shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

सनरायझर्स हैद्राबादचा प्रवास उलट दिशेने सुरू ?



          आयपीएलच्या पंधराव्या सत्राची सुरुवात सलग दोन पराभवाने करणाऱ्या सनरायझर्स हैद्राबादने नंतर सलग पाच विजय मिळवून गुणतालिकेत पहिल्या चार संघात स्थान मिळविले. त्यावेळी वाटले होते की हैद्राबादचा पुढचा प्रवास अतिशय सुलभ असेल, मात्र झाले भलतेच. नंतरचे तिन सलग सामने हरल्याने सनरायझर्स हैद्राबादची चक्क सहाव्या स्थानावर गच्छंती झाली. आयपीएलचे चालू सत्र सध्या अंतिम टप्प्याकडे कूच करत असताना पिछाडीवर असलेल्या संघांनी आपले गियर बदलून जोमात खेळ सुरू केला आहे व पहिल्या चार संघात पोहोचण्यासाठी प्रयत्नांची पराकष्टा करत असताना सनरायझर्स हैद्राबादची खालच्या दिशेने होत असलेली घसरण बघून त्यांचे चाहते निश्चितच चिंताग्रस्त झाले असतील.

    गुरुवारी पाच मे रोजी दिल्ली कॅपिटल्स व सनराइजर्स हैद्राबाद यांच्यात एक मोठया धावसंख्येचा सामना झाला. नाणेफेक जिंकण्यात नाशिबवान असलेला सनराइजर्सचा कर्णधार केन विल्यमसन आज पुन्हा नाणेफेक जिंकण्यात यशस्वी ठरला, मात्र सामन्याचा निकाल त्याच्या बाजूने काही लागला नाही व २१ धावांनी त्यांचा पराभव झाला. दिल्लीने ३ बाद २०७ अशी मोठी धावसंख्या रचून हैद्राबादला ८ बाद १८६ असे रोखले व पाचव्या स्थानावरून हैद्राबादची गच्छंती करून सहाव्या स्थानी ढकलून स्वतः प्लेऑफ च्या दिशेने कूच केली.

          दिल्लीने विजय प्राप्त केलेल्या या सामन्याला निर्णायक वळण देणाऱ्या काही ठळण घटनांकडे आपण प्रकाशझोत टाकूया.
         सनरायझर्सने स्वतःच्या पायावर स्वतःच धोंडा पाडून घेतला. त्याचं प्रमुख उदाहरण म्हणजे दिल्लीचा तडाखेबाज पलंदाज रोवमन पॉवेलचे तब्बल तीन झेल त्यांनी सोडले. पॉवेल पंधरा धावांवर खेळत असताना चौदाव्या षटकात सिन अबॉटच्या गोलंदाजीवर कार्तिक त्यागीने त्याचा सोपा झेल सोडला. त्यानंतर पंधराव्या षटकात उमरान मलिकच्या चेंडूवर स्वतः कर्णधार केन विल्यमसनने पॉवेलचा झेल धरणीला अर्पण केला. शेवटी अठराव्या षटकात कार्तिक त्यागीच्या गोलंदाजीवर एडन मार्करमला कुठे उभे राहायचे याचे भानच न राहील्याने सरळ हाती येऊ शकणारा चेंडू त्याला गुंगारा देऊन षटकारासाठी सिमेरेषेपार गेला. या सर्व जीवदानांचा लाभ घेत पॉवेलने ३५ चेंडूत नाबाद ६७ धावा ठोकल्या. पुढे जात त्याच निर्णायक सिध्द झाल्या.
          विजयासाठी २०८ धावांचे महाकाय आव्हान समोर असताना सुरुवात चांगली होणे हैद्राबादसाठी गरजेचे असताना सलामीवीर अभिषेक शर्मा सात तर कर्णधार विल्यमसन अकरा चेंडूत फक्त चार धावा काढून बाद झाले. या धक्क्यातून हैद्राबाद शेवट पर्यंत सावरलेच नाही.

