शिर्डी एक्सप्रेस लाईव्ह नेटवर्क
लतादीदी यांच्या बद्दल लिहिताना गुलजारच्या या ओळींचा आधार घ्यावासा वाटतो....!
लतादीदी नुसते गात नाहीत, तर त्या स्वतःच गाणे बनतात. लतादीदीचे वैशिष्ट्य म्हणजे, त्यांचा सोनेरी स्वर आणि भावपूर्ण उच्चार..... गाण्यात त्या आपला आत्मा मिळवून गातात. प्रत्येक सुराचे आकलन करणारी तीव्र संवेदनशीलता, संगीतातील नाट्याची अचूक समज, स्वरांचे आघात, स्वर कोठे लावावे व कोठे कमी करावे याचे तारतम्य, मधुर हेलकावे.. हे सारे लतादीदीन्ना जन्मजात मिळाले आहे. एकदा सलिलदांनी सांगितले होते की, 'दो बिघा जमीन' चित्रपटाच्या प्रारंभी जी टायटल्स येतात, त्यावेळी सलिलदांनी जे पार्श्वसंगीत दिले आहे, ते केवळ एकदा ऐकून दीदीन्नी जसेच्या तसे बिनचूक म्हणून दाखवले होते....! शैलेंद्रजीनीच दीदीन्ची आणि सलिलदांची ओळख करून दिली. लतादीदीन्चे निरीक्षण आणि ग्रहणशक्तीमुळे तलतजीही प्रभावित झाले होते. अशा गोड गळ्याच्या गायिका बऱ्याच आहेत. पण भावपूर्ण पद्धतीने रसपरिपोष करण्याचे खास तंत्र फक्त आणि फक लतादीदी यांच्याकडेच आहे. लतादीदीन्चे उर्दू शब्दांचे उच्चार ऐकून उर्दूतले विद्वानही चकित होत. तलतजीन्नी एक किस्सा सांगितला होता. 'मेहरबानी' चित्रपटाच्या वेळी त्यांच्या सोलो गीताचे रेकॉर्डिंग होते. अनेकदा रिहर्सल करूनही गाणे मनासारखे होत नव्हते. तेवढ्यात लतादीदी आल्या. त्यांना पाहताच संगीतकार हाफिज खान म्हणाले की, "तलत, तुमचं गीत बाजूला ठेवा. आता अगोदर तुमचं नि लताचं युगलगीत आटोपू...." तेव्हा लतादीदीन्नी त्यास नकार दिला. "आधी तलतजीन्चे सोलोगीत होईल..., मगच मी युगलगीत गाईन..," असे त्यांनी बजावले. खरे तर हा त्यांच्या मनाचा मोठेपणाच.....! बदकाच्या पिलांनी पाण्यात जितके सहजपणे पोहावे, तितक्याच सहजपणे लतादीदीन्चा सूर गाण्यात विहरतो. नौशादजी यांच्या कडून ऐकलेला एक किस्सा. 'चांदनी रात' या चित्रपटासाठी एक गीत घ्यायचे होते. लतादीदी भर पावसात आल्या होत्या. त्यांच्या हातात फाटकी छत्री होती. परळ टी टीवरून त्या कारदार स्टुडिओत चालत आल्या होत्या. आज मी नेहमी बघतो की, तेथे एकेकाळी कारदार स्टुडिओ होता, हेच कोणाला माहिती नाही...! सध्या तेथे सगळीकडे गॅरेजेस आहेत. नौशादजीन्च्या छायेखालील ते पहिले रेकॉर्डिंग झाले, तेव्हा लतादीदी यांचा आवाज त्यांना पातळ वाटला आणि जिच्यासाठी त्या गात होत्या, ती नटी तर प्रौढ नि ढोली होती.
