शिर्डी एक्स्प्रेस लाईव्ह वृत्तसेवा अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी- दिपक हरिश्चंद्रे.
रविवार दिनांक १९ जून २०२२
रक्तदान चळवळीव्दारे रक्ताचे नाते निर्माण करण्याचा उपक्रम : आमदार जगताप..!!
अहमदनगर : व्यवसाय करतानाच सामाजिक बांधिलकी जपण्याचे मोठे काम नगरमधील मोबाईल विक्रेते करीत आहेत. ग्राहकांशी आपुलकीचे नाते निर्माण करतानाच समाजात रक्तदान चळवळीद्वारे रक्ताचे नाते निर्माण करण्याचा उपक्रम कौतुकास्पद आहे. आपण केलेले रक्तदान एखाद्याला जीवनदान देणारे ठरते, यापेक्षा अधिक आनंदाची भावना असू शकत नाही. रक्तदानाचा हा महायज्ञ भविष्यातही कायम प्रज्वलित ठेवण्यासाठी आवश्यक ते सर्व सहकार्य करू, अशी ग्वाही आमदार संग्राम जगताप यांनी दिली.
ऑल इंडिया मोबाईल रिटेलर्स असोसिएशनच्यावतीने असोसिएशनचे राष्ट्रीय महासचिव भावेश सोलंकी यांच्या स्मरणार्थ व आमदार जगताप यांच्या वाढदिवसानिमित्त प्रेरणा प्रतिष्ठान व आय लव्ह नगरच्या सहकार्याने भव्य रक्तदान शिबिर घेण्यात आले. लक्ष्मीनारायण मंगल कार्यालयात झालेल्या या शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी आमदार जगताप बोलत होते.
यावेळी आय लव्ह नगरचे संस्थापक नरेंद्र फिरोदिया, राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष प्रा.माणिक विधाते, जिल्हा लेबर फ़ेडरेशनचे उपाध्यक्ष विकी जगताप, स्थायी समिती सभापती कुमारसिंह वाकळे, मनपातील विरोधी पक्ष नेते संपत बारस्कर, नगरसेवक प्रकाश भागानगरे, मर्चंटस् बँकेचे संचालक संजय चोपडा, अजिंक्य बोरकर, विजय गव्हाळे, संभाजी पवार, मोबाईल रिटेलर्स असोसिएशनचे महाराष्ट्र अध्यक्ष अजित जगताप, जिल्हाध्यक्ष अजित पवार, रितेश सोनीमंडलेचा, कमलेश भिंगारवाला, सुदाम वाडेकर, यश मेहता, प्रफुल्ल लोढा, योगेश झंवर, संतोष बलदोटा, गोरख पडोळे, मनिष चोपडा, अमित बुरा, राकेश सोनीमंडलेचा, अतुल रच्चा, हिराशेठ खुबचंदाणी, मनोज बरलोटा, साजीद खान, प्रितम तोडकर आदी उपस्थित होते.
नरेंद्र फिरोदिया म्हणाले, नगरमध्ये आज सर्व मोबाईल विक्रेत्यांनी आपले संपूर्ण व्यवहार बंद ठेवत रक्तदानाचा विक्रमी उपक्रम राबविला. प्रत्येकाने उत्स्फूर्तपणे रक्तदानाच्या कार्यात सहभाग नोंदवला. व्यवसाय करतानाच संवेदनशीलता जपत समाजासाठी एक मोठे कार्य उभारले गेले आहे. असे उपक्रम भविष्यातही राबविण्याचे आवाहन फिरोदिया यांनी केले.
प्रास्ताविकात अजित जगताप यांनी सांगितले की, ऑल इंडिया मोबाईल रिटेलर्स असोसिएशनतर्फे एकाच दिवशी संपूर्ण देशभरात रक्तदान शिबिरांचा उपक्रम राबविण्यात आला. नगर शहरात दिवसभर चाललेल्या या शिबिरात १५१५ रक्त पिशव्या संकलन झाले. याशिवाय संगमनेर, राहुरी, शेवगाव, कर्जत, श्रीगोंदा येथेही मोबाईल विक्रेत्यांनी रक्तदान शिबिर घेवून ५०० हून अधिक रक्त पिशव्या संकलित केल्या. जिल्हाभरात मिळून २०१६ इतके विक्रमी रक्त संकलन झाले. नगरमधील रक्त संकलनासाठी अर्पण ब्लड बँक, आनंदऋषीजी ब्लड सेंटर, जनकल्याण रक्तपेढी, बाळासाहेब देशपांडे रुग्णालय रक्तपेढीच्या टिमने सहकार्य केले. जिल्हाध्यक्ष अजित पवार यांनी आभार मानले.
Shirdi Express Live🎥#करीता बातम्या📰🗞️ आणि जाहिराती 🖼️साठी संपर्क @दिपक हरिश्चंद्रे (अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी )📲7350591600

