shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

महाराष्ट्राच्या शिक्षणव्यवस्थेचे आद्यप्रवर्तक--कर्मवीर भा.पाटील..!


            महाराष्ट्रामध्ये सर्वप्रथम म.फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी १८४८ साली पुण्यामध्ये मुलींची पहिली शाळा सुरु केली. त्यानंतरही त्यांनी अनेक गोर-गरीब,दिन-दलित, बहुजनांसाठी शाळा सुरु केल्या.तसेच ग्रामीण भागात खेडॊपाडी,बहुजन, गरीब,कामकरी-कष्टकरी शेतक-यांच्या मुलाबाळांसाठी शिक्षण म्हणजे जनजागृती ! आणि जनजागृती म्हणजे समाजक्रांती ! या समाजक्रांतीमधूनच नवसमाज निर्मिती शिक्षणाच्या माध्यमातून घडवून आणण्याचे काम याच महाराष्ट्राच्या मातीवर केले ते म्हणजे पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांनी !
             त्यांचा जन्म २२ सप्टेंबर १८८७ रोजी कोल्हापूर जिल्ह्यातील ’कुंभोज’ या गावी झाला. त्यागी, दानशूर व न्यायप्रिय पिता आणि सद्गुणी माता गंगाबाई यांचे ’विचार’ आणि ’संस्कार’ घेवून कर्मवीर भाऊराव पाटलांच्या व्यक्तीमत्वाची जडणघडण झालेली होती. श्रम, स्वावलंबन व समता या तीन तत्वांच्या विचारांचे शिक्षण घेवून स्वत: कमी शिकले परंतू ,सर्व जाती-धर्माच्या मुला-मुलींना शिक्षणाची सुवर्णसंधी उपलब्ध करून दिली. खेडोपाडी अनवाणी पायांनी पायपीट करून मुले शाळेसाठी गोळा केली आणि छत्रपती राजर्षी शाहू महाराजांपासून प्रेरणा घेवून, काले ता.कराड जि.सातारा या ठिकाणी ४ ऑक्टॊंबर १९१९ ला विजयादशमीच्या मुहर्तावर “रयत शिक्षण संस्थेची पहिली शाळा” सुरु करून शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली.
         ‌ ‌आज त्यांच्यामुळे महाराष्ट्रातल्या “१४ जिल्ह्यामध्ये” रयत शिक्षण संस्थेची ४१ महाविदयालये, ४३९ हायस्कूल,कॉलेजच्या मुलांसाठी २७ वस्तिगृहे,१६० उच्च माध्यमिक विदयालये, १७ कृषी महाविदयालये,५ तंत्र विदयालये,५ इंग्रजी माध्यमाच्या शाळा,८ डी.एड. महाविदयालये,४५ प्राथ.व पूर्व प्राथ.शाळा,शाळेतील मुलांसाठी ६८ वसतिगृहे,८ आश्रमशाळा,५८ आय.टी.आय. व इतर एकूण संस्थेच्या सर्व ६७९ शाखा आहेत.एकूण विदयार्थी सुमारे ४,५८,०४४ आणि एकूण सेवक १३,५५३ आहेत. 
            आज या छोट्याशा कार्याचे रोपटे एवढे प्रचंड प्रमाणात विस्तारले की, “वटवृक्ष” हे “बोधचिन्ह” संस्थेच्या नावाला सर्वार्थाने सार्थ झाले. त्या काळात रुढी, परंपरा,अंधश्रध्दा आणि अज्ञानाने संपूर्ण समाज पोखरला गेला होता. त्या आज्ञानातून भरडल्या गेलेल्या माणसाला बाहेर काढण्याचे काम या व्यवस्थेत कोणी केले असेल तर ते फक्त कर्मवीर भाऊराव पाटील यांनी !  म्हणताना,म्हणून त्यांच्या कार्याचा गौरव करताना जनमाणसांकडून “कर्मवीर” ही उपाधी मिळाली.तसेच पुणे विदयापीठाने त्यांच्या कार्याची दखल घेवून त्यांना “डी.लिट.” ही सर्वोच्च पदवी प्रदान केली आणि भारत सरकारने “पद्मभूषण” हा किताब देवून गौरविले.
          खेडयांतील बहुजन समाज त्यांनी जवळून पाहिला होता,त्यांच्या मनातील अंधश्रद्धेची अज्ञानाची जळमटे काढून टाकायची असतील तर,शिक्षणाशिवाय पर्याय नाही असे भाऊरावांना कायम वाटत होते,आणि म्हणून त्यांनी आपले सारे आयुष्य समाजासाठी खर्च करण्याचा निश्चय केला. 
           मुळात रयत शिक्षण संस्था स्थापन करण्य़ामागे त्यांचा एवढाच हेतू होता की, मागासलेल्या,गरीब,होतकरू मुलांना मोफत शिक्षण मिळावे.न्याय,समता,बंधुता, श्रमप्रतिष्टा,स्वावलंबन, सामाजिक बांधिलकी इत्यादी मुल्ये विद्यार्थ्यांमध्ये रुजवून समाज साक्षर सुजाण बनविणे.खरंतर यापाठीमागे त्यांच्या पत्नी लक्ष्मीबाई भाऊराव पाटील यांचा फार मोठा त्याग होता.कारण ब-याचदा वसतिगृहातील मुलांना जेवणासाठी काहीही धान्य,पैसे शिल्लक नसताना स्वत:चे दागिणे आणि मंगळसुत्र विकून त्यांनी वसतिगृहे व रयत शिक्षण संस्था चालविली.शिक्षणाची ज्ञानगंगा जनसामान्यांच्या घरापासून गोरगरीबांच्या ह्रदयापर्यंत नेण्याचे अतुलनीय असे कार्य कर्मवीर भाऊराव पाटील यांनी आपल्या रयत शिक्षण संस्थेमार्फत केले. आज रयत शिक्षण संस्थेला आशिया खंडातील एक नामवंत शिक्षण संस्था म्हणून ओळखल्या जाते.अशा या संस्थेचा वटवृक्ष विस्तारीत करून,अहोरात्र समाजासाठी झटणाऱ्या कर्मवीरांनी ९ मे १९५९ रोजी या जगाचा निरोप घेतला, अशा महान ज्ञानगंगेच्या आधुनिक भगिरथास  त्यांच्या जयंतीनिमित्त कोटी-कोटी प्रणाम..!त्यांच्या विचार-कार्याला अभिवादन..!
*शब्दांकन..*
*शिवश्री.सतिष उखर्डे,
         टेंभूर्णीकर
(शिवव्याख्याते- प्रबोधनकार)
मोबा.-९४२२९९२३१०
close