shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

जयमानांना चारीमुंडया चित करत भारताची टि२० मालिकेत आघाडी !



        वेस्ट इंडिज दौऱ्यावर असलेल्या टिम इंडियाने नवोदित खेळाडूंच्या साह्याने तीन एक दिवसीय सामन्यांची मालिका विंडीजची स्वच्छ सफाई करताना आरामात खिशात घातली. त्यानंतर होणाऱ्या पाच टि ट्वेंटी सामन्यांच्या मालिके करता नियमित कर्णधार रोहित शर्मा, रविंद्र जडेजा, रविचंद्रन आश्विन, रिषभ पंत, भुवनेश्वर कुमार हे अनुभवी खेळाडू संघात परतल्याने संघाची ताकद वाढली. वेस्ट इंडिज संघ मायदेशात खेळत आहे. त्याचबरोबर त्यांचे खेळाडू पूर्णपणे टि- ट्वेंटीच्या धाटणीचे असल्याने व संपूर्ण जगभरातील टि- ट्वेंटी लिगमध्ये खेळण्याचा गाढा अनुभव त्यांच्या पाठीशी असल्याने भारताशी ते तुल्यबळ लढत देतील अशीच सर्वांची अपेक्षा होती. मात्र प्रत्यक्षात सामन्या दरम्यान त्याचा कुठला लवलेशही दिसला नाही. भारताने खेळाच्या सर्वच क्षेत्रात विंडीजला निष्प्रभ करत ६७ धावांचा मोठा विजय मिळवून मालिकेत १-० अशी आघाडी घेतली.

           नाणेफेकीचा कौल हाच काय तो विंडिजसाठी या सामन्यातील एकमेव आनंदाच क्षण होता. बाकी त्यांची संघ निवड व मैदानातील खेळ यांच्यात सर्वत्र आनंदी आनंदच दिसला. कोणताही संघ परदेश दौऱ्यावर गेल्यानंतर त्यांना प्रथम तेथील वातावरणात जुळवून घेण्यास वेळ लागतो. परंतु भारतीय संघ येथील वातावरण जणू आपलेच असल्यासारखा वावरत असल्याने विंडीजवर कुरघोडी करण्याच्या पहिल्या पायरीवर भारी पडले. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे कुठल्याही परदेशी संघापेक्षा यजमान संघ मैदानाचा इतिहास, खेळपट्टीचा रागरंग ओळखण्यात वाकबगार असतो. परंतु पहिला टि ट्वेंटी सामना त्रिनिदादच्या ज्या ब्रायन लारा स्टेडियमवर झाला तेथील खेळपट्टीचा नूर ओळखण्यात यजमान कर्णधार निकोलस पूरन व त्यांचे संघ प्रबंधन साफ फसले. तर त्याच्या उलट भारताचा कर्णधार रोहित शर्मा व प्रशिक्षक राहुल द्रविड भारी भरले. 

          या मैदानावरील खेळपट्टी काहीसी मंद असून जलदगती गोलंदाजांपेक्षा फिरकी गोलंदाजांना येथे यश मिळते. तर सामना जसजसा पुढे सरकतो तसतसा फलंदाजांना फलंदाजी करताना त्रास होतो. या बाबींचा अभ्यास करून भारताने तीन शुध्द फिरकी गोलंदाज रविंद्र जडेजा, रविचंद्रन आश्विन व रवि बिश्नोई यांना संघात स्थान दिले. यानंतर सुर्याचे नावातच तेज व उर्जा असलेल्या या फिरकी त्रिकूटाने करिश्माई कामगिरी करून विंडीजला सामन्यातूनच बाहेर केले.  तर विंडीजने केवळ अकील हुसेन या एकमेव फिरकी गोलंदाजाला खेळविले व त्यानेही भारताच्या मातब्बर फलंदाजांना चांगल्या पैकी सतावले. त्यामुळे विंडीज कर्णधाराचा संघ निवड करण्याचा निर्णयच चुकल्याचे सिध्द झाले व हेच त्यांच्या पराभवाचे प्रमुख कारण ठरले.

