श्रीरामपूर (शौकतभाई शेख) :
वर्ग-२ च्या भोगवटादार जमीनधारकांना कोणत्याही प्रकारचा जामीनदार न घेता कर्ज देण्याचा निर्णय संचालकांच्या प्रयत्नाने जिल्हा बँकेच्या संचालक मंडळाने घेतला आहे. तेव्हा यासंदर्भात शेतकरी संघटनेने फुकटचे श्रेय लाटण्याचा प्रयत्न करु नये असे प्रतिपादन जिल्हा सहकारी बँकेचे संचालक माजी आमदार भानुदास मुरकुटे यांनी केले आहे.
यासंदर्भात माहिती देताना श्री. मुरकुटे यांनी सांगीतले की, श्रीरामपूर व राहाता तालुक्यात मोठ्या प्रमाणात खंडकरी शेतकर्यांना शासनाने खंडाच्या जमीनी परत केल्या आहेत. सदर जमीनी परत करताना त्या भोगवटादार वर्ग-२ धारणेच्या देण्यात आल्या. यामुळे जिल्हा बँकेकडून कर्ज मिळण्यास संबंधित शेतकर्यांना अडचणी येत होत्या, हे ध्यानात येताच मी तसेच जिल्हा बँकेचे संचालक माजी मंत्री आण्णासाहेब म्हस्के व करण ससाणे यांनी जिल्हाधिकारी, प्रांताधिकारी तसेच तहसीलदार यांचेशी यासंदर्भात चर्चा केली.
सदर चर्चेनंतर जिल्हा बँकेच्या संचालक मंडळाच्या बैठकित मी तसेच जिल्हा बँकेचे ज्येष्ठ संचालक आण्णासाहेब म्हस्के आणि करण ससाणे यांनी वर्ग-२ जमीन धारकांना कर्ज पुरवठा करताना कोणत्याही प्रकारचा जामीन न घेता कर्ज पुरवठा करता येवू शकतो याबाबत जिल्हाधिकारी, प्रांताधिकारी यांचेशी चर्चा झालेली आहे. त्यामुळे वर्ग-२ जमीन धारकांना विनाजामीन कर्ज पुरवठा करावा अशी मागणी संचालक मंडळाच्या बैठकीत लावून धरण्यात आली. अखेरीस संचालक मंडळाने वर्ग-२ जमीन धारकांना विनाजामीनदार कर्ज देण्याच्या निर्णयावर शिक्कामोर्तब केले अशी वस्तुस्थिती असल्याने सदरचा निर्णय घेणारे आम्ही संचालक असताना शेतकरी संघटनेने श्रेय लाटण्याचे कोणतेही कारण नाही. श्रेय द्यायचे असेल तर ते याबाबत पाठपुरावा करणार्या आणि सदरचा निर्णय घेणार्या संचालकांना द्यावेत असे श्री. मुरकुटे यांनी म्हटले आहे.

