shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

यांत्रिकतेमुळे ट्रॅक्टर आला; आणि शेतशिवारातील सर्जा राजा माञ हद्दपार झाला..!!

शिर्डी एक्स्प्रेस लाईव्ह वृत्तसेवा अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी- दिपक हरिश्चंद्रे.                                                  शुक्रवार दिनांक १० जून २०२२

यांत्रिकतेमुळे ट्रॅक्टर आला; आणि शेतशिवारातील सर्जा राजा हद्दपार झाला..!!

शिवारातील घुंगरांच्या जागी ऐकू येतेयं ट्रॅक्टरची घरघर !!सर्जा राजाची जोडी नामशेष होण्याच्या मार्गावर !!

अहमदनगर : सध्याच्या डिजीटल, संगणकीय युगात सर्वच क्षेत्रात वाढते यांत्रिकीकरण आपणास प्रकर्षाने जाणवते. झपाट्याने वाढणाऱ्या यांत्रिकीकरणामुळे उत्पादन वाढीचा दर वाढला. पर्यायाने मोठ्या प्रमाणात आर्थिक उत्क्रांती झाली खरी. परंतु, बेरोजगारीचे संकट आणखी गडद झाले. याला कृषिक्षेत्रही अपवाद नाही. यांत्रिकीकरणामुळे शेतकऱ्याच्या दारात ट्रॅक्टर आला आणि शिवारातील सर्जा राजा हद्दपार झाला. हे वास्तव नाकारण्या जोगे नसून शिवारातील घुंगरांच्या जागी ट्रॅक्टरची घरघर ऐकू येत असल्याचे चित्र आढळून येत आहे. चांगला बदल हे प्रगतीचे लक्षण जरी असले तरी शेतकरी आणि सर्जा राजाचे नाते हे एका मानसिक हिंदोळ्यावरील अतूट असे नाते आहे. त्या नात्याला भावनिकतेची झालर आहे हे वास्तव नाकारता येत नाही.

पूर्वी शेतकरी म्हटले की, दावणीला सर्जा राजाची बैलजोडी हमखास असायची. हा शेतकरी आपल्या सर्जा राजावर पोटच्या लेकरा बाळांप्रमाणे प्रेम करत असे. त्याच प्रमाणे सर्जा राजा ही आपल्या धन्याच्या खाल्ल्या मिठाला जागत शेतमळा फुलवण्याचे काम अविश्रांतपणे करीत असे. पूर्वीच्या काळी विहिरीवरील मोट चालवण्यापासून शेतीची नांगरट, कुळवट, सरी, पेरणी अगदी शेतीमालाची वाहतूक करण्यापर्यंतची कामं बैलांकरवी केली जात असत. गळ्यात बांधलेल्या घुंगरांच्या ठेक्यावर झूल पांघरलेल्या सर्जा राजाला लग्नांमधील वऱ्हाडी मंडळींची ने-आण करण्याची जबाबदारीही पार पाडावी लागत असे.

बेंदूर तसेच बैलपोळा या सणांना सर्जा-राजाच्या आयुष्यात अनन्यसाधारण महत्त्व आहे. शेती मशागतीची कामे करून आलेला शिणवटा घालण्यासाठी खुराक, पेंड खायला घालून त्याच्या धन्याने सर्जा-राजा प्रती असलेली कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी केलेला गौरव सोहळा म्हणजेच बेंदूर असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. बेंदराच्या आदल्या दिवशी खांदे मळणी करत असत. वर्षभर खांद्यावरचे जू ओढत-ओढत झालेल्या जखमांवरती हळद मिश्रीत तेल चोळणे म्हणजेच खांदे मळणी होय. अलीकडील काळात कृषी क्षेत्रातील वाढत्या यांत्रिकीकरणामुळे शेताची नांगरट करणाऱ्या मोठ्या ट्रॅक्टर पासून ते अगदी उभ्या पिकांमध्ये आंतरमशागत करणारे छोटे ट्रॅक्टर बाजारात उपलब्ध झाल्यामुळे एकेकाळी शेतकऱ्याचा जीव की प्राण असलेली शेतशिवारातील सर्जा राजाची जोडी नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळे येणाऱ्या पिढीसाठी सर्जा राजाचे अस्तित्व फक्त कागदावरतीच उरले तर आश्चर्य वाटायला नको...!

Shirdi Express Live🎥#करीता बातम्या📰🗞️ आणि जाहिराती 🖼️साठी संपर्क @दिपक हरिश्चंद्रे (अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी )📲7350591600

close