प्रकाश मुंडे | बीड जिल्हा प्रतिनिधि :-
केज शहरातील अंतर्गत अहमदपूर-अहमदनगर व खामगाव-पंढरपूर या दोन महामार्गांचे काम गेली तीन वर्षांपासून सुरू आहे. हे काम तात्काळ पूर्ण व्हावे यासाठी केज विकास संघर्ष समितीने सतत आंदोलने करून पाठपुरावा केला आहे. आंदोलन करताच कंपनीद्वारा तेवढ्यापुरते थोडके काम करून पुन्हा ते काम बंद ठेवले जाते. मात्र अद्याप एचपीएम व मेगा कंपनीने आपली कामे पूर्ण केली नाहीत. रेंगाळलेल्या व निकृष्ट कामामुळे शहरातील पाच युवकांना आपला जीव गमवावा लागला असून वेगवेगळ्या छोट्या मोठया अपघातात अनेक जण जखमी झाले आहेत. या रस्त्याची सर्व रखडलेली कामे येत्या 20 जून पूर्वी सुरू करून पूर्णत्वाकडे न नेल्यास 21 जून रोजी सकाळी 11 वाजता केजडी नदी पुलावर जनतेच्या सहभागाने बेमुदत रस्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा समितीच्या वतीने हनुमंत भोसले यांनी दिला आहे.
केज शहरातील महामार्गाच्या कामाची समस्या गेली तीन वर्षांपासून रेंगाळत सुरू आहे. यासाठी केज विकास संघर्ष समिती सतत पाठपुरावा करत आहे. रखडत चाललेल्या कामामुळे होणाऱ्या अपघातात नागरिकांचे बळी जात आहेत, कित्येक जखमी झाले आहेत तर बहुतांशी नागरिकांचे धुळीमुळे व खड्यामुळे आरोग्य धोक्यात आले आहे. विशेष म्हणजे शहर अंतर्गत भागातच या दोन्ही कंपन्या आपली कामे पूर्ण का करत नाहीत हाच मोठा प्रश्न आहे. या विलंबामुळे शहरातील दोन्ही चौकांचे नव्याने बांधणी, सुशोभीकरण, दोन्ही महामार्गावर पथदिवे व नियम व अटीनुसार कंपन्यांनी करावयाचे वृक्षारोपण इत्यादी कामे खोळंबली आहेत.
केज तालुका हद्दीत असणारा मांजरा नदी लगतचा खराब रस्ता मुख्य पूल वाहतुकीस उपलब्ध होईपर्यंत सुस्थितीत करणे गरजेचे आहे. साने गुरुजी निवासी विद्यालय (धारूर रोड) जवळचा पूल, उपजिल्ह्या रुग्णालय केज जवळचा चढावरील पूल, कदम वाडी पाटी जवळील पूल इत्यादी ठिकाणी रोड दबल्यामुळे रस्ता धोकेदायक बनला आहे तो दुरुस्त करणे गरजेचे आहे. या शिवाय कोरेगाव नदी पूलाला लागून पडलेली मोठी भेग दुरुस्त करणे गरजेचे आहे.
ही सर्व कामे दोन्ही कंपन्यांनी 20 जून पूर्वी सुरू करून पूर्ण न केल्यास 21 जून रोजी सकाळी 11 वाजता केजडी नदी पुलावर जनतेच्या सहभागाने बेमुदत रस्ता रोको आंदोलन करणार आहे. या निवेदनावर हनुमंत भोसले, नासेर मुंडे, जे डी देशमुख इत्यादींच्या स्वाक्षऱ्या आहेत.


