shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

१६०) पर्यावरण जनजागरण, राष्ट्रभक्ती आणि आरोग्य साक्षरता...समाजहितार्थ उत्सर्जनाचे महत्त्व...!


निरोगी आरोग्य म्हणजे शरीरातील कफ पित्त आणि वात याचे संतुलन करणे होय. आपण प्रत्येक क्षणाला श्वास घेत असतो व श्वासाबरोबर दूषित वायूदेखील शरीरात जातो. शरीरातील दूषित हवा उच्छवासावाटे नैसर्गिकरित्या बाहेर टाकली जाते. तसेच अन्नातील पोषक घटक शरीर स्विकारते व टाकाऊ पदार्थ बाहेर फेकते. बाहेर फेकण्याच्या या क्रियेला उत्सर्जन असे म्हणतात. 

आपल्या अनियमित दिनचर्येमुळे अन्नाचे व्यवस्थित पचन होत नाही व न पचलेले अन्न शरीरात कुजते. त्यातूनच विविध प्रकारचे वायू, विषाणू तयार होतात व ते शरीरात फिरतात. यामुळेच कफ, पित्त, वाताचे असंतुलन होते.

 नियमितपणे नाकातून जोरदारपणे हवा बाहेर फेकली की श्वसनमार्गात जमा झालेले दूषित धुलीकण सहजगत्या बाहेर पडू शकतात. ज्यायोगे आपला सर्दी, पडसे खोकल्याचा त्रास कायमचा बंद होऊ शकतो. अनियमित व दूषित आहार घेतल्यामुळे होणारे आजार औषधे खाऊन शरीरातच दाबून ठेवले तर शरीरातील विषारी द्रव्ये त्वचेवाटे फोड पुटकुळ्या होऊन बाहेर पडतात. अशावेळी देखील औषधोपचार केले तर शरीरात दूषित द्रव्यांचे प्रमाण वाढतच राहून दूर्धर रोग होतात. एकंदरीत काय तर शरीरातील दूषित टाकाऊ पदार्थांचे उत्सर्जन वेळेवर होणे हे शारिरीक संतुलनासाठी गरजेचे आहे. 

प्रातःकाळी प्राणशक्ती आतड्यांमध्ये असते. याकरिता प्रातर्विधी हे प्रातःकाळीच करणे गरजेचे आहे. अर्थात यासाठी वेळेवर सात्विक आहार व निद्रा हा नियम पाळायला हवा.
घराची स्वच्छता, घरासभोवतालची स्वच्छता, गावाची स्वच्छता, गटार,उकीरडे यांची स्वच्छता हे सामाजिक स्वच्छतेचे सूत्र आहे. गावात अस्वच्छता असेल तर रोगराई वाढते. यामुळे कचऱ्याचे, दूषित पाण्याचे योग्य प्रकारे उत्सर्जन करणे हे सामाजिक आरोग्यासाठी महत्त्वाचे ठरते. 

स्वच्छतेचे दुसरे नाव उत्सर्जन हे लक्षात घ्या. गावाची असो वा शरीराची, स्वच्छता मनाला आनंद व आरोग्य देते. मनातील वाईट विचार, संशय, शंका,आळस, चिंता, शत्रुत्व यासोबतच सामाजिकदृष्ट्या घातक ठरणाऱ्या चालीरीती, रूढी या फेकून नाहीशा केल्यास संपूर्ण समाज हा निर्भय, सुसंस्कार व शरीराने, मनाने निश्चितच सुदृढ होईल. आपल्यापाशी जे जे वाईट आहे, उपद्रवी आहे, अपायकारक आहे त्याची विल्हेवाट समाजास त्रास होणार नाही अशा पद्धतीने लावणे याला योग्य उत्सर्जनक्रिया असे म्हणता येईल.  

स्वतःचे व समाजाचे आरोग्य रक्षणाकरिता या विषयाचे चिंतन प्रत्येकाने करावे. विशेषतः उत्सर्जन हा शब्द दूषित  पदार्थांसाठी वापरला जातो. जे जे दूषित आहे त्याचे योग्यप्रमाणे उत्सर्जन करणे व विल्हेवाट लावणे म्हणजेच सर्वत्र स्वच्छता जपणे हा विषय स्वतःच्या कृतीतून आचरणात आणून सामाजिक आरोग्याची जपणूक करा.

कर्नाळा चॅरिटेबल ट्रस्ट पुणेच्या पर्यावरण जनजागरण, राष्ट्रभक्ती आणि आरोग्य साक्षरता मोहिमेत सहभागी व्हा.

लेखक:
पुण्यरत्न डॉ.चंद्रकांत शहासने
(देशभक्तकोशकार)
 मोबाईल क्रमांक: ९८८१३७३५८५
close