श्रीरामपूर (शौकतभाई शेख):- कविता हे भावमनाचे आणि कालमनाचे स्पन्दन असते. कोविड १९ ने मानवी जीवनात भूकंप निर्माण केला, जगावं की मरावं? ह्या प्रश्नाने माणूस अगतिक झाला. अशा अगतिक जाणिवेची कविता ही २०२० २०२१ काळातील डॉ.बाबुराव उपाध्ये लिखित 'लॉकडाऊनच्या कविता 'म्हणजे मानवी जगण्याचा एक कोलाहल असल्याचे मत संमोहनतज्ञ, साहित्यिक डॉ. रामकृष्ण जगताप यांनी व्यक्त केले.
येथील वाचन संस्कृती प्रतिष्ठानतर्फे बेलापूर रोडवरील काळे रसवंती गृह परिसरात आयोजित 'लॉकडाऊन कविता 'चा परिसंवादप्रसंगी डॉ. रामकृष्ण जगताप बोलत होते. अध्यक्षस्थानी महाराष्ट्र संपादक परिषदेचे कार्याध्यक्ष पत्रकार प्रकाश कुलथे होते. डॉ. बाबुराव उपाध्ये यांनी 'लॉकडाऊन कविता 'आणि त्यातील आशयविश्व विशद केले. यावेळी डॉ. रामकृष्ण जगताप आणि सौ. उज्ज्वलाताई जगताप यांचे शैक्षणिक, साहित्यिक योगदान तसेच त्यांच्या २६ व्या विवाह आनंददिनानिमित्त सन्मान करण्यात आला.
सूरज रामकृष्ण जगताप यांनी इंजिनिअरिंग पदवी प्राप्त केली. पुणे येथे त्यांना कंपनीत उच्चपदी नोकरी मिळाली,तसेच कु.भक्ती रामकृष्ण जगताप यांचे वैद्यकीय क्षेत्रातील शिक्षणाबद्दल सत्कार करण्यात आले.सौ.आरती गणेशानंद उपाध्ये यांचे आधुनिक केक निर्मिती,मेहंदी कलेतील प्राविण्य याबद्दल त्यांच्या २९ व्या वाढदिवसाचे औचित्य साधून सत्कार करण्यात आला.याप्रसंगी डॉ. शिवाजी काळे, सौ. मोहिनी काळे, सुयश काळे यांनी साहित्य प्रबोधन मंच आणि आसरा प्रकाशनतर्फे,कवी प्रा.पोपटराव पटारे, सौ. सुनीताताई पटारे,सौ. अंजली पटारे, कु.श्रेयल पटारे यांनी साहित्य परिवार टाकळीभानतर्फे, सौ.स्नेहलता कुलथे, स्वामीराज कुलथे, श्रद्धा कुलथे,नील कुलथे यांनी स्नेहप्रकाश प्रकाशनतर्फे, अशोकराव कटारे, सौ. संगीता कटारे,सौ. मंदाकिनी उपाध्ये, गणेशानंद उपाध्ये, निर्मिक उपाध्ये, तेजस संजय उपाध्ये आदिंनी सत्कार्थींचा सन्मान करून शुभेच्छा दिल्या.
डॉ. उपाध्ये यांच्या 'लॉकडाऊन कविता 'परिसंवादात भाग घेऊन चर्चा केली.अध्यक्ष मनोगतात पत्रकार प्रकाश कुलथे यांनी सांगितले की, मानवी संस्कृती ही आनंद, समाधान यातून गतिशील राहिली पाहिजे, डॉ. जगताप परिवार, उपाध्ये परिवार यांच्या सत्कार्याचा हा सत्कार आहे. कोरोनाच्या महामारीतून आपण आरोग्य आणि संस्कृती जपली तरच पुढचे जीवन सुखाचे होईल हा संदेश देणारा डॉ. उपाध्ये यांचा कवितासंग्रह दिशादर्शक असल्याचे मत व्यक्त केले. गणेशानंद उपाध्ये यांनी आभार मानले.

