लोकनेते शहाजीराव पाटील विद्यालयात कारगिल विजय दिवस साजरा...
"राखी कृतज्ञतेची... राष्ट्रभुमीच्या रक्षणाची"
इंदापूर प्रतिनिधी:बोराटवाडी येथील लोकनेते शहाजीराव पाटील माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालया मध्ये कारगिल विजय दिवस साजरा करण्यात आला व या दिनाचे औचित्य साधून विद्यार्थीनींनी तयार केलेल्या राख्या व विद्यार्थ्यांनी लिहलेले शुभेच्छा पत्र सिमेवरील रक्षण करणाऱ्या सौनिकांसाठी ११ मराठा बटालियन चे सुभेदार मेजर जयपाल भोसले, माजी सैनिक स्वप्निल सावंत, गौतम वीर तसेच विद्यालयाचा माजी विद्यार्थी व सध्या भारतीय सैन्य दलात कार्यरत असणारे शेखर खाडे यांच्या शुभहस्ते पाठवण्यात आल्या.
मान्यवरांचा सत्कार जेष्ठ शिक्षक सदाशिव सावंत (सर), मोहन शिंदे (सर), चंद्रशेखर काळे (सर), सचिन फडतरे (सर) यांच्या हस्ते करण्यात आला.
कारगिल युद्धात शहीद झालेल्या जवानांच्या स्मृतिप्रीत्यर्थ तयार करण्यात आलेल्या "अमरज्योतीला" मान्यवरांच्या हस्ते प्रज्वलित करून पुष्पचक्र अर्पण करण्यात आले व शहीद जवानांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. तसेच सरस्वती मातेच्या मुर्तीचे पुजन करण्यात आले.
यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष सुभेदार मेजर जयपाल भोसले यांनी आपल्या भाषणातून जम्मू काश्मीर येथे कार्यरत असताना पाकिस्तानी अतिरेक्यांशी लढताना आलेल्या थरारक अनुभवाचे वर्णन केले. तसेच शेखर खाडे यांनी आयुष्यात स्वप्न पूर्ण करण्यासाठी कष्ट करणे व संकटात टिकून रहाणे महत्वाचे आहे असा संदेश दिला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यालयाचे प्राचार्य भिमराव आवारे (सर) यांनी तर सुत्रसंचलन अमर निलाखे (सर) यांनी केले. आभार वैभव सोलनकर (सर) यांनी मानले.
विद्यार्थिनीकडून राखी तयार करून घेण्यासाठी व कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी नवनाथ कुंभार (सर) व सचिन भुजबळ (सर) यांनी परिश्रम घेतले.
विद्यालयाच्या या उपक्रमाचे संस्थेचे अध्यक्ष व माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील, संस्थेचे सदस्य उदयसिंह पाटील, उपाध्यक्ष मनोज पाटील, सचिव किरण पाटील व ग्रामस्थ यांनी कौतुक केले.

