शिर्डी एक्स्प्रेस लाईव्ह वृत्तसेवा अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी- दिपक हरिश्चंद्रे. बुधवार दिनांक २१ जून २०२२
एकनाथ शिंदेंच्या भूमिकेवर अहमदनगरमधून पहिली प्रतिक्रिया ; कट्टर शिवसैनिक, ते कटू निर्णय टाळतील; शहरप्रमुख संभाजी कदम..!!
अहमदनगर : “शिवसैनिक कसा असावा हे नेते एकनाथ शिंदे यांच्याकडे पाहिल्यावर लक्षात येते. त्यांचा सारखा कडवा आणि कट्टर शिवसैनिक असूच शकत नाही. त्यामुळे ते काेणताही कटू निर्णय घेणार नाहीत. अहमदनगर शहरासह जिल्ह्यातील अनेक शिवसैनिक एकनाथ शिंदे यांनी घडविले आहे. अहमदनगर महापालिकेच्या महापाैर पदावर ज्या तीन शिवसैनिकांनी संधी मिळाली, त्यात त्यांचा माेठा वाटा आहे. यामुळे हा कडवा शिवसैनिक काेणताही कटू निर्णय घेणार नाही”, अशी प्रतिक्रिया शिवसेनेचे शहरप्रमुख संभाजी कदम यांनी माध्यमांशी बाेलताना व्यक्त केली.
विधानपरिषदेच्या निवडणुकीनंतर शिवसेनेचे नेते तथा मंत्री एकनाथ शिंदे हे मध्यरात्रीनंतर नाॅटरिचेबल झाले. यानंतर ते गुजरातमधील सुरतमध्ये असल्याची माहिती समाेर आली. तशा वृत्तवाहिन्यांबर बातम्या येऊ लागल्या. याचबराेबर शिंदे यांच्याबराेबर शिवसेनेचे ३५ आमदार बराेबर असल्याचा दावा केला जात आहे. एकनाथ शिंदे हे गुजरात येथे असतानाच शिवसेना पक्षप्रमुख मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वर्षा बंगल्यावर शिवसेनेचे आमदार आणि नेत्यांची बैठक बाेलावली. या बैठकीकडे देखील नेते एकनाथ शिंदे यांनी पाठ फिरवली. याशिवाय भाजप आणि काॅंग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये वेगवान हालचाली सुरू झाल्या. भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी नियाेजित दाैरे रद्द करून संपर्क आणि संवादावर भर देत आहेत. यामुळे राज्याचे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.
एकनाथ शिंदे यांच्याबराेबर शिवसेनेच्या संपर्कात नसल्याचे बातम्या वृत्तवाहिन्यांवरून पहाटेपासून येऊ लागल्या. समाज माध्यमांमध्ये देखील सकाळपासून शिंदे यांच्या भूमिकेविषयी अपडेट दिले जात आहे. यामुळे राज्यातील अवघ्या शिवसैनिकांचे एकनाथ शिंदे यांच्या भूमिकेकडे लक्ष लागले आहे. एकनाथ शिंदे यांच्या या भूमिकेचे अहमदनगरमध्ये देखील पडसाद उमटले असून, शिवसैनिकांमध्ये अस्वस्थता आहे. जिल्ह्यातील प्रत्येक शिवसैनिक एकमेकांच्या संपर्कात असून, काय हाेणार याची चर्चा करत आहे. वरिष्ठ पदाधिकाऱ्यांना फाेन करून कानाेसा घेत आहे. या सर्व घडामाेडीत अहमदनगर जिल्ह्यातील काॅंग्रेस आणि राष्ट्रवादीचे नेते, पदाधिकारी माैन बाळगून आहेत. एकनाथ शिंदे यांच्या भूमिकेविषयी शिवसेनेचे अहमदनगर शहर प्रमुख संभाजी कदम यांनी आय लव्ह नगरशी संवाद साधला.
संभाजी कदम म्हणाले, नेते एकनाथ शिंदे हे धर्मवीर अनंत दिघे यांच्या तालमीत तयार झालेले आहे. दिघे साहेब हे कट्टर शिवसैनिक हाेते. संघटनेला त्यांनी प्रधान क्रम दिली. अशा नेत्याच्या तालमीत तयार हाेणारे शिंहे साहेब हे, किती कडवट शिवसैनिक असतील, हे माेजताच येणार नाही. आम्ही देखील धर्मवीर अनिल राठाेड यांच्या तालमीत तयार झालाे आहाेत. यामुळे कट्टर शिवसैनिक संघटना साेडून काेणताच कटू निर्णय घेऊ शकत नाही. नेते एकनाथ शिंदे हे शिवसेनेच्या संघटनेला प्राधान्य देणारे नेते असून, ते काेणताच कटू निर्णय घेणार नाहीत, याची खात्री वाटते.” एकनाथ शिंदे हे किती कट्टर शिवसैनिक आहेत, याचा अनुभव अहमदनगरमधील शिवसैनिकांनी घेतला आहे. अहमदनगर महापालिकेवर त्यांच्याच नेतृत्वाखाली तीन वेळा शिवसेनाचा महापाैर झाला आहे. यामुळे एकनाथ शिंदे यांच्या निर्णयाकडे अहमदनगर शहरासह जिल्ह्यातील शिवसैनिकांचे लक्ष लागले आहे. जी काही माहिती मिळत आहे, ती वृत्तवाहिन्या आणि समाज माध्यमांतील अपडेट पाहून मिळत आहे, असेही कदम यांनी सांगितले.
Shirdi Express Live🎥#करीता बातम्या📰🗞️ आणि जाहिराती 🖼️साठी संपर्क @दिपक हरिश्चंद्रे (अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी )📲7350591600