लतादीदीन्नी पुन्हा मेहनत घेतली. पुन्हा रेकॉर्डिंग झाले, तेव्हा मात्र दीदीन्च्या स्वरातला भरगच्चपणा आणि गोलाई पाहून सगळेजण थक्क झाले. निर्माते ए हसन यांनी दीदीन्ना खुश होऊन त्यावेळी ६० रुपयांचे बक्षिस दिले होते. दीदी उर्दू शब्दोच्चारांवर खूप मेहनत घेत होत्या. कारदार यांच्यासारखा निर्माता देखील दीदीन्नी गायलेले 'कौन सुने फरियाद हमारी' हे गाणे ऐकून प्रभावित झाला होता. त्यानंतर नौशादजीन्नी संगीत दिलेल्या 'अंदाज' चे रेकॉर्डिंग मेहबूबमध्ये झाले. 'कौन सुने फरयाद हमारी' हे गाणे स्टुडिओत बसून राज कपूर मन लावून ऐकत होते... त्याच वर्षी राज यांच्या 'बरसात' मध्ये लतादीदीन्नी अक्षरशः विक्रमी सूर बरसात केली.. 'अमर भूपाळी' ची 'नको दूर देशी जाऊ सजणा' हे शोकगीत असो किंवा 'नको बोलू रे' ही जोरकस शृंगारिक ढंगाची लावणी असो, लतादीदीन ती लीलया गात. कित्येक वर्षांपूर्वी अपोलो बंदरला छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचा अनावरण समारंभ होता. वसंत देसाईंनी १००० मुलांना घेऊन शिवमंगलस्तोत्र बसवले होते. यशवंतराव, अत्रे, बाळासाहेब देसाई तेथे उपस्थित होते. लतादीदी दूर बसल्या होत्या. लतादीदी शिवप्रेमी होत्या. ते वातावरण बघून भारावून गेलेल्या लतादीदी तडक वसंतरावांकडे येऊन म्हणाल्या की, "मला आज गाणे म्हणायचे आहे...." तेव्हा तिथल्या तिथेच एक गाणे दीदीन्नी बसवून, साथीदारांना तयार करून, ते सादरही केले...! टाळ्यांचा एकच कडकडाट झाला.. माणसात जशी माणुसकी, तसे गाण्यात गाणेपण हवे आणि लतादीदीन्च्या कोणत्याही गाण्यात शंभर टक्के हे गाणेपण सापडते. कुमार गंधर्व म्हणाले होते की, "नादमय उच्चार हे लताचे वैशिष्ट्य आहे." बालगंधर्वांनी लोकप्रियतेची कमाल केली, पण महाराष्ट्राबाहेरील प्रांतांत बालगंधर्वांची तेवढी जादू जाणवली नाही. उलट लतादीदीन्ची कीर्ती सातासमुद्रापार गेली. "असा कलाकार शतकातून एकदाच निर्माण होतो...," हे कुमार गंधर्वांचे बोल आहेत. लतादीदी ही भगवंताची बासरी आहे. नुकत्याच स्वर्गवास झालेल्या लता मंगेशकर यांना माझ्यासारखे असंख्य लोक आपुलकीच्या भावनेतून 'लता' असे एकेरीतच संबोधतात. कारण त्या कोणी परकया नाहीच. चिल्लर नट्या किंवा दोनचार हिट गीते गायली की, स्वतःला हाय-फाय सेलिब्रिटी समजणाऱ्या गायिका चटकन मावळतात. लतादीदी मात्र 'कहीं दीप जले कहीं दिल' याप्रमाणे तेवतच होत्या व तेवतच राहणार आहेत. त्या असताना आपण या जगात आहोत, या पलीकडे दुसरे आनंदनिधान ते कोणते होते....! हा आनंदघन आपल्या मनाला सदैव न्हाऊ घालतच आहे... सामान्यतः स्त्रियांचा आवाज काळी चार पांढरी पाचपर्यंत मर्यादित असतो. कोणीच फार उंच स्वरात गाऊ शकत नाही. लतादीदी मात्र तशा गाऊ शकत होत्या. आज लतादीदीन्चा जन्मदिवस.
'हाय रे वो दिन क्यूं ना आये, जा के ऋतू लौट आये'* अशीच भावना आपल्या सर्वांची आहे! 'आपकी खामोशियाँ आपकी आवाज है...'
न भूतो ना भविष्याती... असे गायनाचे उच्चांक गाठणार्या स्वरसम्राज्ञी स्व. लतादीदी मंगेशकर यांस जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन....!
हेमंत देसाई

