जोरगेवार परिवारानी केले ताईचे स्वागत !
चंद्रपूर-◼️ किरण घाटे◼️
कर्तृत्वान महिला आणि तिचा वसा समोर नेणार ,कार्यश्रम मुलगा हे नातं फार महत्वाचं आहे. अम्माने शुन्यातुन विश्व निर्माण केल. तेच विचार आणि संस्कार घेऊन किशोर जोरगेवार यांनी सुरु केलेला अम्माचा टिफिन हा उपक्रम अप्रतिम आहे.
हे काम पाहुन अम्माच्या भेटीला मी आज आली अन् त्यांच्या प्रेमात पडली अश्या भावनिक शब्दात खासदार सुप्रिया सुळे यांनी अम्माचे आणि पर्यायाने अम्मा टिफिन या सुरु असलेल्या उपक्रमाचे तोंड भरुन कौतुक केले आहे.
◼️ सोमवारी चंद्रपूर दौऱ्यावर आलेल्या खासदार सुप्रिया सुळे यांनी चंद्रपूर चे आमदार किशोर जोरगेवार यांच्या (मातोश्री)अम्मा अर्थातच गंगुबाई जोरगेवार यांची त्यांच्या राजमाता या निवासस्थानी भेट घेतली. या वेळी गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनीचे आमदार मनोहर चंद्रिकापूरे, माजी केद्रींय मंत्री सुबोध मोहिते, राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या प्रदेश उपाध्यक्ष वर्षा शामकुळे, राष्ट्रवादीचे कॉंग्रेसचे माजी आमदार प्रकाश गजभिये, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे ग्रामीण चंद्रपूर जिल्हाध्यक्ष राजेंद्र वैद्य, शहर जिल्हाध्यक्ष राजीव कक्कड, राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे अध्यक्ष नितिन भटाळकर, माजी नगर सेवक बलराम डोडाणी, अजय जयस्वाल आदींची उपस्थिती होती.
कोणीही गरजु उपाशी झोपता कामा नये या अम्मांच्या शब्दांना पुर्ण करण्याच्या हेतुने आमदार जोरगेवार यांच्या संकल्पनेतुन चंद्रपूरात अम्माचा टिफिन हा उपक्रम सुरु करण्यात आला . या उपक्रमांतर्गत अत्यंत गरजुंना नित्य भोजनाचा डब्बा घरपोच पोहचविला जात आहे. दरम्यान आज खासदार सुप्रिया सुळे यांनी आमदार जोरगेवार यांच्या निवासस्थानी पोहचत अम्माची भेट घेतली.
यावेळी सुप्रिया सुळे यांनी अम्माचा टिफिन या उपक्रमाची माहिती जाणून घेत त्यांचे या उपक्रमाचे कौतुक केले. आपल्या या भेटी दरम्यान सुप्रिया सुळे यांनी अम्माच्या प्रकृतीचीही सहानुभूतीने विचारपूस केली. अम्माने शुन्यातुन उभारलेले विश्व हे मोठे आहे. ते पुर्ण ताकदीने समोर नेण्याचे काम त्यांचा मुलगा आमदार किशोर जोरगेवार करीत आहेत. राजकारणा पलीकडेही नाते असतात ते जोपसण्याची गरज असुन आजची ही भेट राजकीय नसुन मनापासून नाते जोपासण्यासाठी होती .
आज मी अम्मा आणि आमदार किशोर जोरगेवार यांच्या परिवाराच्या भेटीला आली असल्याचेही त्या यावेळी म्हणाल्या. सुप्रिया सुळे यांनी मुंबई येथील सिल्व्हर ओक या निवासस्थानी येण्याचे निमंत्रणही अम्माला दिले. या प्रसंगी आमदार किशोर जोरगेवार यांच्या संपुर्ण परिवारासह यंग चांदा ब्रिगेडच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती.

