नवरात्र विशेष लेख : क्रमांक : ६
लेखक : चंद्रकांत शहासने
संत वाङ्मयाचे विज्ञाननिष्ठ निरूपणकार
मो.९८८१३७३५८५
जोगवा म्हणजे भिक्षा. तीर्थस्थळी मागीतलेल्या भिक्षेला जोगवा म्हणतात. जोगवा परंपरा ही अनादी अनंत म्हणजे पिढ्यान् पिढ्या चालू आहे. या परंपरेला अध्यात्मिक बैठक आहे. उगाच घेतली परडी नि मागितली भिक्षा असं नसतं. कारण स्वत: शिवाजी महाराजांनी जोगवा मागितलेला आहे. म्हणजे जोगवा हे एक राष्ट्रभक्ती आणि अध्यात्माचं रूपक आहे.
गाणगापूर येथेही दररोज भिक्षा मागण्याची परंपरा आहे.
ही भिक्षा पोटासाठी मागायची भिक्षा नाही. ही उपासनेची भिक्षा आहे. जे राष्ट्रकार्यासाठी,रराष्ट्रधर्मासाठी आपलं
सर्वस्व अर्पण करून केवळ कवड्यांची माळ गळ्यात घालून समाजहितासाठी व्रतस्थ जिवन जगतात अशांनाच जोगवा मागण्याचा अधिकार आहे.
गाणगापूरसारख्या तिर्थक्षेत्री अनेक तपस्वी, पुण्यात्मे तप करीत असतात. त्यांच्याकडे साधकांनी उपासनेची भिक्षा मागायची असते, जेणेकरून साधकांना आपल्या भक्तीमार्गात मार्गदर्शन मिळते नि साधकांचा मार्ग सुकर होतो.उपासकांना आपल्या व्रतस्थ जिवनात मोक्ष म्हणजे इप्सीत साध्य करायचं असेल तर काम, क्रोध, मद, मत्सर, दंभ, अहंकार हे सहा विकार बाजूला ठेवावे लागतात. याचे मार्गदर्शन संतमंडळी करीत असतात.
मनुष्याच्या मोक्षप्राप्तीच्या मार्गातले अडथळे दूर व्हावेत व अहंकाराचा, मीपणाचा नकली मुखवटा गळून पडावा, यासाठी संत एकनाथांनी , आई जगदंबेच्या चरणी जोगवा मागितला.अमावस्या व पौर्णिमा या दोन्ही दिवशी , देवीच्या उपासनेची दीक्षा घेतलेली मंडळी गळ्यात कवड्याची माळ , हातामध्ये परडी , परडीत देवीचा टाक घेऊन , पाच घरे भिक्षा मागतात.
यामुळ समाजहितासाठी जगणाऱ्यांनी स्वत:चं मीपण कसं विसरायचं नि समाजकल्याणात समाजाचा सहभाग कसा नोंदवावयाचा याचे प्रकट दर्शन होते.
राहिला मुद्दा तिर्थक्षेत्राचा. जिथे मन पवित्र तिथे तिर्थक्षेत्र ! जेव्हा आपण पवित्र मनाने एखाद्या मोहीमेवर समाजहितासाठी निघता तेव्हा नि: संकोचपणे मोहीम यशस्वी करण्यासाठी लागणारी मदत जोगवा म्हणून मागावी जेणेकरून मोहीमेला लोकाश्रय मिळतो.
जोगवा
अनादि निर्गुण निर्गुण , प्रकटली भवानी ! मोह महिषासुर ,महिषासुर , मर्दना लागोनी ! त्रिविध तापांची , तापांची , करावया झाडणी !
भक्ता लागोनी, लागोनी , पावसी निर्वाणी ! आईचा जोगवा , जोगवा , जोगवा मागेन ।।धृ ।।
द्वैत सारूनी, सारुनी ,माळ मी घालीन ।हाती बोधाचा , बोधाचा , झेंडा मी घेईन । भेद रहित रहित , वारिसी जाईन ।। १ ।।
नवविध भक्तीच्या ,भक्तीच्या , करीन नवरात्रा। पोटी मागेन, मागेन, मागेन ज्ञानपुत्रा । धरीन सद्भाव, सद्भाव , अंतरीच्या मित्रा ।।२।।
पूर्ण बोधाची, बोधाची , भरीन परडी।
आशा- तृष्णेच्या , तृष्णेच्या , पाडीन दरडी ।मनोविकार , विकार , करीन कुरवंडी ।अद्भुत रसाची ,रसाची भरीन दुरडी ।।३।।
आता साजणी साजणी झाले मी निःसंग । विकल्प नवऱ्याचा नवऱ्याचा सोडियेला संग । काम क्रोध हे क्रोध हे सोडियले मागं । केला मोकळा, मोकळा , मार्ग सुरंग।।४।।
ऐसा जोगवा जोगवा ,मागोनी ठेविला!जाऊनी नवस नवस , महाद्वारी फेडीला ! एका एकपणे एकपणे जनार्दने देखिला ! जन्म मरणाचा मरणाचा फेरा चुकविला !आईचा जोगवा, जोगवा जोगवा मागेन !!५!!
लेखक : चंद्रकांत शहासने,
देशभक्त कोशकार,
मोबाईल : ९८८१३७३५८५

