शिर्डी एक्स्प्रेस लाईव्ह वृत्तसेवा अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी- दिपक हरिश्चंद्रे.
शुक्रवार दिनांक ०९ सप्टेंबर २०२२
मुळातून 25 हजार क्युसेकने विसर्ग राहुरीच्या पूर्वभागांना जोडणारे नदीवरील पूल पाण्याखाली || काही गावांचा दळणवळणाचा संपर्क तुटला..!!
राहुरी : अहमदनगर जिल्ह्याला वरदान ठरलेल्या मुळा धरणातून नदीपात्रात काल 25 हजार क्युसेकने पाणी सोडल्याने मुळा नदी दुथडी भरून वाहू लागल्याने राहुरी तालुक्यातील काही गावांना जोडणारे मुळा नदीवरील पूल पाण्याखाली गेल्याने या गावांचा दळणवळणाचा संपर्क तुटला आहे. या पूर्व भागातील मुळा नदीकाठच्या गावांना सतर्क राहण्याच्या प्रशासनाने सूचना दिल्या आहेत.
पारनेर तालुक्यातील मांडओहळ धरणाच्यावर भागात असलेला शिंदे तलाव फुटल्याने मांडओहळ धरण ओव्हरफ्लो झाले. त्यातून मुळा धरणात काल सकाळी 8 हजार क्युसेक पाण्याची आवक होती. त्यामुळे काल सकाळी 9 वाजता मुळा धरणातून या हंगामातील सर्वात जास्त म्हणजे 10 हजार क्युसेक विसर्ग नदीपात्रात सोडण्यात आला तसेच दुपारी 12 वाजता त्यात वाढ करून तो 20 हजार क्युसेक करण्यात आला. दुपारी 2 वाजेनंतर 25 हजार क्युसेक पाणी मुळा नदीपात्रात सोडण्यात आले आहे. मुळा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचे प्रमाण कमी जास्त असून मुळा धरणात कोतूळ इनफ्लो 4 हजार क्युसेकने आहे, अशी माहिती कार्यकारी अभियंता सायली पाटील यांनी दिली आहे.
मुळा नदी दुथडी वाहत असल्याने राहुरी तालुक्यातील कोंढवड, केंदळ बु. तसेच देसवंडीच्या देवनदीवरील पुल पाण्याखाली गेल्याने या गावांचा दळणवळणाचा संपर्क तुटला आहे. मुळा धरणाच्या पाणलोट व लाभक्षेत्रावर यंदाही पावसाची कृपादृष्टी चांगली झालेली आहे. मुळा धरण ऑगस्ट महिन्यातच पूर्ण क्षमतेने भरल्याने धरणातून महिन्यापासून जायकवाडीच्या दिशेने विसर्ग सुरूच आहे. आता पर्यंत 6 हजार दलघफू पाणी जायकवाडीकडे रवाना झालेले आहे.
धरणसाठा 25 हजार 600 दलघफू इतका स्थीर ठेऊन आवकेचे पाणी धरणाच्या दरवाज्यातून नदीपात्रात सोडले जात आहे. उजवा कालवा 1 हजार क्युसेकने वाहत आहे. मुळा पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कायम असून लाभक्षेत्रातील राहुरी तसेच पारनेर पट्यातील ओढ्यानाल्याचे पाणी मुळाच्या बॅक वाटरमध्ये जमा होत आहे. लाभक्षेत्रातील पाणी धरणात जमा होत असल्याने धरणाच्या भिंतीवरून सायरन देत टप्प्याने नदीपात्रात विसर्ग वाढविला आहे.
तसेच आज होणार्या गणरायाच्या विसर्जनाच्या दिवशीच मुळा नदी परिसरामध्ये पूर सदृष्य परिस्थिती निर्माण झाल्याने प्रशासनाने गणेश भक्तांची काळजी घेण्यासाठी विशेष पथके नदीपात्रालगत तैनात करावी, अशी मागणी नागरीकांनी केली आहे.
Shirdi Express Live🎥#करीता बातम्या📰🗞️ आणि जाहिराती 🖼️साठी संपर्क @दिपक हरिश्चंद्रे (अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी )📲7350591600

