श्रीरामपूर (शौकतभाई शेख) - संशोधन ही नव्या युगाची हाक आहे. हे संशोधन करताना कालखंड आणि लेखकाचे योगदान हे अभ्यासकाला दिशादर्शक ठरतात, अशा मराठी भाषेच्या संशोधनाला गुणवत्तासंपन्न बनविणारे अहमदनगर येथील पेमराज सारडा महाविद्यालयातील मराठी संशोधन केंद्र हे सर्वोत्तम उपक्रमशील केंद्र असल्याचे मत वाचन संस्कृती प्रतिष्ठानचे संस्थापक, अध्यक्ष डॉ. बाबुराव उपाध्ये यांनी व्यक्त केले.
श्रीरामपूर येथील साहित्यिक, पीएच.डी. मार्गदर्शक डॉ. बाबुराव उपाध्ये यांचे अहमदनगर येथील पेमराज सारडा महाविद्यालयातील मराठी संशोधन केंद्रातर्फे पीएच. डी. मराठी कोर्सवर्क ०२ ते ३१ मे २०२२ या कालावधीत आयोजित करण्यात आला आहे,या कोर्सवर्कमध्ये डॉ. उपाध्ये यांचे 'कालखंडाचा आणि लेखकाचा अभ्यास 'या विषयावर व्याख्यान संपन्न झाले, त्याप्रसंगी ते बोलत होते.अध्यक्षस्थानी मराठी संशोधन केंद्र समनव्यक मराठी विभाग प्रमुख प्रो.डॉ. माहेश्वरी गावित होत्या.त्यांनी डॉ. उपाध्ये यांना सन्मानचिन्ह देऊन स्वागत केले. रुपाली ढमढेरे यांनी परिचय करून दिला. यावेळी डॉ. उपाध्ये यांनी 'भारतीय कुंभार समाजातील संत 'हे पुस्तक सर्व ५० विद्यार्थ्यांना सस्नेह भेट दिले आणि प्रो.डॉ. गावित यांना विविध पुस्तके देऊन ह्या उपयुक्त कोर्सबद्दल गौरवोद्गार काढले.
डॉ. बाबुराव उपाध्ये यांनी आपल्या तीन तासांच्या व्याख्यानातून 'वाड्मयीन कालखंड आणि विशेष लेखकाचा अभ्यास 'विविध संदर्भ, तत्वे आणि पार्श्वभूमी यांचा आढावा घेत विस्ताराने समजून सांगितला.प्राचीन, मध्ययुगीन, आधुनिक कालखंडाची वैशिष्ठ्यसह चर्चा केली. मौर्यकालपासून ते संत, पंत, तंत साहित्य आणि अर्वाचीन युगप्रवर्तक लेखकांचा परिचय करून दिला. मुक्तेश्वरी महाभारताची आदी,सभा, वन, विराट आणि सौप्तिकपर्व यांचा आढावा घेतला, पु. ल. देशपांडे, डॉ. आनंद यादव, डॉ. द. ता. भोसले, कविवर्य नामदेव ढसाळ, आचार्य अत्रे, हरिभाऊ आपटे इत्यादी लेखकांच्या व्यक्ती आणि वाङमयाचा परिचय करून दिला. लेखक हे त्या त्या कालखंडाचे भाष्यकार असतात,त्या युगाचे साक्षीदार असतात. आजच्या विद्यार्थ्यांनी या विषयाला प्राधान्य दिले तर मराठीची शक्तीस्थळे आणि लेखन गुणवत्ता लक्षात येईल.
अभिजात मराठीचा दर्जा स्पष्ट होईल असे सांगून प्रो. डॉ. माहेश्वरी गावित यांनी मराठी भाषा संशोधनासाठी घेत असलेल्या परिश्रमाचे कौतुक केले.अभ्यासक विद्यार्थी कवी, प्रा.संदीप काळे यांनी 'भारतीय कुंभार समाजातील संत 'हे संशोधन वाटेवरचे उपयुक्त पुस्तक सर्वांना भेट दिल्याबद्दल डॉ. उपाध्ये यांच्या वाचन संस्कृती चळवळ आणि जीवन कार्याबद्दल मनोगत व्यक्त केले.प्रा.संतराम साबळे, प्रा.शीलवंत वाढवे, प्रा.संदीप काळे, रचना, संगीता फासाटे, प्रा.पाटील, प्रा.दरोडे इत्यादींनी प्रश्न विचारून साहित्यिक चर्चा केली. कवयित्री संगीता फासाटे यांनी आभार मानले