           आगामी टि२० विश्वचषक स्पर्धेच्या तयारीचा भाग असलेल्या या मालिकेतही भारताने आपले प्रयोग करण्याचे काम सुरू ठेवताना फलंदाजीच्या क्रमवारीत मोठे फेरफार केले,  मात्र ते सफसेल कोसळल्याने संघ अडचणीत आला होता. कर्णधार रोहित शर्मा आपल्या लौकीकानुसार खेळला ( ४४ चेंडूत ६४ धावा ) तर सलामीला संधी मिळालेला सुर्यकुमार यादव ( १६ चेंडूत २४ धावा ) हा प्रयोग काहीसा फसला परंतु या दोघांची ४४ धावांची भागीदारी संघाचा पाया मजबूत करून गेली. त्यानंतर श्रेयस अय्यर (५ चेंडूत शुन्य), हार्दिक पांड्या ( ३ चेंडू १ धाव ) रिषभ पंत (१२ चेंडूत १४ धावा) रविंद्र जडेज १६ धावा यांचे पाठोपाठ बाद झाल्याने संघ संकटात सापडला होता. मात्र संघात खास फिनिशर म्हणून घेतलेल्या अनुभवी दिनेश कार्तिकने १९ चेंडूत केलेल्या नाबाद ४१ धावांच्या खेळीने भारताला १९० ही सामना जिंकून देणारी धावसंख्या रचण्यास मदत झाली. तर शेवटी १० चेंडूत नाबाद १३ धावा फटकविणाऱ्या आर.आश्विनसह त्याने सातव्या विकेटसाठी केलेली ५२ धावांची भागीदारी महत्वाची ठरली. कार्तिकची हिच धडाकेबाज कामगिरी त्याला सामनावीर ठरविण्यास पुरेशी ठरली.

           प्रत्युत्तरात विंडीज संघ भारतीय गोलंदाजांच्या अचूक व टिच्चून केलेल्या माऱ्यासमोर पुरता हतबल झालेला दिसला.पूर्ण विस षटके ते खेळले मात्र ८ बाद १२२ धावाच त्यांना करता आल्याने त्यांना ६७ धावांचा मोठा पराभव पत्करावा लागला.   किमो पॉलची नाबाद बावीस धावांची खेळी विंडीजच्या डावातील सर्वोच्च खेळी होती. यावरून प्रत्यक्ष सामन्यात काय झाले याचा अंदाज लगेच येतो. भारताकडून नवोदित डावखुरा वेगवान अर्शदिप सिंग, लेगस्पिनर रवि बिश्नोई व अनुभवी फिरकीपटू रविचंद्रन आश्विन यांनी अंतिशय प्रभावी मारा करताना प्रत्येकी दोन बळी घेतले. तर रविंद्र जडेजा व भुवनेश्वर कुमारला प्रत्येकी एक गडी बाद करता आला. हार्दिक पांड्याने चांगली गोलंदाजी केली परंतु या सामन्यात बळी काही त्याच्या नशिबी नव्हते.

            विंडीजच्या डावात अर्शदिप सिंगचे अचूक टप्प्यावरील यॉर्कर्स तर बिश्नोईची फसवी लेगस्पीन विंडीज फलंदाजाच्या आकलन शक्तीच्या बाहेरचा विषय दिसली तर आश्विननेही आपला पूर्ण अनुभव पणास लावून काटकसरीने धावा देत बळीही मिळविले. विंडीज कडून काईल मेयर्स ११, ब्रुक्स २०, जेसन होल्डर शुन्य, निकोलस पूरन १८, रोवमन पॉवेल १४, हेटमायर १४, ओडियन स्मिथ शुन्य, अकील हुसेन ११, किमो पॉल नाबाद २२, अल्झारी जोसेफ नाबाद पाच अशी खराब कामगिरी झाली. त्यामुळे विंडीजला एका लाजिरवाण्या पराभवाचा सामना करावा लागला.

            विश्वचषक स्पर्धा जसजशी जवळ येत आहे तसतसे संघात प्रयोग केले जात आहेत. त्यातील बरेचसे यशस्वी ठरत आहेत. तर काही नवोदित खेळाडू चमकदार कामगिरी करत असल्याने १६ जणांचा संघ निवडताना निवड समितीला तारेवरची करावी लागणार हे आता उघड झाले आहे.

लेखक -
डॉ.दत्ता विघावे
क्रिकेट समिक्षक. 
इंटर नॅशनल मेंबर ऑफ वर्ल्ड पार्लमेंट,
ग्लोबल वर्कींग कमिटी मेंबर ऑफ डब्ल्यूसीपीए.
मेंबर ऑफ युनायटेड नेशन्स ग्लोबल टॅलेंट पुल,
प्रतिनिधी भारत. 
Email:  dattavighave@gmail.com
close