shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

राहुरीच्या तरूणाने जिल्हा न्यायालयाच्या आवारात घेतले पेटून..!!

शिर्डी एक्स्प्रेस लाईव्ह वृत्तसेवा अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी- दिपक हरिश्चंद्रे. 
 गुरुवार दिनांक १९ मे २०२२

राहुरीच्या तरूणाने जिल्हा न्यायालयाच्या आवारात घेतले पेटून..!!
ऋषिकेश सुमारे 75 टक्के भाजला || पुढील उपचारासाठी पुण्याला हलविले..!!

अहमदनगर : विनयभंगाचा गुन्हा दाखल झाल्याने समाजात बदनामी झाली. त्यातून मानसिक त्रास झाल्याने राहुरी तालुक्यातील युवकाने येथील जिल्हा न्यायालयाच्या आवारात स्वतःला पेटवून घेत आत्महत्येचा प्रयत्न केला. ऋषिकेश विठ्ठल डव्हाण (वय 18, रा. बाभुळगाव, ता. राहुरी) असे पेटवून घेतलेल्या युवकाचे नाव आहे. बुधवारी सकाळी 11 वाजेच्या सुमारास ही घटना घडली.

दरम्यान, पेटून घेतल्यामुळे ऋषिकेश सुमारे 75 टक्के भाजला असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली. त्याच्यावर जिल्हा शासकीय रुग्णालयात प्राथमिक उपचार करण्यात आले असून पुढील उपचारासाठी त्याला पुणे येथील ससून रुग्णालयात हलविण्यात आले आहे.

दरम्यान न्यायालय आवारात अचानक येऊन आत्महत्येचा प्रयत्न करणार्‍या ऋषिकेश डव्हाण याच्याविरूध्द भादंवि कलम 309 प्रमाणे भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात बुधवारी रात्री गुन्हा दाखल झाला आहे. पोलीस अंमलदार सचिन डमाळे यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे. 14 मे, 2022 रोजी राहुरी तालुक्यातील बाभुळगाव येथे दोन गटांत वाद झाले होते. याप्रकरणी 15 मे, 2022 रोजी राहुरी पोलीस ठाण्यात परस्परविरोधी फिर्यादी दाखल आहेत.


एका 34 वर्षीय महिलेने दिलेल्याफिर्यादीवरून ऋषिकेशसह तिघांविरूध्द विनयभंग, मारहाण आदी कलमान्वये गुन्हा दाखल आहे. तर हनुमान पिल्लाजी डव्हाण यांच्या फिर्यादीवरून दुसर्‍या गटाच्या सहा जणांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान ऋषिकेश डव्हाण या युवकावर विनयभंगाचा गुन्हा दाखल झाल्यानंतर त्याची समाजात बदनामी झाली. त्याला मानसिक त्रास झाला असल्याने त्याने बुधवारी सकाळी दुचाकीवरून अहमदनगर गाठले. येथील जिल्हा न्यायालयाचा आवारात सकाळी 11 वाजेच्या सुमारास प्रवेश केला. दुचाकी वाहन तळावर पार्किंग केली. त्यावेळी जिल्हा न्यायलयाचे दैनिक कामकाज सुरू झाले होते. खोटा गुन्हा दाखल केल्याचा आरोप ऋषिकेशने केला. गुन्ह दाखल झाल्याचा राग त्याच्या डोक्यात होता. माहिती घेण्याच्या उद्देशाने तो न्यायालयात आला असल्याचे त्याने दिलेल्या जबाबात म्हटले आहे. त्याने पार्किंग केलेल्या स्वत: च्या दुचाकीतून बाटलीमध्ये पेट्रोल काढले. पेट्रोल स्वत: च्या अंगावर ओतून घेतले. खिशातील आगपेटी काढून स्वत:ला पेटून घेतले.

दरम्यान युवकाने पेटून घेतल्याचे कळताच एकच धावपळ उडाली. पेटलेल्या युवकाला माती टाकून विझविण्याचा प्रयत्न केला. तो 75 टक्के भाजला गेला असल्याची माहिती डॉक्टारांनी दिली. युवक पेटल्याची माहिती मिळताच न्यायालय परिसरात बंदोबस्तावर असलेले पोलीस, भिंगार कॅम्प, कोतवाली यांच्यासह स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. जिल्हा शासकीय रूग्णालयातून रूग्णवाहिका मागविण्यात आली. ऋषिकेशला जिल्हा शासकीय रूग्णालयात दाखल करण्यात आले. त्याच्यावर तेथे प्राथमिक उपचार करून त्याला पुढील उपचारासाठी पुणे येथील ससून रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

घटनेची माहिती मिळताच अप्पर पोलीस अधीक्षक सौरभ अग्रवाल, अहमदनगर शहर विभागाचे पोलीस उपअधीक्षक अनिल कातकडे, भिंगार कॅम्पचे सहायक पोलीस निरीक्षक शिशिरकुमार देशमुख, तोफखाना पोलीस ठाण्याच्या पोलीस उपनिरीक्षक प्रियांका आठरे यांनी घटनास्थळी भेट दिली.
 
जखमी ऋषिकेशचा जबाब भिंगार कॅम्प पोलिसांनी नोंदविला. वादातून खोटा गुन्हा दाखल झाल्यामुळे समाजात बदनामी झाली. मानसिक त्रास असाह्या झाल्यामुळे जिल्हा न्यायालयात आलो. दुचाकीतील पेट्रोल काढून घेत ते अंगावर ओतले व खिशातील आगपेटीने काडी लावली. महिलेने खोटा गुन्हा दाखल केला असल्याचा आरोप ऋषिकेशने दिलेल्या जबाबात करण्यात आला आहे.

उपअधीक्षकांची तत्परता....

सकाळच्या वेळीच जिल्हा न्यायालयाच्या आवारात युवकाने पेटून आत्महत्येचा प्रयत्न केल्याची माहिती अहमदनगर शहर विभागाचे पोलीस उपअधीक्षक अनिल कातकडे यांना मिळताच त्यांनी जिल्हा शासकीय रूग्णालयात धाव घेतली. त्यांनी युवकाच्या उपचाराबाबत डॉक्टरांशी चर्चा करून युवकाचा जबाब नोंदविला. त्याला पुढील उपचारासाठी पुणे येथे हलविण्यासाठी रूग्णवाहिका उपलब्ध करून दिली.
 
...म्हणून घेतला टोकाचा निर्णय.....

14 मे, 2022 रोजी एका महिलेने दिलेल्या फिर्यादीवरून राहुरी पोलीस ठाण्यात ऋषिकेश डव्हाण याच्यासह तिघांविरूध्द विनयभंग, मारहाण आदी कलमान्वये गुन्हा दाखल आहे. ऋषिकेशचे शिक्षण सुरू आहे. तो सैन्य दलात भरती होण्यासाठी प्रयत्न करत आहे. गुन्हा दाखल झाल्याने सैन्य दलात भरती होण्यासाठी अडचण निर्माण झाली आहे. यामुळे ऋषिकेश मानसिक तणावात होता. समाजात झालेली बदनामी, शिक्षणात आलेली अडचण यामुळे ऋषिकेशने पेटवून घेतले असल्याची माहिती त्याच्या नातेवाईकांनी दिली.

Shirdi Express Live🎥#करीता बातम्या📰🗞️ आणि जाहिराती 🖼️साठी संपर्क @दिपक हरिश्चंद्रे (अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी )📲7350591600


close