मुलींनो, तुम्ही उद्याच्या रणरागिणी असून स्वतःच्या सुरक्षिततेसाठी जागृत व्हा : पोलीस उपनिरीक्षक संगीता भंडऱवाड
महिला व बाल लैंगिक शोषण व अत्याचार सारख्या घटना होत असल्यास त्वरित आपले पालक, शिक्षक, मित्र-मैत्रिणी, पोलीस यांच्याशी संपर्क साधावा : मंगलताई देवकर
खराबवाडीच्या प्राथमिक शाळेत किशोरवयीन मुलींसाठी 'बालकांचे हक्क व सुरक्षितता जागृती मेळावा' संपन्न
हुतात्मा राजगुरू पत्रकार संघ व संतभारती ग्रंथालयाचा उपक्रम
चाकण : "मुलींनो तुम्ही उद्याच्या रणरागिणी असून स्वतःच्या सुरक्षिततेसाठी जागृत व्हा. तसेच फेसबुक, व्हाट्सअप, इंस्टा सारख्या सोशल मीडियावरून येणाऱ्या फसव्या लिंक पासून सावध राहा," असे आवाहन महाळुंगे पोलीस चौकीच्या पोलीस उपनिरीक्षक संगीता भंडऱवाड यांनी खराबवाडी ( ता. खेड ) येथे केले.
महाळुंगे केंद्रातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खराबवाडी येथे संतभारती ग्रंथालय, हुतात्मा राजगुरू पत्रकार संघ खेड तालुका व जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खराबवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या किशोरवयीन मुलींसाठी 'बालकांचे हक्क व सुरक्षितता जागृती मेळावा' या कार्यक्रमात त्या मार्गदर्शन करताना बोलत होत्या.
त्यांनी मुलींना बोलते करून मुलींशी संवाद साधला व पोक्सो कायद्याविषयी माहिती सांगितली. तसेच सायबर क्राईम, लैंगिक अपराधापासून बालकांचे संरक्षण याविषयी इत्यंभूत माहिती दिली. अठरा वर्षाच्या आतील अल्पवयीन मुलांनी दुचाकी वाहने चालवू नयेत, असे आवाहन केले.
महिला अत्याचार तक्रार समितीच्या केंद्रीय सदस्या व संतभारती ग्रंथालयाच्या सचिव मंगलताई देवकर या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होत्या. आपल्या परिसरात कोठेही महिला व बाल लैंगिक शोषण व अत्याचार सारख्या घटना होत असल्याचे निदर्शनास आल्यास विशेषतः विद्यार्थ्यांनी सजग राहून याबाबत त्वरित आपले पालक, शिक्षक, मित्र-मैत्रिणी, पोलीस, महिला दक्षता समिती यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन त्यांनी केले.
यावेळी हुतात्मा राजगुरू पत्रकार संघ व खेड तालुका ग्रंथालय संघाचे अध्यक्ष हनुमंत देवकर, महिला दक्षता समितीच्या सदस्या सुनंदा शिंदे, शाळेचे मुख्याध्यापक राजेंद्र कातोरे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष किरण किर्ते, सदस्य तेजस वाडेकर, अॅड. अमर वाघ, अश्विनी बनसोडे, कल्पना कोचे, ज्ञानेश्वर मोकाशी, प्रताप आडेकर, सुनील मरभळ, सर्व शिक्षक वृंद आदी मान्यवर उपस्थित होते.
संतोष भुते यांनी मान्यवरांचे स्वागत केले. नयना आहिरे यांनी सुत्रसंचालन केले, तर सोनाली वाबळे यांनी आभार मानले.
0000

