शिर्डी एक्स्प्रेस लाईव्ह वृत्तसेवा अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी- दिपक हरिश्चंद्रे. बुधवार दिनांक १३ जुलै २०२२
कापूस पीक अर्थात शेतकरी राजाचे पांढरे सोने ; जाणून घेऊया या पिकाबद्दल साविस्तर महिती..!!
कृषी सल्ला :
लेखन: श्री. सोनवणे सतीश भास्कर
(BSc Agri. MBA)
९५४५०२०३४३
पीक - कापूस : पिकात काही गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात. यापैकी मुख्य गोष्ट म्हणजे त्या रानाची नांगरट ही खूप खोल होणे गरजेचे आहे, तसेच त्या जमिनीची 2 वेळेला वखरणी करावी. याशिवाय आपल्या शेतातील काडी, कचरा, धसकटे हे सगळे वेचून त्याचा नायनाट करावा.
आता आपण पाहूया पिकांच्या अवस्थेनुसार पिकाला काय देणे गरजेचे आहे किंवा काय काळजी घ्यावी लागते.
१.मूलभूत खत नियोजन :
लागवडीपूर्वी कापूस पिकास डी.ए. पी. ५० किलो आणि पालाश २५किलो प्रति एकरी द्यावे.
२.तण नियंत्रण :
लागवडीनंतर लगेच व पाणी देण्यापूर्वी कापूस पिकास पेंडामिथिलीन ३८.७ % सीएस (Pendimethalin38.7% cs) हे ५०० मिली प्रति एकर या प्रमाणात फवारावे.
३. वाढीची अवस्था :
अ) कापूस पिकात वाढीची अवस्था म्हणजे लागवडी नंतर 30 दिवसापर्यंत असते. जर ठिबक सिंचन व्यवस्था असेल तर साधारण ०८ ते १० दिवसाच्या दरम्यान पिकास नत्र स्फुरद पालाश हे दिले गेले पाहिजे.
आ) साधारण पीक 10 ते 11 दिवसाचे झाले की कापूस पिकास आळवणी करणे गरजेचे असते, यामुळे पीक निरोगी राहण्यास मदत होते आणि वाढ उत्तम होते.
इ) जेव्हा पीक 5 ते 6 पानावर असते तेव्हा आपण साधी कीटकनाशक फवारणी करणे गरजेचे असते. इथून पुढे पिकावर रसशोषण करणाऱ्या किडीचा प्रादुर्भाव दिसून येयला लागतो अश्या वेळेस आपण एकात्मिक कीड व्यवस्थापन करून कीड नियंत्रण करणे गरजेचे असते, तसेच प्रादुर्भाव जास्त असेल तर फवारणी सुद्धा घ्यावी.
४. अंकुर किंवा चौरस निर्मिती :
यालाच चौकी अस म्हणतात. या काळात पिकाला सगळ्यात जास्त गरज असते ती म्हणजे अन्नद्रव्ये. या काळात पिकास नत्र स्फुरद आणि सूक्ष्म अन्नद्रव्ये द्यावे तसेच आपल्या कडे जर ठिबक असेल तर या काळात ठिबकद्वारे सुद्धा नत्र आणि स्फुरद दिले गेले पाहिजे . या सोबत एकात्मिक कीड नियंत्रण पण गरजेचे आहे.
५. फुलोरा अवस्था :
पिकामध्ये ही अवस्था ४५ दिवसाच्या पुढे सुरू होते आणि याच अवस्थेत नेमके पिकावर बोडंअळी चा पतंगाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असते. यासाठी आपण याकाळात फवारणी जरूर करावी जेणेकरून पतंग वर नियंत्रण मिळवता येईल. कापूस पिकास फुलोरा अवस्थेत नत्र स्फुरद पालाश तसेच मॅग्नेशियम सल्फेट हे वरखते देने गरजेचे असते. बोण्डअळी नियंत्रण करण्यासाठी या अवस्थेत एकात्मिक कीड नियंत्रण जरूर करावे.
६. फळ विकास :
जसे की आपण फुलोरा अवस्था असताना बोडंअळी नियंत्रण साठी फवारणी घेतली होती तसेच फुलांचे फळात रूपांतर होत असताना सुद्धा फवारणी आवश्यक आहे. ठिबकद्वारे या काळात फळाची वाढ आणि विकास होण्यासाठी नत्र स्फुरद पालाश दिले गेले पाहिजे. जर पीक जास्त उंच वाढत असेल तर या काळात आपण शेंडा खुडून घेणे गरजेचे आहे नाहीतर पिकास फळ संख्या कमी लागते.
७. फळांचे तोंड उघडणे प्रक्रिया :
कापूस पिकात ही अवस्था साधारण पणे ६५ दिवसाच्या पुढे येते. हा काळ उत्पादन च्या दृष्टीने खूप महत्वाचा असतो या काळात अन्नद्रव्ये जर कमी पडले तर फळाची गळ होते तसेच फळांचे तोंड व्यवस्थित उघडत नाही परिणामी पिकांच्या उत्पादन वर परिणाम झालेला आपणास दिसून येतो. यासाठी पिकास ठिबकद्वारे नत्र आणि पालाश हे द्यावे आणि फवारणी द्वारे कॅल्शियम, बोरॉन तसेच NAA दिले पाहिजे. सदर कालावधीत पिकावर पांढरी माशी , तुडतुडे यांचा प्रादुर्भाव झालेला आपणास दिसून येईल यासाठी फवारणी करणे गरजेचे आहे, याशिवाय नत्र ,स्फुरद, पालाश आणि सूक्ष्म अन्नद्रव्ये यांची फवारणी गरजेची आहे. पीक या अवस्थेत असताना आपल्या कडे पाऊस पण जास्त असतो त्यामुळे रसशोषण करणाऱ्या किडी तसेच बुरुशीचा प्रादुर्भाव पिकावर प्रामुख्याने झालेला आपणास दिसेल त्यासाठी वेळेवर पीकास बुरशीनाशक आणि कीटकनाशक यांची फवारणी घ्यावी.
शेतकरी बंधुनो या प्रकारे जर आपण पीक व्यस्थापन केले तर नक्कीच आपण कीड आणि रोगमुक्त कापूस पीक उत्पादन घेऊ शकतो तसेच आपल्या उत्पादनात भर पडलेली आपणास नक्की जाणवेल.
लेखन: श्री. सोनवणे सतीश भास्कर
(BSc Agri. MBA)
९५४५०२०३४३.
Shirdi Express Live🎥#करीता बातम्या📰🗞️ आणि जाहिराती 🖼️साठी संपर्क @दिपक हरिश्चंद्रे (अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी )📲7350591600