           दोन्ही संघांच्या कामगिरीवर नजर टाकली तर दिल्लीचा कर्णधार रिषभ पंत विल्यमसनपेक्षा किती तरी पट सरस ठरला. पंतने सोळा चेंडूत झटपट २६ धावा चोपल्या. शिवाय दिल्लीचे क्षेत्ररक्षण सुरू असताना प्रत्येक गोलंदाजाला योग्य वेळी गोलंदाजी दिली, क्षेत्ररक्षण चाणाक्षपणे लावले. अगदी त्या उलट परिस्थिती विल्यमसनची होती. संघाला गरज असताना त्याने धावा काढल्या तर नाहीच शिवाय क्षेत्ररक्षण करताना स्वतःच झेल सोडून संघाचे मनोधैर्य खाली केले. शिवाय वॉर्नर व पॉवेल हैद्राबादच्या गोलंदाजीवर तुटून पडले असताना त्याला गोलंदाजांचा क्रमही ठरविता येत नव्हता.

          सन २०१६ मध्ये सनरायझर्सला आपल्या नेतृत्वात आयपीएलचे विजेतेपद मिळवून देणाऱ्या डेव्हीड वॉर्नरला हैद्राबाद मॅनेजमेंटने मागच्या सत्रात अतिशय वाईट वागणूक दिली. प्रथम कर्णधार पदावरून हटविले, नंतर संघातून काढले व रिटेन न करता थेट संघाबाहेर घालविले. त्यानंतर मेगा ऑक्शनमध्ये दिल्लीने त्याला खरेदी केली. या सत्रात वॉर्नरची बॅट चांगलीच तळपत असताना गुरूवारी त्याने आपल्या जुन्या संघावर चांगलाच राग उतरविला. ब्यान्नव धावांची आक्रमक खेळी करून हैद्राबाद मॅनेजमेंटला चांगलीच सबक शिकवली. त्याच्याशिवाय रिषभ पंत व रोवमन पॉवेल फलंदाजीत चांगलेच तळपले. तर खलील अहमद
 (३० धावात ३ बळी) गोलंदाजीत चांगलाच चमकला.

           पृथ्वी शॉऐवजी संघात आलेला मनदिप सिंग, अष्टपैलू मिचेल मार्श अपयशी ठरले. तर गोलंदाजी तशार्दुल ठाकुर, एनरिच नॉर्कीया, मिचेल मार्श व कुलदीप यादवने बळी मिळविले खरे परंतु धावा मात्र भरपूर दिल्या या गोष्टी दिल्लीसाठी विचार करायला लावणाऱ्या होत्या व पुढे त्यांना या चुकांकडे बारकाईने लक्ष द्यावे लागेल.
          
            सनरायझर्स कडून गोलंदाजी भुवनेश्वर कुमार सोडून सर्वांनीच मार खाल्ला. उमरान मलिकने १५६.९ ताशी किलोमिटर वेगाने आयपीएल मधील सर्वात वेगवान चेंडू फेकला एवढीच काय ती त्याच्यासाठी समाधानाची बाब ठरली. फलंदाजी मार्करम ४२ व निकोलस पूरन ६२ हे दोघेच चमकले. बाकी सर्व अलबेलच म्हणावं लागेल.
             सलग तीन पराभवाने सनराइजर्सला बॅकफूटवर जरी आणले असले तरी त्यांचे अजून चार साखळी सामने बाकी आहेत. त्यातील नेत्रदिपक कामगिरी त्यांच्यासाठी प्लेऑफचे दरवाजे उघडू शकते. त्यासाठी सर्वप्रथम कर्णधाराने सकारात्मक होणे गरजेचे आहे.
लेखक : -  
डॉ.दत्ता विघावे
क्रिकेट समिक्षक. 
इंटर नॅशनल मेंबर ऑफ वर्ल्ड पार्लमेंट,
मेंबर ऑफ युनायटेड नेशन्स ग्लोबल टॅलेंट पुल,
प्रतिनिधी भारत. 
Email:  dattavighave@gmail.com
close