"करू रक्षण पर्यावरणाचे साधेल कल्याण मानवाचे."
- राजाराम विष्णु शिंदे.
इंदापूर प्रतिनिधी: आपण ५ जून हा दिवस जागतिक पर्यावरण दिन म्हणून साजरा करतो.परंतु हा दिवस साजरा करण्याआधी आपण ज्या ठिकाणी राहतो त्या ठिकाणी पर्यावरणाच्या काही समस्या आहेत का? याचा आपण सर्वांनी विचार करायला हवा. कारण फक्त 5 जून या दिवशी पर्यावरण दिन साजरा करून चालणार नाही तर वर्षभर आपल्या कृतीतून, आचरणातून पर्यावरणदिन साजरा झाला पाहिजे त्यासाठी ठोसपणे कृती आपल्या हातून घडली पाहिजे.
आज प्लास्टिकचा अति वापर प्रत्येक ठिकाणी मोठ्या प्रमाणात होताना दिसून येत आहे.त्यामुळे पर्यावरणप्रदूषणाचा प्रश्न सर्वांच्या समोर राक्षसी स्वरुपात उभा असलेला आपणास दिसून येतो.यासाठी प्लास्टिक बंदी आणून शासन स्तरावरून प्रयत्न करणे एवढे पुरेसे नाही.प्लास्टिक वापराचे दुष्परिणाम याची लोकांमध्ये सर्व समाजामध्ये जनजागृती झाली पाहिजे.यासाठी प्लास्टिक बंदी साठी आधी स्वतः पासून सुरू करून लोकांमध्ये प्लास्टिक वापराविरुद्ध चळवळ निर्माण झाली पाहिजे.याची सुरुवात विद्यार्थीदशेतच मुलांवर शाळेत पर्यावरणाचे संस्कार देऊन होणे गरजेचे आहे. याचबरोबर आज उन्हाळा ऋतूत तीव्र उन्हाळा जाणवणे, हिवाळ्यात तीव्र थंडी पडणे किंवा पावसाळ्यात ढगफुटी प्रमाणे पाऊस पडणे किंवा कोरडा दुष्काळ पडणे या सर्व गोष्टींचा संबंध पर्यावरण ऱ्हासाशी
असल्याचा दिसून येतो.यासाठी सर्वप्रथम आधुनिकतेच्या नावाखाली मोठमोठ्याले रस्ते बनविताना किंवा शहरात घरे बांधताना होणारी झाडांची बेसुमार कत्तल थांबवली पाहिजे. यासाठी झाडे लावा झाडे जगवा हा उपक्रम अतिशय प्रभावीपणे राबविला पाहिजे यासाठी पावसाळ्याच्या तोंडावर नैसर्गिक वृक्ष लागवड केली पाहिजे. म्हणजे शहराच्या किंवा खेडेगावात आजूबाजूला जी काटेरी झुडपे आहेत अशा झुडपांच्या बुडाशी वेगवेगळ्या झाडांच्या बिया पुरल्या पाहिजे. यामुळे नवीन येणाऱ्या झाडांना अन्न पुरविण्याचे व त्याचे मेंढ्यांपासून संरक्षण करण्याचे काम हे काटेरी झाडे करतात यासाठी याला कोणताही वेगळा खर्च किंवा वेळ द्यावा लागत नाही. त्याचबरोबर रस्ते तयार करताना जेवढी झाडे तोडली आहेत त्याच्या दुप्पट झाडे लावून ती जगविण्याचे टार्गेट संबंधित ठेकेदारांना दिले पाहिजे तरच या होणाऱ्या पर्यावरण र्हास थांबविण्यास आपण थोडाफार हातभार लावू शकतो. त्याचबरोबर जीवाश्म इंधनाचा वापर कमी करणे हे देखील महत्त्वाचे आहे कारण त्यामुळे कार्बनचे प्रमाण वाढून हवामान बदल होत आहे म्हणून सार्वजनिक वाहतुकीचा पर्याय स्वीकारणे , थोड्या अंतरासाठी चालत जाणे ,सायकलचा जास्तीत जास्त वापर करणे यामुळे जीवाश्म इंधनाचा वापर कमी होऊन कार्बन चे प्रमाण कमी होऊन पर्यावरण प्रदूषण कमी होण्यास हातभार लागेल. त्याचबरोबर जीवाश्म इंधनाचा साठी भारतीय पैसा परदेशी जाणार नाही. त्याचबरोबर सायकलचा वापर केल्याने लोकांचे आरोग्य उत्तम राहील यासाठी शाळा, महाविद्यालय यामधून जनजागृती करून विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरण विषयक प्रेम निर्माण झाले पाहिजे.या पर्यावरण रसाला आपणच पायबंद घालायला हवा. प्रत्येकाने मनावर घेतले तर ते सहज शक्य आहे.पण नेमके तेच होताना दिसत नाही म्हणून फक्त पर्यावरण दिनीच फक्त निसर्गाचा विचार न होता तो वर्षभर निसर्गाचा विचार करून त्याची काळजी घेतली पाहिजे आपण आपल्या आयुष्यातील प्रत्येक क्षण पर्यावरण स्नेही म्हणून काम करूया व येणाऱ्या पिढीला समृद्ध असा निसर्ग देऊया असा संकल्प करूया तरच आजचा पर्यावरण दिन साजरा केल्याचे सार्थक होईल.
शब्दांकन...
श्री राजाराम विष्णु शिंदे(M. A.D.ed.)
प्राथमिक शिक्षक
जि.प.प्राथमिक शाळा लासुर्णे केंद्र- बेलवाडी ,तालुका- इंदापूर, जिल्हा- पुणे.

