शिर्डी एक्स्प्रेस लाईव्ह वृत्तसेवा अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी- दिपक हरिश्चंद्रे.
शुक्रवार दिनांक १६ सप्टेंबर २०२२
मंत्रालयात नोकरीचे आमिष ; टोळीचा पर्दाफाश, तीन जणांना अटक तर 'सैराट फेम प्रिन्स' पोलिसांच्या रडारवर..!!
राहुरी पोलीस आवळणार 'सैराट फेम प्रिन्स' च्या मुसक्या..!!
राहुरी : मंत्रालयात नोकरीचे आमिष दाखवून लाखोंचा गंडा घालणाऱ्या टोळीचा राहुरी पोलिसांनी पर्दाफाश केला. आतापर्यंत तीन जणांना अटक केली आहे. सैराट चित्रपटात "प्रिन्स"ची भूमिका साकारलेला सुरज पवार आरोपी म्हणून पोलिसांच्या रडारवर आला आहे. प्रसिद्ध चित्रपट निर्माते-दिग्दर्शक नागराज मंजुळे यांच्या नावाचा आरोपींनी वापर केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.
फिर्यादी महेश बाळकृष्ण वाघडकर (रा. भेंडा फॅक्टरी, ता. नेवासा) यांच्या चाणाक्षेतेमुळे राहुरी पोलिसांना यश मिळाले. त्यांना तीन सप्टेंबर रोजी श्रीरंग अरुण कुलकर्णी या नावाने भ्रमणध्वनी आला. त्याने मंत्रालयात सहाय्यक कक्ष अधिकारी आहे. कोरोना काळात सामाजिक न्याय विभाग, मंत्रालयात मरण पावलेल्या कर्मचाऱ्यांच्या रिक्त पदावर नोकरी लावून देण्याचे अधिकार असल्याचे सांगितले. मोबाईलवर शैक्षणिक कागदपत्रे मागीतली.
शुक्रवारी वाघडकर यांना राहुरी बस स्थानक येथे बोलावून लिपिक टंकलेखक पदाचे नियुक्तीपत्र दाखविले. दोन लाख रुपये घेतले. नियुक्तीपत्र देण्यासाठी आणखी तीन लाखांची मागणी करून, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी येथे व्हीआयपी अतिथीगृहात बोलविले. वाघडकर यांना संशय आल्याने, त्यांनी मंत्रालयात चौकशी केली. फसवणुकीचा प्रकार असल्याचे लक्षात येताच, त्यांनी राहुरी पोलीस ठाणे गाठले.
"सुरज पवार उर्फ सैराट चित्रपटातील प्रिन्स याला तपासकामी हजर राहण्याची नोटीस देत आहे. बनावट शिक्के बनवून दिलेल्या आरोपीच्या चौकशीत प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक नागराज मंजुळे यांच्या नावाचा वापर केल्याचे तपासात समोर आले आहे.
- प्रताप दराडे, पोलीस निरीक्षक, राहुरी.
पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांनी शुक्रवारी कृषी विद्यापीठ येथे दत्तात्रेय अरुण क्षीरसागर (३१, रा.दत्तनगर,मालेगाव बसस्थानक,नाशिक) याला अटक केली. त्याच्याकडून बनावट शिक्के, नियुक्तीपत्रं, काही कागदपत्रे जप्त केली. त्याने कुलकर्णी या खोट्या आडनावाने फोन केल्याची कबुली दिली. त्याला, राहुरी न्यायालयाने उद्या शुक्रवार पर्यंत पोलीस कोठडी सुनावली. तपासाची चक्रे वेगाने फिरली.
अटक आरोपीचा साथीदार आकाश विष्णू शिंदे (रा. संगमनेर) याला राहत्या घरी पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यालाही शुक्रवारपर्यंत पोलीस कोठडी मिळाली. त्याने बनावट शिक्के तयार करून घेतले. नियुक्तीपत्रावर सह्या केल्याचे तपासात निष्पन्न झाले. शिक्के बनवून दिलेला आरोपी ओंकार नंदकुमार तरटे (रा. संगमनेर) यालाही पोलिसांनी अटक केली. त्याने सामाजिक न्याय विभागाचा गोल व आडवा शिक्का बनवून दिल्याची कबुली दिली.
आरोपी तरटे याने चौकशीत "शिक्के बनवून देत नव्हतो. परंतु, आरोपी शिंदे याने शॉर्ट फिल्म बनविण्यासाठी शिक्के वापरणार असल्याचे सांगितले. त्याच्यासोबत सैराट चित्रपटातील प्रिन्सची भूमिका केलेला सुरज पवार आला होता. पवारने दिग्दर्शक नागराज मंजुळे यांच्याशी बोलणे करून देतो. असे सांगून एका व्यक्तीशी बोलणे करून दिले. शिक्क्यांचा गैरवापर करणार नसल्याचे सांगितल्याने शिक्के बनवून दिले." असे सांगितले.
Shirdi Express Live🎥#करीता बातम्या📰🗞️ आणि जाहिराती 🖼️साठी संपर्क @दिपक हरिश्चंद्रे (अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी )📲7350591600

