शिर्डी । प्रतिनिधी (संजय महाजन) :
कु.योगिता बाबासाहेब घोडके यांच्या १४ व्या वाढदिवसानिमित्त ग्रीन फाऊंडेशन महाराष्ट्र राज्य च्या वतीने ऑक्सिजन पॉईट क्र ३ या ठिकाणी वड वृक्ष लावून वाढदिवस साजरा करण्यात आला.
" वृक्ष वल्ली आम्हा सोयरी वनचरी, कांदा, मुळा, भाजी अवघी विठाई माझी." संतानी किती आत्मीयतेने निसर्गाबद्दल, वृक्षांबद्दल लिहिले आहे. बहरलेला निसर्ग कोणाला आवडत नाही? पानांची सळसळ, पक्षांचे मधुर गीत, झऱ्यांची खळखळ, धबधब्याचा घन गंभीर नाद, समुद्राच्या लाटांची गाज, निसर्गाचे हे रम्य रूप आपले सगळे दु:ख विसरायला लावते. म्हणूनच आपण सर्वांनी झाडे लावली पाहिजेत. नव्हे तर ती जगवली पाहिजेत. सृष्टीच्या या चक्रामध्ये प्राणी आणि वनस्पती यांचे अतूट नाते आहे. दोघं एकमेकांवर अवलंबून आहेत.
प्राणी श्वास घेताना ऑक्सिजन घेतात आणि कार्बन डाय ऑक्साइड सोडतात तर झाडे कार्बन डाय ऑक्साइड घेतात आणि ऑक्सिजन सोडतात. अशा तऱ्हेने हवेतील घटकांचे प्रमाण कायम राहते आणि सर्व जीव सुखाने राहतात. कारण आता परिस्थिती बदलली आहे. पृथ्वीचा समतोल बिघडला आहे. निसर्ग चक्र उलटे फिरू लागले आहे.
वातावरणात ऑक्सिजन चे प्रमाण घटून प्रदूषण वाढले आहे. त्यामुळे साथीचे रोग वाढले आहेत. या साठी सर्वानी येत्या पावसाळ्यात वृक्षारोपण करून संवर्धन करणे गरजेचे आहे असे प्रतिपादन ग्रीन फाउंडेशन संस्थापक अध्यक्ष अमित जगताप यांनी केले.
या वेळी ग्रीन फाऊंडेशन पुणे जिल्हाध्यक्ष दत्तात्रय शेंडगे, बाबासाहेब घोडके,सिद्धार्थ खंडागळे,मधुकर कुमावत, जीवन जाधव, किरण भोसले,राहुल कुंभार, उपस्थित होते.

