शिर्डी । प्रतिनिधी :
जळगाव जिल्ह्यातील चोपडा मतदार संघाच्या शिवसेनेच्या विद्यमान आमदार लताताई सोनवणे यांना आदिवासी मंत्रिपद द्यावे अशी मागणी आदिवासी विकास संघाचे संस्थापक अध्यक्ष प्रा.मोतीलाल सोनवणे,नामदेव (आप्पासाहेब) येळवे, धुळे जिल्हा अध्यक्ष संजय दावळे, जळगाव जिल्हा अध्यक्ष सागर सोनवणे, सल्लागार ॲड. गणेश सोनवणे, धुळे जिल्हा संपर्कप्रमुख साहेबराव वाकडे, धुळे तालुका अध्यक्ष प्रा.संदीप तवर, कर्मचारी अध्यक्ष अरुण सूर्यवंशी, हेमंत सोनवणे, अशोक काकुळदे, बुलढाणा जिल्हाध्यक्ष श्रीकृष्ण तायडे यांनी महाराष्ट्राचे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानानुसार महाराष्ट्रात ४७ जमाती आदिवासी साठी पात्र आहेत. राज्यातील आदिवासी जमातीच्या लोकांसाठी राबविण्यात येणाऱ्या योजनांसाठी आदिवासी विकास विभागाला मोठ्या प्रमाणात निधी दिला जातो. मात्र या निधीतून योजना राबविताना एकाच राज्यातील आदिवासी जनतेस सावत्र भावाची वागणूक दिली जाते. जातीचा दाखला व वैधता दाखल्यापासून आदिवासींना वंचित केले जाते. आदिवासींसाठी ज्या योजना राबवल्या जातात. त्या प्रत्यक्ष आदिवासींपर्यंत पोहोचत नाही. त्या योजना कागदावर पूर्ण केल्या जातात. मात्र प्रत्यक्ष आदिवासींना कोणताच लाभ होत नाही. गेल्या स्वातंत्र्यापासून जो आर्थिक दृष्ट्या गरीब आदिवासी आहे तसाच पिचलेल्या अवस्थेत आहे. हजारो वर्षापासून आदिवासींचा सामाजिक शैक्षणिक व राजकीय विकास झाला नाही. हे उघडे नागडे सत्य आहे.
महाराष्ट्रातील आदिवासी जमातीवर होत असलेल्या अन्याय दूर करण्यासाठी व आदिवासींना हक्क व संरक्षण मिळावे यासाठी आदिवासी महिलेला आदिवासी मंत्रीपद दिले तर खऱ्या अर्थाने फायदा होईल व आदिवासींचा सामाजिक शैक्षणिक व राजकीय विकास होईल. म्हणून नवीन मंत्रिमंडळात लताताई सोनवणे यांना आदिवासी मंत्रीपद दिले तर महाराष्ट्रातील संपूर्ण आदिवासी जमात आपल्या पाठीशी खंबीरपणे उभी राहील. म्हणून लताबाई सोनवणे यांना आदिवासी मंत्रिपद द्यावे असे निवेदन सादर करण्यात आले.

