आपण करत असलेले कोणतेही सामाजिक काम छोटे नसते - डॉ. मंजु फडके
रोटरी क्लब ऑफ इंदापूरचा पदग्रहण समारंभ संपन्न : अध्यक्षपदी नरेंद्र गांधी तर सचिवपदी सुनिल मोहिते यांची निवड
फोटो : रोटरी क्लब ऑफ इंदापूरचे सन २०२२ -२३ या वर्षीच्या पदाधिकारी यांचा पदग्रहण समारंभ डि.जी.ई. डॉ. मंजु फडके यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला.
इंदापूर ( प्रतिनिधी ) : रोटरी क्लबच्या माध्यमातून दरवर्षी १०० कोटी रुपयांचे सामजिक उपक्रम सक्रियपणे राबविले जातात. जागतिक स्तरावर पोलिओ लसीकरणासाठी तर अब्जावधी रुपये दरवर्षी रोटरी खर्च करत असते. जगभरात सर्वाधिक देशात रोटरी क्लब आहेत. ज्या ठिकाणी युनेस्को पोहचू शकले नाही तेथे रोटरी क्लब पोहचले आहे. त्यामुळे आपण करत असलेली कोणतेही सामजिक काम छोटे नाही. असे प्रतिपादन रोटरी डिस्ट्रिक्ट ३१३१ चे नियुक्त प्रांतपाल डॉ. मंजु फडके यांनी केले.
रोटरी क्लब ऑफ इंदापूर चे सन २०२२ -२३ चा पदग्रहण समारंभ सोमवार ( दि. ११ जुलै ) रोजी राधिका रेसिडेन्सी क्लब येथे थाटात पार पडला. यावेळी रोटरी क्लब ऑफ इंदापूरचे संस्थापक अध्यक्ष प्रदीप गारटकर, संस्थापक उपाध्यक्ष मुकुंद शहा, डि.जी.ई डॉ. मंजु फडके, डिस्ट्रिक्ट मेडिकल डायरेक्टर पल्लवी साबळे, असिस्टंट गव्हर्नर निखील मुथा, रोटरी क्लब ऑफ इंदापूरचे नूतन अध्यक्ष नरेंद्र गांधी, सचिव सुनिल मोहिते, खजिनदार नितीन शहा, माजी अध्यक्ष उदय शहा, माजी सचिव भिमाशंकर जाधव उपस्थित होते.
पुढे बोलताना डॉ. मंजु फडके म्हणाल्या की, तुम्ही योजलेल्या गोष्टी चांगल्याच असतात, मात्र नेतृत्व म्हणून तुमचे कार्यवाही शुद्ध व चांगली झाली पाहिजे. तेव्हाच तुमचा हेतु पूर्ण होत असतो. कृतीपेक्षा माणसांचा हेतु काय आहे. याकडे लक्ष दिले पाहिजेत, तेव्हाच माणसे वाचता येतात. आपण समाजाला देत असताना आपली तत्वे चांगली ठेवा, तेव्हाच इतरांशी आपली प्रेमाची नाळ जोडली जाईल तसेच जगाला फसविणारे शांत झोपू शकत नाही. हे उदाहरणासह स्पष्ट करीत, रोटरी क्लब ऑफ इंदापूर मध्ये वर्षभरात महिला सदस्यांची संख्या वाढली पाहिजेत अशी अपेक्षा यावेळी डॉ. मंजु फडके यांनी व्यक्त केली.
तसेच यावेळी बोलताना रोटरी क्लब ऑफ इंदापूरचे संस्थापक अध्यक्ष प्रदीप गारटकर म्हणाले की, राजकारणा व्यतिरिक्त चांगले व्यासपीठ निर्माण होण्यासाठी आम्ही हे रोटरी व्यासपीठ तयार केले. मागील बारा वर्षात उत्कृष्ट कामकाज केले. योगगुरू रामदेव बाबा यांनाही इंदापूर रोटरी क्लबने आणले होते. इंदापूर क्लबने उत्कृष्ठ प्रोजेक्ट राबविले आहेत. राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावरून चांगले प्रोजेक्ट आणले आहेत. त्यामुळे सामाजिक वातावरण निर्माण झाले आहे. तसेच उत्तम व्यक्तीमत्व विकास रोटरीच्या माध्यमातून अनेकांचा झाला आहे.
