आशिया चषक स्पर्धेतील आपला दुसरा सामना बुधवारी भारताने नवख्या हॉंगकॉंगला ४० धावांनी नमवून सुपर फोर गटात अ गटातून अव्वल क्रमांकाने प्रवेश मिळविला. कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानवर विजय मिळविताना भारताच्या तोंडी फेस आला होता. तितका त्रास या सामन्यात झाला नाही मात्र जो सफाईदार विजय हवा होता तो मिळाला नाही.
धावांचा पाठलाग करणारा संघ सामने जिंकत असताना हाँगकाँगने नाणेफेक जिंकून आश्चर्यकारकरित्या भारताला प्रथम फलंदाजीस निमंत्रीत केले. भारताने २० षटकात २ बाद १९२ धावा ठोकल्या. प्रत्युत्तरात हाँगकाँगने पाच बाद १५२ धावा फटकावून अपेक्षेपेक्षा चांगले उत्तर दिले. सुर्यकुमार यादव व विराट कोहलीचे दमदार अर्धशतके व रवींद्र जडेजा, भुवनेश्वर कुमार आणि युजवेंद्र चहलची गोलंदाजी प्रभावी ठरली.
पाकिस्तानविरुद्ध सुरुवातीलाच मिळालेल्या जिवदानानंतर ३४ चेंडूत ३५ धावा केलेल्या विराट कोहलीने या सामन्यात ४४ चेंडूत नाबाद ५९ धावा केल्या. मात्र येथेही पहिल्याच चेंडूवर त्याचा उडालेला झेल क्षेत्ररक्षकांच्या मध्ये पडला होता. हा अपवाद सोडला तर त्याची खेळी बरीचशी निर्दोष होती. एक चौकार व तीन षटकार मारत १३४.०९ च्या सरासरीने त्याने ही खेळी सजवली. कोहलीच्या या दोन डावातील खेळावरून त्याचा बॅडपॅच संपत आल्याचे दिसते. या खेळी दरम्यान कोहलीने एक बाजू सांभाळत सुर्यकुमार यादवला बीग ब्रदरच्या भूमिकेत साहाय्य केले.
सुर्यकुमार यादव सध्या भन्नाट फॉर्मात आहे. यावेळी युएईच्या वाळवंटात जास्तच तळपताना अवघ्या २६ चेंडूत ६८ धावांची तुफानी खेळी केली. मागच्या ७ डावात त्याची हि तिसरी पन्नासी पार खेळी ठरली. १० जुलैला इंग्लंड विरूध्द शतक व दोन ऑगष्टला विंडीज विरूध्द ७६ धावा ठोकल्यानंतर या सामन्यात ६ चौकार व ६ षटकार ठोकून त्याने प्रेक्षकांचे मनोरंजन तर केलेच शिवाय संंघाला समाधानकारक धावसंख्या गाठून दिली. सुर्यकुमार फलंदाजीला आला तेंव्हा भारताच्या तेरा षटकात २ बाद ९४ धावा झाल्या होत्या. त्यानंतर त्याने मैदानात जो तांडव घातला तो बघून विराट कोहलीने तर त्याला वाकून कुर्निसात केले.
पाकिस्तान विरूध्द धारदार गोलंदाजी करणाऱ्या भुवनेश्वर कुमारने या सामन्यातही प्रभावी कामगिरी करताना तीन षटकात १५ देऊन एक बळी मिळविला. रविंद्र जडेजानेही ४ षटकात १ बळी मिळविताना १५ धावांची कंजूष गोलंदाजी केली. तर चहलने चार षटकात अठराच धावा देताना एक बळी मिळविला. या गोष्टी भारतासाठी प्रस्तुत सामन्यात सकारात्मक ठरल्या. नकारात्मक बाबींचा विचार केला तर रोहित शर्मा व के एल राहुल ही कर्णधार -उपकर्णधारांची सलामी जोडी सलग दुसऱ्या सामन्यात अपयशी ठरली. रोहीतने १३ चेंडूत २१ धावा करून सुरुवात झकास केली मात्र तिचे मोठया खेळीत रूपांतर करण्यात पुन्हा एकदा अपयशी ठरला. मागच्या पाच डावात तो अर्धशतकापासून वंचित आहे. तर केएल राहुलने ३९ चेंडूत ३६ धावा केल्या खऱ्या परंतु त्याचा स्ट्राईक रेट शंभरच्या खाली होती. हाँगकाँग सारख्या कमजोर संघाविरूद्ध देखील अशी खराब कामगिरी असेल तर राहुलला पुढील सामन्यात खेळविण्याबाबत संघ व्यवस्थापनास विचार करावा लागेल.
बुमराहा व हर्षल पटेल जखमी असल्याने संधी मिळालेले आवेश खान व अर्शदिप सिंग फायदा उठविताना दिसत नाही. विंडीज दौऱ्यातला शेवटचा सामना सोडून सडकून मार खाणाऱ्या आवेशाला दुबईत पाकविरुध्द विशेष यश मिळाले नव्हते. तर हॉंगकॉंग विरूध्द एका बळीसाठी त्याला ५३ धावा मोजाव्या लागल्या. त्याचे असेच मार खाणे सुरू राहिले तर त्याला संघातले स्थान गमवावे लागेलच पण भारतालाही आशिया चषकावर पाणी सोडावे लागेल. दुसरीकडे अर्शशदिपचे १२ सामन्यात बारा बळी अशी चांगली कामगिरी असताना पाकविरुध्द ८.६० व हाँगकाँग विरूध्द ११ च्या सरासरीने त्याने धावा वाटल्याने भारतासाठी चिंता वाढविली. उर्वरीत सामन्यात या दोघांंनाही आपल्या कामगिरीत सुधारणा करावी लागेल. अन्यथा एकटया भुवनेश्वरवर लोड येऊ शकतो व त्या दबावात त्याचीही कामगिरी ढासळू शकते.
भारताने आशिया चषकाच्या मुख्य फेरीत प्रवेश केला असल्याने पुढील सामन्यात जोरदार प्रयत्न करून प्रतिस्पर्ध्यांना निष्प्रभ करण्यासाठी संघातील प्रत्येकालाच ठोस कामगिरी करावी लागेल.
डॉ.दत्ता विघावे
क्रिकेट समिक्षक.
इंटर नॅशनल मेंबर ऑफ वर्ल्ड पार्लमेंट,
ग्लोबल वर्कींग कमिटी मेंबर ऑफ डब्ल्यूसीपीए.
मेंबर ऑफ युनायटेड नेशन्स ग्लोबल टॅलेंट पुल,
प्रतिनिधी भारत.
Email: dattavighave@gmail.com

