अधिकृतरित्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटला सुरुवात होऊन जवळ जवळ १४५ वर्ष झाली आहेत. सुरुवातीला फक्त कसोटी क्रिकेट खेळले जायचे. कालांतराने प्रेक्षकांच्या सोयीसाठी वनडे व टि- ट्वेंटी हे क्रिकेटचे छोटे प्रकार नावारूपाला आले. त्यामुळे कसोटी क्रिकेटकडे प्रेक्षकांनी पाठ फिरवायला सुरुवात केली. कसोटी क्रिकेट पाच दिवस चालते व वनडे एक दिवसात निकाल देते तर टि- ट्वेंटीचा निकाल चार तासात लागून जातो.
टि- ट्वेंटी सामने शक्यतो रात्री खेळले जातात, त्यामुळे खेळाडू व प्रेक्षकांना उष्णतेचा फारसा त्रास होत नाही व या सामन्याचा कालावधीही कमी असतो. एकदिवसीय सामनेही दिवस रात्र पध्दतीने खेळले जातात त्यामुळे त्याच्या अस्तित्वावरही हवामानाचा विशेष प्रभाव जाणवत नाही. मात्र पारंपारीक कसोटी क्रिकेट हे दिवसाच खेळले जाते व ते सलग पाच दिवस चालते. शिवाय ते भर उन्हात खेळले जात असल्याने तसेच सध्या उष्णतेचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असल्याने दिवसा घरा बाहेर पडणेही मुश्किल होत असल्याने दिवसा खेळले जाणाऱ्या कसोटी क्रिकेटवर संक्रांत येण्याची मोठी शक्यता दिसते. तीव्र उन्हामुळे क्रिकेटपटू व पंचाच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो व त्याचा तीव्र परिणाम प्रेक्षक कसोटी क्रिकेटपासून दुरावण्यात होऊ शकतो. सध्या या वाढत्या उष्णतेचा प्रभाव भारतीय उपखंडात मोठया प्रमाणात जाणवत आहे.
क्रिकेटचा आत्मा असलेले कसोटी क्रिकेट जीवंत ठेवायचे असेल तर डे नाईट (दिवस रात्र ) पध्दतीने कसोटी सामने खेळण्याचा पर्याय उपलब्ध आहे. सध्या डे नाईट कसोटी प्रत्येक देशात खेळण्यास सुरुवात झाली आहे. परंतु सध्या मालिकेतला एखाद दुसराच सामना दिवसरात्र पद्धतीने खेळला जातो.
परंतु सध्याचे बदलते हवामान व वाढती उष्णता यांचा प्रभाव कसोटी क्रिकेट वर होत असल्याने दिवस रात्र पध्दतीने खेळले जाणाऱ्या कसोटी सामन्यांच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता आहे. सन १९०१ मध्ये तापमान मोजण्याची पद्धत सुरू झाली. त्या वर्षी एप्रिलमध्ये सर्वाधिक ३७.८ डिग्री सेेल्सियस तापमानाची नोंद करण्यात आली होती. त्यानंतर वाढते कारखाने, प्रदुषण, सततची वृक्षतोड यामुळे उष्णतेचे प्रमाण वाढतच जात असल्याने संयुक्त राष्ट्रसंघाने धोक्याचा इशारा देताना ज्या देशात उष्णता वाढत आहे तेथे येणाऱ्या काळात संकट पैदा होऊ शकते. या वर्षी सर्वाधिक उष्णता असलेल्या महाराष्ट्रात आयपीएल स्पर्धा भर उन्हाळ्यात संपन्न झाली. सदर स्पर्धेदरम्यान अनेक खेळाडूंना उष्णतेचा त्रास झाला, सामन्या दरम्यान काही खेळाडूंनी दोन ते तीन वेळा टि शर्ट बदलताना सर्वांनी बघितले आहे. अनेकदा भर मैदानात डॉक्टरांनी खेळाडूंच्या तपासण्याही केल्या. सामन्या दरम्यान बऱ्याच वेळा इंटरव्हल्स घेतले गेले. खेळाडूही पाण्याबरोबरच बर्फाचाही मोठया प्रमाणात उपयोग करताना दिसले.
टि- ट्वेंटी सामने कमी कालावधीचे असतात. शिवाय त्यामध्ये ब्रेक ज्यादा प्रमाणात घेतले जातात. मात्र कसोटी सामन्यात खेळाडू व पंचाना दिवसभर मैदानात उभे राहावे लागते. तेंव्हा उन्हाचा त्रास कसोटी क्रिकेटला प्रभावित करू शकतो. त्यामुळे दिवसाचे कसोटी भारतात कमी कमी होऊन बंदही होऊ शकतात.
भारतातील बदलते हवामान व वाढती उष्णता लक्षात घेता बीसीसीआयला डे नाईट कसोटी सामने खेळविण्याशिवाय पर्याय नसेल. परंतु दिवसरात्र सामने खेळविणेेही दिसते तितके सोपे नाही. त्यासाठी मोठया प्रमाणात विजेची गरज असते. सध्याचा देशातील विजेचा तुटवडा व सामान्य जनजीवनासाठी उपलब्ध असलेली विज यामध्ये मोठी तफावत असल्याने डे नाईट कसोटी मोठया प्रमाणात खेळविणेेही अवघड ठरू शकते.
शिवाय डे नाईट कसोटीच्या तिसऱ्या सत्रात दव (डयू ) पडत असल्याने चेंडू ओला होतो त्याचा तोटा क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला होतो. या सर्व बाबींचा विचार करता कसोटी क्रिकेटचेच भविष्य धोक्यात दिसते. त्यासाठी पर्यावरणाचा होणारा ऱ्हास थांबविणे, प्रदूषण रोखणे, ओझोनचा थर नियंत्रणात ठेवणे या बाबी सर्वच पातळ्यांवर सांभाळल्या तर बदलत्या हवामानाला रोखता येऊ शकते. त्याचा लाभ कसोटी क्रिकेटलाच नाही तर सर्व सामान्यांना सहज जगण्यासाठीही होऊ शकतो. तेंव्हा प्रदूषण टाळा ! वृक्ष लावा !!देश वाचवा !!!
लेखक -
डॉ.दत्ता विघावे
क्रिकेट समिक्षक.
इंटर नॅशनल मेंबर ऑफ वर्ल्ड पार्लमेंट,
मेंबर ऑफ युनायटेड नेशन्स ग्लोबल टॅलेंट पुल,
प्रतिनिधी भारत.
Email: dattavighave@gmail.com

