पालखी मुक्काम स्थळावरून इंदापूरकरांनी केले रस्ता रोको.
इंदापूर प्रतिनिधी: पालखी मुक्काम स्थळावरून इंदापूरमध्ये रणकंदन माजले असून, देहू संस्थानाने आडमुठी भूमिका घेतल्यास इंदापूरकर लोक वर्गणीतून प्रती पालखी तयार करून इंदापूरमध्ये दोन दिवस पालखी सोहळा जंगी पद्धतीने साजरा करतील असा प्रती इशारा इंदापूरच्या ग्रामस्थांनी देहू संस्थानाला दिला आहे. सोमवारी (२० जून) देहू संस्थानाचे अध्यक्ष नितीन महाराज मोरे यांनी प्रशासन आणि ग्रामस्थांमध्ये पालखी मुक्कामासंदर्भात तोडगा न निघाल्यास इंदापूरचा पालखी मुक्काम रद्द करून पुढे जाऊ असा इशारा दिला होता. या इशाऱ्यानंतर इंदापूर ग्रामस्थांनी आज पुणे सोलापूर हायवेवर चक्का जाम करत देहू संस्थानाला हा प्रती इशारा दिला आहे. यावेळी पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला होता.
मागील ७० वर्षांपासून संत तुकाराम महाराजांच्या पालखी इंदापूर शहरातील नारायणदास रामदास हायस्कूलमध्ये थांबण्याची परंपरा आहे. यावेळी मात्र प्रशासनाकडून मुक्काम स्थळ बदलण्यात आल्याने ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत. परंपरा कायम राहावी यासाठी सोमवारी (२० जून) ग्रामस्थांनी सिध्देश्वर मंदिर ते तहसील कार्यालय पायी वारी काढत तहसीलदारांना मागणीचे निवेदन दिले होते. प्रशासनाने निर्णय न बदलल्यास मंगळवारी (२१ जून) रास्ता रोको, गुरूवारी (२३ जून) इंदापूर तहसील कचेरी समोर लाक्षणिक उपोषण, रविवारी (२६ जून) तहसील कचेरीवर मोर्चा, तर शेवटच्या टप्प्यात पालखी मुक्कामी असताना (२ आणि ३ जुलै) इंदापूर शहर बंद ठेवण्याचा निर्वाणीचा इशारा ग्रामस्थांनी दिला होता.
प्रशासन आणि ग्रामस्थांमध्ये चाललेल्या या रणकंदनावर नितीन महाराज मोरे यांनी काही आरोपात्मक प्रश्न उपस्थित करत तोडगा न निघाल्यास पालखीचा इंदापूर मुक्काम रद्द करण्याचा इशारा सोमवारी (२० जून) दिला होता. या वक्तव्यानंतर संतापलेल्या इंदापूर ग्रामस्थांनी लोक वर्गणीतून प्रती पालखी तयार करण्याचा आणि इंदापूर शहरात दोन दिवसांचा जंगी पालखी सोहळा साजरा करण्याचा प्रती इशारा दिला आहे. यावेळी इंदापूरकरांनी चालत आलेली परंपरा, आजवर इंदापूरकरांनी वारकऱ्यांची केलेली सेवा आणि पालखीसाठी केलेल्या त्यागाचे हवाले देत प्रशासन आणि देहू संस्थानाला आडमुठी भूमिका मागे घेण्याची विनंती केली आहे. असे न झाल्यास ठरल्याप्रमाणे आंदोलन सुरूच राहील असेही यावेळी स्पष्ट करण्यात आले.

