shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

वर्ल्ड टेस्ट चँपियनशिपच्या अंतिम फेरीत पोहोचण्यास टिम इंडियाचा मार्ग बनला खडतर !



         पहिल्या विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा विश्वविजेता न्यूझिलंड व उपविजेता भारत यांचे दुसऱ्या "वर्ल्ड टेस्ट चॅंपीयनशिप" स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहोचण्याचा मार्ग काहीसा बिकट बनला असून गत उपविजेत्या भारताला चमत्कार करण्याची आशा जिवंत असली तर गतविजेत्या न्यूझिलंडला अंतिम फेरीचे तिकीट मिळण्याची सुतराम शक्यता दिसत नाही, कारण या वर्षी दहा संघाच्या गुणतालिकेत आश्चर्यकारकरित्या त्यांची नवव्या स्थानावर घसरण झाली आहे.


          सध्या श्रीलंकेची आर्थिक व राजकीय परिस्थिती भयावह आहे. मात्र क्रिकेटमध्ये खास करून कसोटीच्या विश्व अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम फेरीच्या दृष्टीने त्यांची परिस्थिती मजबूत दिसते. त्यांच्या देशातील राजकीय घटनाक्रमाप्रमाणे जर काही विपरीत घडले तरच त्यांना डब्ल्यूटीसीच्या अंतिम फेरीस मुकावे लागेल. ऑस्ट्रेलिया विरूध्द दोन कसोटी सामन्यांची मालिका नुकतीच श्रीलंकेत संपन्न झाली. पहिली कसोटी ऑस्ट्रेलियाने आरामात खिशात टाकल्यानंतर दुसरा सामनाही कांगारू सहज जिंकून मालिका २-० अशी खिशात टाकतील अशी आशा होती. परंतु दुसऱ्या कसोटीत पदार्पण करणारा फिरकी गोलंदाज प्रभास जयसुर्याच्या ( ६ + ६ ) बारा बळी व दिनेश चांडिमलच्या द्विशतकाच्या जोरावर श्रीलंकेने एक डाव व ३९ धावांनी विजय मिळवित मालिका बरोबरीत आणली. त्यामुळे श्रीलंकेने गुणतालिकेत तिसऱ्या स्थानी झेप घेतली. त्याचबरोबर डब्ल्यूटीसीच्या फायनल मध्ये पोहोचण्याच्या आशा जिवंत ठेवल्या.
          श्रीलंकेविरूध्द झालेल्या पराभवाचा मोठा फटका गुणतालिकेत अव्वल स्थानी असलेल्या ऑस्ट्रेलियाची दुसऱ्या स्थाानावर घसरण झाली. श्रीलंकेची विजयाची सरासरी ५४.१७ टक्के इतकी असून त्यांना राहिलेले चार सामने जिंकावेच लागतील. येत्या दोन जुलैपासून श्रीलंका मायदेशात पाकिस्तानविरूध्द दोन कसोटींची मालिका खेळणार असून त्यांना पाकिस्तानला २-० असे हरवावे लागेल. त्याशिवाय न्यूझिलंड विरूध्दच्या दोन पैकी किमान एका कसोटीत त्यांना विजय मिळवावाच लागेल. त्यानंतर त्यांच्या जवळ ६१.११ इतके सरासरी गुण असतील.
          डब्ल्यूटीसीच्या पहिल्या वर्षी भारत गुणतालिकेत पहिल्या स्थानावर होते. मात्र यावेळी त्यांची थेट पाचव्या स्थानावर घसरण झाली आहे. भारताचे अजून सहा सामने बाकी असून ऑस्ट्रेलियाविरूध्द मायदेशात चार व बांगलादेशात दोन सामने खेळायचे आहे. इतकेच नाही तर भारताला ते सर्व जिंकावाच लागतील. एवढे करूनही भारताचे ६८.०५ इतकी विजयी गुणांची सरासरी होईल,  तरीही भारताला इतर देशांच्या कामगिरीवर विसंबून राहावे लागेल.
          सन २०२१ इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत पहिल्या कसोटीवर भारताचे पूर्ण वर्चस्व होते. मात्र पावसाने भारताचा विजय मिळाला. तर तिसऱ्या सामन्यात भारताची फलंदाजी दुसऱ्या डावात केवळ ७८ धावात गडगडली आणि एक दारूण पराभव ओढावला. याच मालिकेतील पाचवा कसोटी कोरोना संक्रमणामुळे १ ते ५ जुलै २०२२ मध्ये खेळला गेला. त्यामध्येही सामन्यावर पूर्ण वर्चस्वानंतर चौथ्या दिवशी इंग्लिश फलंदाजांच्या चमत्कारीक फलंदाजी नंतर भारताला हातचा सामना गमवावा लागला. 
           तत्पूर्वी भारतात कानपूर कसोटीत न्यूझिलंड शेवटचा बळी मिळविण्यात गोलंदाज कमी पडले व हातातोंडाशी आलेला विजय अनिर्णित सामन्यात परावर्तीत झाला. त्यानंतर टिम इंडिया द. आफ्रिका दौऱ्यावर गेली. तेथे पहिला कसोटी जिंकल्यानंतर राहिलेले दोन्ही सामने तुलनेने कमजोर असलेल्या द. आफ्रिकेने जिंकून भारताच्या अपेक्षांना सुरूंग लावला. आता मात्र हे सगळे पराभव भारताला सलत आहेत.
           भारतावरील अनपेक्षित विजयानंतर द. आफ्रिकेने ७१.४३ सरासरी गुणांसह अव्वल क्रमांक मिळविला असून अंतिम फेरीचे दरवाजे स्थांच्यासाठी सताड उघडे आहेत. त्यांनाही अजून दोन सामने मायदेशात व तीन ऑस्ट्रेलियात खेळायचे आहेत. मायदेशात ते जिंकतील हे ग्राह्य धरून ऑस्ट्रेलिया १-२ असे हारले तरीही ते ६५ टक्क्यांपर्यंत पोहोचतील.
          सध्या गुणतालिकेत चौथ्या स्थानावर असलेल्या पाकिस्तानला मायदेशात पाच व श्रीलंकेत दोन सामने खेळायचे आहेत. मायदेशात ते कमीत कमी तीन विजय मिळवू शकतात तर श्रीलंकेत १- १ अशी जरी बरोबरी झाली तरी त्यांची अंतिम गुण सरासरी ६५ पर्यंत पोहोचू शकते.
वरील सर्व संघात आकडेवारी पाहिली तर अंतिम फेरीत पोहोचण्यासाठी भारताला मोठा संघर्ष करावा लागणार असून दैवाची साथ, प्रमुख खेळांडूची तंदुरूस्ती व संघातील अंतर्गत राजकारण या गोष्टी भारताला कशा साथ देतात यावरच बरंच काही अवलंबून आहे.

लेखक -
डॉ.दत्ता विघावे
क्रिकेट समिक्षक. 
इंटर नॅशनल मेंबर ऑफ वर्ल्ड पार्लमेंट,
मेंबर ऑफ युनायटेड नेशन्स ग्लोबल टॅलेंट पुल,
प्रतिनिधी भारत. 
Email:  dattavighave@gmail.com
close