आयपीएलचे वारे गेले आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटचे वेध लागले. दक्षिण आफ्रिकेचा संघ पाच टि- ट्वेंटी सामन्यांची मालिका खेळण्यासाठी भारत दौऱ्यावर आला असून या संघातील बरेचसे खेळाडू आयपीएल नंतर भारतातच थांबून राहिले होते. भारताच्या तुलनेत दक्षिण आफ्रिकेच्या संघाचा विचार केला तर अनुभवी खेळाडूंचा मोठा भरणा त्यांच्याकडे आहे. भारताच्या संघावर नजर टाकली तर भारताने आपले प्रमुख खेळाडू नियमित कर्णधार रोहित शर्मा, विराट कोहली, जसप्रित बुमराहा व मोहम्मद शमी यांना आराम दिला आहे. तर सलामीवीर केएल राहुलला कर्णधार बनविले असून उपकर्णधार रिषभ पंत असेल.
के.एल राहुल एक फलंदाज म्हणून जितका चांगला आहे तितकाच कर्णधार म्हणून त्याचा रेकॉर्ड खराब आहे. याच वर्षी तीन जानेवारी रोजी आफ्रिका दौऱ्यात दुसऱ्या कसोटीत तत्कालीन कर्णधार विराट कोहलीच्या गैरहजेरीत राहुलला भारताचं कसोटीत नेतृत्व करण्याची संधी प्रथमच मिळाली असता मालिकेत आघाडीवर असलेल्या टिम इंडियाला पराभूत व्हावे लागले होते. त्यामध्ये राहुलच्या गलथान नेतृत्वाचाच मोठा वाटा होता.
जोहान्सबर्गच्या वॉन्डरर्स स्टेडियमवर झालेला तो सामना भारताने सात गड्यांनी गमावला. याचा अर्थ कसोटी कर्णधार म्हणून राहुलची अपयशी सुरूवात झाली होती. कसोटी मालिकेनंतर तीन एक दिवसीय सामन्यांची मालिका झाली. तिच्यात तर राहुलच्या नेतृत्वाचे तीन तेरा वाजले होते. भारताला तीनही सामन्यात सपाटून मार खावे लागल्याने राहुलच्या वनडे नेतृत्वाची सुरुवातही अपयशानेच झाल्याने त्याच्या नेतृत्व शैलीवर शंका व्यक्त केल्या जात असतानाच सन २०२०, २१ या दोन वर्षात आयपीएलमध्ये पंजाबचे अपयशी नेतृत्व केले असतानाही नव्यानेच बनलेल्या लखनौ सुपर जायंटसचे नेतृत्व त्यालाच देण्यात आले. तसे बघाल तर लखनौचा संघ विजेतेपद मिळविण्याच्या लायकीचा होता. परंतु तेथेही राहुलच्या सुमार नेतृत्वामुळे लखनौला पहिल्यांदा गुणतालिकेत पहिल्या दोन संघात स्थान मिळविण्यात अपयश आले. त्यानंतर झालेल्या एनिमिनेटर सामन्यात आरसीबीने लखनौला पराभूत करून स्पर्धेतूनच बाहेर ढकलले. यावरून राहुलच्या अगाध नेतृत्वगुणांची कल्पना येते.
कसोटी आणि वनडेत दक्षिण आफ्रिकेविरूध्दच नेतृत्वाचा श्रीगणेशा करणाऱ्या राहुलला टि- ट्वेंटीमध्येही याच दक्षिण आफ्रिकेविरूध्द भारताचे कर्णधारपद प्रथमच भूषविण्याची संधी मिळणार आहे. विशेष म्हणजे आधीच्या दोन मालिकांमध्ये राहुलने दक्षिण आफ्रिकेत खेळताना भारताचे नेतृत्व केले होते. आता मात्र तो मायदेशात एक नव्या कोऱ्या खेळाडूंचा संघ घेऊन आपले नशिब अजमविणार आहे. त्यामुळे क्रिकेटच्या सर्व प्रारूपांत नेतृत्वाच्या पहिल्याच सामन्यात हरण्याची मालिका खंडीत करण्याची सुुवर्णसंधी त्याच्याकडे आहे. दुर्देवाने भारत जर पहिल्या सामन्यात हरला तर क्रिकेटच्या तिनही प्रारूपात आपल्या नेतृत्वाच्या पहिल्याच सामन्यात पराभूत होण्याचा लज्जास्पद विक्रम त्याच्या नावे लागेल. तसे बघाल तर असे घडणारा तो जगातला किंवा भारताचा पहिलाच कर्णधार नसेल.
यापूर्वी जगातल्या सात कर्णधारांनी नेतृत्व केलेल्या वनडे, टि-२० व कसोटीच्या आपल्या पहिल्याच सामन्यात पराभवाचा सामना केला आहे. विशेष म्हणजे भारतीय क्रिकेट इतिहासातील आकडेवारीच्या हिशोबाने सर्वात यशस्वी कर्णधार विराट कोहलीचाही यामध्ये समावेश असून भारतातर्फे अशी नामुष्की पत्करण्यात विराट कोहली अग्रक्रमाचा कर्णधार असून के.एल राहुल या पंक्तीत बसतो का ? या प्रश्नाचे उत्तर येत्या नऊ जूनला नवी दिल्लीच्या अरूण जेटली स्टेडियमवर मिळेल. असं झालं तर तो असा नको असणारा पराक्रम करणारा जगातला आठवा तर भारताचा दुसरा कर्णधार असेल.
सन २०१४ मध्ये ऑस्ट्रेलियाविरूध्द पहिल्याच कसोटीत विराट कोहलीला कर्णधार म्हणून पराभवाचा सामना करावा लागला होता. तत्पूर्वी सन २०१३ मध्ये वनडे सामन्यात त्याने श्रीलंकेविरूध्द नेतृत्वाचा अपयशी श्रीगणेशा केला होता. तर सन २०१७ मध्ये भारताचे टि- ट्वेंटीत नेतृत्व करताना इंग्लंडने त्याला एका लाजिरवाण्या विक्रमाचा धनी बनविले.
क्रिकेटच्या तिनही प्रारूपात यापूर्वी न्यूझिलंडच्या स्टिफन फ्लेमिंग, दक्षिण आफ्रिकेच्या शॉन पोलॉक, श्रीलंकेच्या तिलकरत्ने दिलशान,न्यूझिलंडच्या ब्रेंडन मॅकलम, झिंबाब्वेच्या हॅमिल्टन मासाकादजा, झिंबाब्वेच्याच ग्रीम क्रिमर व भारताच्या विराट कोहलीच्या नावावर नेतृत्वाच्या पहिल्या सामन्यात हारण्याचा लाजिरवाणा पराक्रम आहे.
के.एल राहुलला स्वतःचे वेगळेपण सिध्द करण्यासाठी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पहिला टिट्वेंटी सामना जिंकावाच लागेल अन्यथा एका लाजिरवाण्या विक्रमाच्या पुस्तकात त्याची नोंद होऊ शकते.
लेखक -
डॉ.दत्ता विघावे
क्रिकेट समिक्षक.
इंटर नॅशनल मेंबर ऑफ वर्ल्ड पार्लमेंट,
मेंबर ऑफ युनायटेड नेशन्स ग्लोबल टॅलेंट पुल,
प्रतिनिधी भारत.
Email: dattavighave@gmail.com