यावेळी माजी रोटरी अध्यक्ष उदय शहा यांनी नरेंद्र गांधी यांना अध्यक्षपदाची कॉलर प्रधान केली तर डि.जी.ई. डॉ. मंजु फडके यांनी पिन प्रधान करून सत्कार केला. तर स्टार पिन ज्ञानदेव डोंबाळे यांना प्रधान करण्यात आली. तसेच पी.एच.एफ, पिन नंदकुमार गुजर यांना प्रधान करण्यात आली. यावेळी नुतन अध्यक्ष नरेंद्र गांधी म्हणाले, येणाऱ्या वर्षभरात जास्तीत जास्त सामजिक उपक्रम राबविण्यात येतील. अशी ग्वाही दिली.
यावेळी रोटरी क्लब ऑफ इंदापूरच्या सन २०२२-२३ च्या पदाधिकारीपदी, प्रेसिडेंट इलेक्ट आझाद पटेल, क्लब ट्रेनर संजय दोशी, मेंबरशिप नंदकुमार गुजर, फाऊंडेशन ज्ञानदेव डोंबाळे, आय. टी. राकेश गानबोटे, हॅप्पी व्हिलेज प्रशांत भिसे, क्लब प्रशासन तुषार रंजनकर, पब्लीक इमेज धरमचंद लोढा, सर्व्हिस प्रोजेक्ट वसंत मालुंजकर, फेलोशिप सुधिर तांबिले, युथ डायरेक्टर संदिप वाशिंबेकर, सार्जन्ट ऑफ आर्म्स प्रशांत सिताप, लिटरशी प्रशांत घुले, स्पोर्ट दत्तात्रय व्यवहारे, न्यु जनरेशन मोरेश्वर कोकरे, पर्यावरण महेंद्र रेडके, कल्चरल प्रमोद भंडारी यांची निवड करून जबाबदारी देण्यात आली.
यावेळी नवीन सदस्य पारसमल बागरेचा, महेंद्र गुंदेचा, मनोहर हेंद्रे, हरिदास गवळी, समीर सुर्यवंशी, प्रकाश खंबासवाडकर, प्रकाश बलदोटा उपस्थित होते. तसेच रोट्रॅक्ट क्लब ऑफ इन्द्रेश्वरचे अध्यक्ष मच्छिंद्र किरकत, सागर शिंदे, अमोल आवटे, सचिन चौगुले, धनंजय जाधव उपस्थित होते. यावेळी प्रमोद भंडारी यांनी 'ओ राही रुक जाना नहीं, तू चलते चलते' हे सुरेल गीत सादर केले. तर सूत्रसंचालन प्रशांत शिताप व प्रशांत घुले यांनी केले तर आभार सुनील मोहिते यांनी मानले.
चौकट : प्रदीप गारटकर व मुकुंद शहा यांच्या दूरदृष्टीचा फायदा
बारा वर्षांपूर्वी समाजातील गोर गरिबांना मदत करण्याचा उदात्त हेतू डोळ्यांसमोर ठेवून, सदन नागरिकांकडून सामाजिक सेवा घडावी हे ध्येय ठेवून, रोटरी क्लब ऑफ इंदापूर हे बीज इंदापूर तालुक्यात संस्थापक अध्यक्ष प्रदीप गारटकर, संस्थापक उपाध्यक्ष मुकुंद शहा यांनी रोवले. त्या बीजाचे आज वटवृक्षात रुपांतर झाले. त्यामुळे प्रदीप गारटकर व मुकुंद शहा यांच्या दूरदृष्टीचा फायदा नागरिकांना होत आहे. असे गौरवउद्गार डॉ. मंजु फडके यांनी काढले.

