◼️चंद्रपूर◼️ -किरण घाटे ◼️
चंद्रपूरच्या जिवती तालुक्यातील शेनगांव येथील आरोग्य वर्धिनी प्राथमिक आरोग्य केंद्रात कंत्राटी पदभरती मध्ये स्थानिक उमेदवारांना प्रथम प्राधान्य देण्यात यावे अशी मागणी जिवती पंचायत समितीचे भूतपूर्व उपसभापती तथा भारतीय जनता युवा मोर्चाचे चंद्रपूर जिल्हा महामंत्री महेश बळीरामजी देवकते यांनी आज मंगळवार दि.७जूनला जिल्हा आरोग्य अधिकारी चंद्रपूर यांना एका लेखी निवेदनातून केली.या मागणीची पूर्तता न झाल्यास येत्या १३जूनला शेनगांवच्या प्राथमिक आरोग्य केंद्राच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर आमरण उपोषणाला बसू असा इशारा देखिल देवकते यांनी याच लेखी निवेदनातून दिला आहे.शेनगांव येथील आरोग्य केंद्राची इमारत बांधताना काही शेतकरी बांधवांनी शेतीची जागा उपलब्ध करून दिली आहे.
त्यांचे कुटुंबातील पाल्यांना त्यांच्या शैक्षणिक पात्रतेनुसार कंत्राटी पदभरतीत प्राधान्य देणे क्रमप्राप्त होते.परंतु त्यांना ही या पद भरतीत डावलण्यात आल्याचा आरोप महेश देवकते यांनी आज या प्रतिनिधीशी चंद्रपूर मुक्कामी बोलतांना केला .
या शिवाय महाभयानक कोरोना संकटात दिवस रात्र ज्यांनी जिवधोक्यात टाकुन सेवा दिली त्यांचा देखिल या कंत्राटी पद भरतीत समावेश करण्यात आला नसल्याचे निवेदनात म्हटले आहे.सिएससी केंद्राकडून ही कंत्राटी पद भरती करण्यात आली असुन ग्रामीण भागातील जनतेला या पद भरतीची जाहिरात बघावयास मिळाली नाही त्यामुळे अनेक पात्र उमेदवारांना सदरहू कंत्राटी पदभरती साठी अर्ज दाखल करता आले नसल्याचे जिवती तालुक्यात सर्वत्र बोलल्या जात आहे.परस्पर जाहिरात प्रकाशित करून स्थानिक उमेदवारांना जाणूनबुजून डावलण्याचा संबंधित यंत्रणेने प्रयत्न केला असल्याचे निवेदनात नमुद करण्यात आले आहे.दरम्यान या निवेदनाची एक प्रत महेश देवकते यांनी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रपूर यांना दिली आहे.या शिवाय जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार,खा.बाळू धानोरकर आ.सुधिर मुनगंटीवार, आ.सुभाष धोटे , माजी खासदार हंसराज अहिर, माजी आमदार संजय धोटे , भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे व चंद्रपूरचे जिल्हाधिकारी यांना उपरोक्त निवेदनाच्या प्रति पाठविण्यात आल्या असल्याचे देवकते यांनी आज सांगितले.

