भारताची जागतिक महासत्तेकडे वाटचाल- हर्षवर्धन पाटील
भारताची 75 वर्षात नेत्रदीपक प्रगती- हर्षवर्धन पाटील
- बावडा येथे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव सोहळा
फोटो :- बावडा येथे शिवाजी एज्युकेशन शैक्षणिक संकुलात स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी कार्यक्रमात बोलताना हर्षवर्धन पाटील.
इंदापूर: प्रतिनिधी दि.15/8/22
भारताने सर्वच क्षेत्रात स्वातंत्र्योत्तर 75 वर्षात नेत्रदीपक अशी प्रगती केली आहे. देश अनेक क्षेत्रात स्वावलंबी बनला आहे. देशाच्या प्रगतीचा वेग पाहता भारताची जागतिक महासत्तेकडे वाटचाल सुरु आहे, अशी गौरवोद्गार माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी सोमवारी (दि.15) काढले.
बावडा येथील श्री शिवाजी एज्युकेशन सोसायटीच्या शैक्षणिक संकुलात देशाच्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवी सोहळा दिमाखदार कार्यक्रमात संपन्न झाला. यावेळी हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी माजी सैनिकांचा तसेच वाघा बॉर्डरवर ध्वज संचलन केलेल्या वैष्णवी आवारे हिचा हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
हर्षवर्धन पाटील पुढे म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची हरघर तिरंगा ही मोहीम देशप्रेम जागृत करणारी आहे. तिरंगा हा देशाचा स्वाभिमान आहे. तिरंगा हा आपल्या सर्वांच्या हृदयात सर्वोच्च स्थानी आहे. जगात भारताचा धबधबा निर्माण झाल्याचे अनेक उदाहरणावरून दिसून येत आहे. उक्रेन देशात शिक्षणासाठी गेलेल्या विद्यार्थ्यांना तिरंगा ध्वज हा जीवदान देणारा ठरला आहे. देशात हजारो वर्षे तिरंगा ध्वज हा सन्मानाने फडकत राहील, असे हर्षवर्धन पाटील यांनी टाळ्यांच्या गजरात नमूद केले.
कर्मयोगी शंकररावजी पाटील यांनी इंदापूर तालुक्यात सर्वसामान्यांना शिक्षणाची दारे खुली केली. त्यामुळे आज तालुक्याची प्रगती दिसून येत आहे. प्रगतीसाठी शिक्षण आवश्यक आहे. युवकांनी स्वतःच्या शारीरिक आरोग्याकडे लक्ष देत कठोर परिश्रम, जिद्द व मेहनतीच्या जोरावर विविध क्षेत्रात यशाची शिखरे सर करावीत, असे आवाहनही भाषणात हर्षवर्धन यांनी केले.
याप्रसंगी प्राचार्य डी.आर.घोगरे, अतुल तेरखेडकर यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी निरा भीमा कारखान्याचे संचालक व संस्थेचे संचालक उदयसिंह पाटील, सचिव व सरपंच किरण पाटील, खजिनदार राजेंद्र सूर्यवंशी, संचालक प्रसाद पाटील, स्वप्निल घोगरे, संतोष सुर्यवंशी, विठ्ठल घोगरे या पदाधिकाऱ्यांनी मान्यवरांचे स्वागत केले. कार्यक्रमास निरा भिमा कारखान्याचे संचालक राजवर्धन पाटील तसेच तालुक्यातील व गावातील पदाधिकारी, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. याप्रसंगी ध्वज संचलन, शारीरिक कवायती, देशभक्तीपर सांस्कृतिक कार्यक्रम विद्यार्थ्यांनी सादर केले. या कार्यक्रमांना प्रेक्षकांकडून चांगली वाहवा मिळाली. सूत्रसंचालन एस.टी. मुलाणी तर आभार जी.जे.जगताप यांनी मानले.
____________________________

