विजयाचा खजिनाच सापडावा तसा सलग चौदा टि ट्वेंटी आंतरराष्ट्रीय सामने जिंकण्याचा विश्वविक्रम व भारताचे अधिकृत कर्णधारपद मिळविल्यानंतर सलग विस सामने जिंकण्याचा पराक्रम करताना रोहित शर्माने इंग्लंडला त्यांच्याच धर्तीवर चारीमुंडया चित करताना तीन सामन्यांच्या मालिकेत दोन - शुन्य अशी विजयी आघाडी घेतली असताना मालिकेत इंग्लंडला ब्लॅकवॉश देण्याच्या उंबरठ्यावर भारतीय संघ उभा आहे.
पहिला सामना ५० धावांनी जिंकल्या नंतर दुसऱ्या सामन्यात ४९ धावांचा मोठा विजय टिम इंडियाला मिळाला. भारताने दुसरा सामना जिंकला असला तरी या सामन्यात फलंदाजीत केलेला गलथानपणा विजयामुळे झाकला गेला. मुळात संघ निवड करताना विनिंग कॉम्बीनेशन तोडले. सध्या तुफान फॉर्मात असलेल्या व सकारात्मक दृष्टीकोनातून खेळणाऱ्या अष्टपैलू दिपक हुडाला डावलून केवळ मोठं नाव असलेल्या विराट कोहलीला संघात घेणं केवळ हुड्डासाठीच नाही तर संपूर्ण टिम इंडियासाठी घातक ठरलं असतं. सुदैवाने रविंद्रा जडेजाने डाव सावरला व गोलंदाजांनी विजयी कळस रचला त्यामुळे हा वादग्रस्त मुद्दा फारसा चर्चिला जाणार नाही. परंतु मागील तीन वर्ष धावांसाठी झगडणाऱ्या विराट कोहलीला विनाकारण खेळविले जात आहे. त्यामुळे हुड्डासारखा प्रतिभावान खेळाडू निराश होऊन हात चोळत मैदान बाहेर बसला आहे. वारंवार संधी मिळूनही कोहली झालेल्या चुकांमधून काहीही धडा शिकत नसल्याचे दिसत आहे. आगामी विश्वचषकासाठी कोहलीसारखा लंगडा घोडा संघात असणं म्हणजे निम्मी शर्यत घरीच हरल्यासारखे ठरणार आहे. त्यामुळे कोहलीला त्याच्या मागच्या कामगिरीच्या आधारे संधी देणे म्हणजे
संघाच्या पायावर कुऱ्हाड मारून घेण्यासारखेच ठरत आहे.
माजी कर्णधार कपिलदेवनने तर स्पष्ट शब्दात कोहलीला संघात खेळविण्यावर तिखट प्रतिक्रिया दिली आहे. कपिलच्या म्हणण्यानुसार भारताचा ४५० पेक्षा जास्त कसोटी बळी घेणारा व फॉर्मात असलेला नंबर एक गोलंदाज रविचंद्रन आश्विनला संघातून डच्चू दिला जातो तर तीन वर्षापासून धावांसाठी मोताज झालेल्या कोहलीचे लाड का पुरविले जातात ?
करूण नायर भारताकडून कसोटीत त्रिशतक करणारा सेहवागनंतरचा एकमेव खेळाडू ठरला असताना त्यालाही नंतरच्या सामन्यातून वगळले होते. त्यानंतर त्या गुणी खेळाडूचे भारतीय क्रिकेटच्या पटलावरून नामोनिशाण मिटले. तशी गत कोहलीसाठी दिपक हुड्डा सारख्या गुणी खेळाडूची होऊ नये.
संघाचा प्रमुख घटक असलेल्या बुमराहासाठी नवोदित अर्शदिप सिंगला वगळणे हा निर्णय सुद्धा कोणालाच पटणारा नव्हता. भारतात डावखुऱ्या वेगवान गोलंदाजांची वाणवा असताना आपल्या पदार्पणाच्या सामन्यातच प्रभावी व आश्वासक कामगीरी करणाऱ्या अर्शदिपला संधी देऊन त्याच्यातला आत्मविश्वास वाढविणे महत्वाचे असताना त्याला वगळणे म्हणजे या गुणवान खेळाडूंचा आत्मविश्वास खलबत्यात घालून ठेचण्यासारखाच आहे. वास्तविक सातत्याने खेळणाऱ्या बुमराहाला आराम दिला असता तर काही फरक पडणार नव्हता. पण एकमेकांचे हित जपण्याच्या नादात संघाचं नुकसान होतंय हे या महाविचारवंताना कोण समजवणार ?
रिषभ पंतला सलामीला खेळविणे हा प्रयोग असला तरी ईशान किशन, के.एल राहुल , ऋतूराज गायकवाड, संजू सॅमसन या निव्वळ सलामीवीरांनी काय नंतर भाजीपाला विकण्याचा धंदा करायचा का ? पंतला मधल्या फळीतच खेळवावे व त्याच्या यष्टीरक्षणात अजून सुधारणा कशा होतील याकडे टिम मॅनेजमेंटने लक्ष देणे गरजेचे असताना पंतच्या बाबत एक ना धड भाराभर चिंध्या हा प्रकार व्हायला नको.
आगामी विश्वचषकाच्या तयारीच्या दृष्टीने हे प्रयोग असतीलही पण फॉर्मात असलेल्या नवोदितांचे खच्चीकरण केलेच पाहिजे असे कोणत्या ग्रंथात लिहीले आहे ?
इंग्लंडविरुद्ध झालेल्या दुसऱ्या
टि-२० सामन्याचा विचार केला तर भारतीय फलंदाजांचा आक्रमकपणे खेळण्याचा प्रकार धाडसी वाटला. मात्र या दरम्यान आपल्या विकेटचे महत्व व संघाचे हित जपणेही गरजेचे आहे. निव्वळ हाराकिरी करून विजय साध्य होणार नाहीत. कर्णधार रोहित व रिषभ पंतने झोकात सुरुवात केली खरी परंतु पाच महत्वाचे फलंदाज केवळ २८ धावात गमविणे संघासाठी घातक ठरणारे होते. केवळ रविंंद्र जडेजाची फलंदाजी चालली म्हणून वेळ धकली व संघाला १७० ही सामन्यात आव्हान टिकवून ठेवणारी धावसंख्या रचता आली.
त्यानंतर भुवनेश्वरने आपले उग्ररूप सलग दुसऱ्या सामन्यात कायम ठेवत इंग्रज फलंदाजांना सुरूवातीलाच हादरे दिले. त्यानंतर बुमराहा व यजुवेंद्र चहलने आपले कार्य इमाने इतबारे पार पाडल्याने इंग्लंडला मान वर करण्याची संधीच मिळाली नाही. परिणामत: भारताला मोठा विजय मिळाला, मालिकेत विजयी आघाडी साधता आली व इंग्लंडला क्लिन स्वीप देण्याची संधी निर्माण केली.
लेखक -
डॉ.दत्ता विघावे
क्रिकेट समिक्षक.
इंटर नॅशनल मेंबर ऑफ वर्ल्ड पार्लमेंट,
मेंबर ऑफ युनायटेड नेशन्स ग्लोबल टॅलेंट पुल,
प्रतिनिधी भारत.
Email: dattavighave@gmail.com

