाद करून स्वतःची छाप सोडली व मुंबईला लढण्यास बळ दिले.
         मुंबईचा कर्णधार रोहीत शर्मा (४८ धावा ) व ईशान किशन (४३ धावा ) यांनी ९५ धावांची सलामी देऊन मजबूत सुरुवात केली. मात्र या दोघांचे पाठोपाठ बाद होणे मुंबईसाठी घातक सिध्द झाले.
         तिसऱ्या क्रमांकावर प्रमोशन मिळालेला डॅनिएल सॅम्स अपयशी ठरला. तर मुंबईची या सत्रातील कमाई असलेला तिलक वर्मा अपेक्षा पूर्ण करू न शकल्याने मुंबईच्या अडचणीत वाढच झाली. एरव्ही तिलक वर्माने सुर्यकुमार यादवच्या गैरहजेरीत संघाची धुरा जवळ जवळ एकहातीच वाहीली आहे.
         किरॉन पोलॉर्डचा सक्षम पर्याय ठरताना टिम डेव्हीडने १८ चेंडूत वादळी ४६ धावा अक्षरशः बदडल्या. मात्र तो निर्णायक क्षणी धावबाद झाला आणि शेवटच्या दोन षटकात १९ धावा तळाचे फलंदाज काढू न शकल्याने मुंबईला पराभवापासून कोणी रोखू शकले नाही.
          भुवनेश्वर कुमारने टाकलेले मुंबईच्या डावातील १९ वे षटक खऱ्या अर्थाने सामन्याचा निकाल बदलून गेले. हे षटक निर्धाव टाकताना भुवनेश्वरने एक बळीही मिळविला आणि शेवटच्या षटकात मुबंईला केवळ पंधरा धावाच काढता आल्याने हैद्राबाद जिंकले.
           हैद्राबादचा कर्णधार विल्यमसने फलंदाजीचा क्रम जरी बदलल असला तरी नशिब काही बदलू शकले नाही व सात चेंडूत केवळ आठ धावा काढून तो नाबाद परतला. तर मुंबईचा कर्णधार रोहीत शर्माची बॅट यावेळी ३६ चेंडूत ४८ धावा काढून तळपली. मात्र त्याला संघाला विजय काही मिळवून देता आला नाही.
           मुंबई यंदा तळालाच राहाणार हे जवळ जवळ निश्चित असले तरी  सनरायझर्स हैद्राबादचा सुर्य अजूनही थोडासा लुकलुकत असून पुढच्या सामन्यात मोठा विजय व इतर संघांचे समिकरण त्यांच्या बाजूने जुळल्यास कदाचित ते प्ले ऑफ मध्ये खेळताना आपल्याला दिसू शकतील. मात्र हे सारं "जर तरचं" गणित असून खरं बघायला गेलं तर हैद्राबादसाठी हे सत्र संपल्यासारखंच आहे.

लेखक -
डॉ.दत्ता विघावे
क्रिकेट समिक्षक. 
इंटर नॅशनल मेंबर ऑफ वर्ल्ड पार्लमेंट,
मेंबर ऑफ युनायटेड नेशन्स ग्लोबल टॅलेंट पुल,
प्रतिनिधी भारत. 
Email:  dattavighave@gmail.com
close