जावेद शेख /राहुरी प्रतिनिधी
राहुरी - राज्यात खाजगी सावकारांनी परत एकदा डोके वर काढले आहे.या खाजगी सावकारांची पाळेमुळे आता गावागावात पोहचली आहेत.कोणीही उठतो आणि सावकारी सुरू करतो.कित्येक जणांकडे अधिकृत परवाना नसताना पण सर्वसामान्य जनतेची यांच्याकडून प्रचंड प्रमाणात लूटमार चालू आहे.याकडे सहकार विभाग आणि पोलीस प्रशासन यांचा कानाडोळा का आहे ? असा प्रश्न आता सर्वसामान्य जनतेला पडला आहे.येत्या ७ दिवसांत जर जिल्हा उपनिबंधक आणि पोलीस प्रशासनाने या खाजगी सावकारांवर कारवाई केली नाही तर स्वराज्य माहिती अधिकार व पत्रकार संरक्षण संघटना राज्यभर जिल्हा उपनिबंधक यांना घेराव घालणार आणि ठिय्या आंदोलन करणार करण्याचा इशारा संस्थापक अध्यक्ष दिपक कांबळे यांनी दिला आहे.
आज खेडोपाडी आणि वाडीवस्तीवर पण या खाजगी सावकारीचे लोण पसरले आहे.अनेक लोकांनी या खाजगी सावकाराच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केल्या आहेत. खाजगी सावकार आता गल्लोगल्ली दिसायला लागले आहेत ,यामध्ये आता बिल्डर ,मटकावाले ,निवृत्त सरकारी कर्मचारी यांचा काळा पैसा या खाजगी सावकारीच्या माध्यमातून पांढरा करायचा गोरखधंदा मोठया प्रमाणात चालू आहे.हे खाजगी सावकार वार्षिक २००% ते ३००% इतके भरमसाठ व्याज वसुली करतात.यांनी वसुलीसाठी गुंड पोसले आहेत ,या सावकारांनी सर्व सामान्य जनतेला प्रचंड त्रास दिलेला आहे.मारहाण करणे,हल्ला करणे,मालमत्ता बळकावणे,शिवीगाळ ,दमदाटी ,धमकी देणे एवढेच नाहीतर घरातील आयाबहिनीवर हात घालण्यापर्यंत या बांडगुळांची मजल गेली आहे तरीही प्रशासन गांधारीच्या भूमिकेत का आहे हे जनतेला कळत नाही,अशा गावोगावच्या लुटारू सावकारांचा सहकार विभाग आणि पोलीस प्रशासन यांनी शोध घेऊन जनतेला दिलासा दयावा तसेच या प्रकरणी या सावकारावर कलम ३०२ प्रमाणे गुन्हा दाखल करावा,जे खाजगी सावकार आहेत त्यांची मालमत्ता तपासून लुबाडणूक हडप केलेली मालमत्ता जप्त करून ती परत करावी.खाजगी सावकाराना खतपाणी घालणाऱ्या सहकार आणि पोलीस खात्यातील कर्मचारी आणि अधिकारी यांच्या मालमत्ता जप्त करून त्यांना शासकीय सेवेतून बडतर्फ करावे. जे अनधिकृत सावकार आहेत त्यांच्यावर मोक्का कायद्यांतर्गत कारवाई करावी. अधिकृत खाजगी सावकार किती आहेत ते किती टक्के व्याज आकारू शकतात याची वर्तमानपत्रात यादी प्रसिद्ध करण्यात यावी या प्रमुख मागण्या संघटनेच्या आहेत या मागण्या येत्या ७ दिवसांत मान्य न झाल्यास जिल्हा उपनिबंधक यांना घेराव घालून त्यांच्या कार्यालयात ठिय्या आंदोलन करणार असल्याचा इशाराही दिपक कांबळे यांनी दिला आहे.

