shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

आयपीएल २०२२ मधील काही रोचक विक्रम...!


           
           आयपीएलच्या पंधरावे सत्र ऐन मध्यावर आले असून आता प्लेऑफमध्ये पोहोचणाऱ्या संघाचे चित्र स्पष्ट व्हायला सुरुवात झाली असून सर्वाधिक वेळचा विजेता मुंबई इंडियन्स संघ आठ पराभव व केवळ एकच विजय खात्यात जमा असल्याने प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद झाला असून स्पर्धेच्या नियमानुसार त्यांना उर्वरीत सामने खेळण्याची औपचारीकता पूर्ण करावी लागणार आहे.

           राजस्थान रॉयल्स या सत्रात चमकदार कामगिरी करत असून पहिल्या चार संघात आपले स्थान टिकवून आहे.  सर्वाधिक धावांसाठी असलेली ऑरेंज कॅप व सर्वाधिक बळींसाठी असलेली पर्पल कॅप राजस्थानच्याच खेळाडूंकडे आहे. राजस्थानचा सलामीवीर जोश बटलर ५६७ धावा बनवून आघाडीवर असून सर्वात जास्त तीन शतकेही त्याच्या बॅटमधून निघाले आहेत. तर यजुवेंद्र चहलने या सत्रातील एकमेव हॅट्रीक घेतली असून एकोणावीस बळींसह तो आघाडीवर आहे.
           या सत्रात वेगवान चेंडू फेकण्यात सन रायझर्स हैद्राबादचा उमरान मलिक सर्वात पुढे असून दर सामन्यागणिक त्याच्या गोलंदाजीत धार येत असून बळीही तितक्याच वेगाने घेत आहे. एक मे रोजी पुण्यात झालेल्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जविरूध्द त्याने चक्क ताशी १५४ किलोमिटर वेगाने चेंडू फेकून या सत्रातला सर्वात वेगवान गोलंदाज बनण्याचा मान मिळविला.
            उमरानने चेन्नईच्या डावातील दहावे षटक फेकताना दुसऱ्या चेंडूवर ऋतूराज गायकवाडला ताशी १५४ किलोमिटर वेगाचा चेंडू फेकून विक्रम केेला. परंतु त्याच्या दुर्देवाने फलंदाज बाद न होता त्यानेेे चक्क चौकार ठोकला. याशिवाय चालू सत्रात त्याच्याशिवाय १५३.९ कि. मी मारा करण्याचा करिश्मा केवळ गुजरात टायटन्सच्या लॉकी फर्ग्यूसन यानेच केला आहे. खाली बघितले तर हे आपल्या लक्षात येईलच.
उमरान मलिक :   १५४.० कि.मी
लॉकी फर्ग्यूसन :  १५३.९ कि.मी
उमरान मलिक :  १५३.३ कि.मी 
उमरान मलिक :  १५३.१ कि.मी
उमरान मलिक :  १५२.९ कि.मी  
            याच सामन्यात मुळचा पुण्याचाच असलेल्या ऋतूराज गायकवाडने घरच्या मैदानावर आपला दुसरा सलामीचा जोडीदार न्यूझिलंडच्या डेव्हॉन कॉनवेसह विक्रमी १८३ धावांची भागीदारी केली असता वैयक्तीक ९९ धावांवर नटराजनच्या चेंडूवर बाद झाला. या खेळीत त्याने ५७ चेंडूंचा सामना करताना सहा चौकार व सहा षटकार ठोकले होते. आयपीएलच्या इतिहासात नर्वस नाईनटीजचा शिकार ठरणारा तो पाचवा फलंदाज ठरला. यापूर्वी सन २०१३ मध्ये विराट कोहली दिल्लीविरूध्द. सन २०१९ मध्ये पृथ्वी शॉ केकेआर विरुद्ध. सन २०२० मध्ये ख्रिस गेल राजस्थान रॉयल्सविरूध्द. तर सन २०२० मध्येच आरसीबीविरूध्द ईशान किशन ९९ धावांवर बाद झाला होता.
            १ मे रोजी दिल्ली कॅपिटल्स विरूध्द लखनौ सुपर जायंटसचा कर्णधार व सलामी केएल राहुलनेे ५१ चेंडूत झंझावाती ७७ धावा ठोकल्या त्यामध्ये पाच षटकारांचा समावेश होता. पाचवा षटकार मारताच सर्वात कमी डावात १५० षटकार मारणारा तो तिसरा फलंदाज बनला. या यादीत पहिल्या क्रमांकावर आहे तो युनिव्हर्सल बॉस ख्रिस गेल. दुसऱ्या क्रमांकावर आहे आंद्रे रसेल. त्याने ७२ डावात हि कामगिरी केली. तिसऱ्या क्रमांकावर अर्थातच केएल राहुल, चौथ्या क्रमांकावर डेव्हीड वॉर्नर आहे. त्याला यासाठी १०९ डावात हि करामत केली तर आश्चर्याची बाब म्हणजे थ्री सिक्सटी डिग्री फेम एबी डिव्हीलर्स पाचव्या स्थानावर असून १५० षटकार ठोकण्यास त्याला सर्वाधिक १११ सामने लागले.
          या सत्रात ४५१ धावा करून राहुल दुसऱ्या क्रमांकावर असून सर्वाधिक षटकार मारणाऱ्यात तो तिसऱ्या क्रमांकावर आहे. त्याने आतापर्यंत वीस षटकार ठोकले असून प्रथम क्रमांकावर ३० षटकारांसह जोश बटलर आघाडीवर आहे तर २२ षटकारांसह आंद्रे रसेल दुसऱ्या स्थानावर आहे.
लेखक : -  
डॉ.दत्ता विघावे
क्रिकेट समिक्षक. 
इंटर नॅशनल मेंबर ऑफ वर्ल्ड पार्लमेंट,
मेंबर ऑफ युनायटेड नेशन्स ग्लोबल टॅलेंट पुल,
प्रतिनिधी भारत. 
Email:  dattavighave@gmail.com
close