shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

चुकांच्या कुंभमेळ्यात टिम इंडिया हरवली ; पाकने पाच गडी राखून भारताची जिरवली !,


          आशिया चषक स्पर्धेच्या सुपर फोर गटात रविवारी रात्री दुबईच्या वाळवंटात पाकिस्तानने बलाढ्य भारताला चोहोकडून घेरले व पाच गडी राखून एक नेत्रदिपक विजय मिळविला. या विजयाने पाकिस्तानचा आत्मविश्वास नक्कीच दुणावला असून अंतिम फेरी गाठण्याची त्यांना आता मोठी संधी असून श्रीलंका व अफगाणिस्तानचे आव्हान ते लिलया पेलू शकतात. टिम इंडियाच त्यांच्या मार्गातील प्रमुख अडसर होती. त्या उलट आता भारताला उर्वरीत दोन्ही सामने उच्च धावगतीसह जिंकणे गरजेचे असून आता टिम इंडियाला आपल्या अस्तित्वाची लढाई लढण्याची वेळ आली आहे.
           आठच दिवसांपूर्वी याच मैदानावर झालेल्या सामन्यात टिम इंडियाने पाच गडी राखूनच पाकचा पराभव केला होता. त्याचा बदला पाकने घेताना पहिला पावर प्ले वगळता नाणेफेकीसह प्रत्येक गोष्टीत भारतावर मात केली.
            अष्टपैलू रविंद्र जडेजा व वेगवान गोलंदाज आवेश खान दुखापत व आजारपणामुळे संघाबाहेर गेल्याने संघाचे संतुलन बिघडले. त्यांनतर संघ निवड करताना द्रविड - रोहीत व कंपनीने प्रत्यक्ष सामन्यासाठी विचित्रच टिम निवडली. जडेजा ऐवजी मुळ संघात आलेला अक्षर पटेल अकरा जणांच्या संघात येणे गरजेचे होते. पंरतु त्याला घेतले नाही. त्यानंतर अनुभवी रविचंद्रन आश्विन संघात येणे गरजेचे होते. मात्र त्यालाही न घेता दिपक हुड्डाला संधी दिली. परंतु हुड्डालाही प्रत्यक्ष सामन्यात संघाला गरज असताना गोलंदाजी न देऊन कर्णधाराने संघाच्या पायावर धोंडाच पाडून घेतला.
           भारताचे सलामीवीर कर्णधार रोहित शर्मा व उपकर्णधार के एक राहुलने धडाकेबाज सुरुवात केली खरी, परंतु प्रत्येकी २८ धावांच्या पुढे त्याची गाडी गेलीच नाही. खरे तर दोघांनीही जम बसल्यानंतर मोठी खेळी खेळायला पाहिजे होती.
          फिअरलेस क्रिकेटच्या नावाखाली भारतीय फलंदाजांकडून केअरलेस क्रिकेटच जास्त खेळले गेले. एक विराट कोहली वगळता कोणीही परिस्थितीचे भान राखून खेळू शकला नाही. सुर्यकुमार यादवही फॅन्सी क्रिकेट खेळण्याच्या नादात स्वतःचे हसू करून घेतो.
          रिषभ पंत इतके क्रिकेट खेळला आहे तरी त्याला काडीचीही अक्कल आल्याचे दिसत नाही. गोलंदाजांने क्षेत्ररक्षण लावले अगदी त्याच बाजूने रिव्हर्स स्वीप खेळून स्वतः तर बाद झालाच परंतु संघाच्या आशांवर पाणी फेरले.
           पाकविरूध्द पहिल्या सामन्याचा हिरो हार्दिक पांडया या सामन्यात शब्दशः झिरोच ठरला. स्वतः शुन्यावर बाद झालाच शिवाय गोलंदाजीत सपाटून मार खाताना एका सामन्यातील यशावरून तो जागतिक दर्जाचा अष्टपैलू मॅच विनर होऊ शकत नाही, हे त्याने त्याच्याच खेळातून सिध्द केले.
           दिपक हुड्डाला संघात घेऊन त्याचा योग्य उपयोग करून न घेणे हे संघासाठी घातकच सिद्ध झाले. त्याच्या ऐवजी आश्वीन फायदेशीर ठरला असता.
             भुवनेश्वर कुमार भारताचा चालू दौऱ्यातील मुख्य गोलंदाज आहे. पाकचे फलंदाज उधळत असताना पंधराव्या षटकात फलंदाजीत प्रमोशन मिळाल्याचा आनंद २० चेंडूत ४० धावा काढणाऱ्या मोहम्मद नवाझला बाद करून भुवनेश्वरने सामना आपल्या बाजूने झुकविला. मात्र शेवटच्या दोन षटकात २७ धावांची पाकला गरज असताना अनियंत्रीत मारा करत दोन वाईडसह १९ धावांची खिरापत वाटली.                 रविंद्र बिश्नोईने अनुभवी लेगस्पीनर यजुवेंद्र चहल पेक्षा सरस गोलंदाजी केली. मात्र अठराव्या षटकात त्याने तीन वाईड चेंडू टाकून संघाच्या अडचणीत वाढच केली. हे कमी की काय म्हणून अर्शदिपसिंगने आसिफ अलीचा शुन्यावर झेल सोडून भारताला पराभवाच्या दिशेने नेले. त्यानंतर याच आसिफ अलीने ८ चेंडूत १६ धावा फटकावून विजय भारताच्या हातून ओढून नेला.
            शेवटच्या षटकात ७ धावांचे रक्षण करताना अर्शदिपने निकराचे प्रयत्न करताना एक बळीही मिळविला. मात्र एक चेंडू व पाच गडी राखून पाकने विजय मिळविलाच. या विजयाने पाकचा अंतिम फेरीचा मार्ग सुकर तर भारताचा बिकट बनला आहे. 
           आक्रमक सुरूवातीनंतर भारत दोनशेेचा पल्ला लिलया गाठेल असे वाटत असताना पाकच्या गोलंदाजांनी आपल्या मर्यादेचा योग्य वापर करत भारतीय फलंदाजांचे उधळललेले वारू आवरले.
            पाकच्या डावाच्या मध्याला रिझवान - नवाझ जोडी जमली असताना भारताकडून ती फोडण्याचे विशेष प्रयत्न झालेच नाहीत.
             नेतृत्वात एरव्ही सरस कामगिरी करणारा रोहित शर्मा या सामन्यात अगदी बावरलेला दिसत होता. संघ निवडीपासून ते गोलंदाजीत बदल करणे, मार खाणाऱ्या पांड्याऐवजी हुड्डाचा वापर न करणे, सलग दुसऱ्या सामन्यात षटकांची गती न राखणे, त्याचा फटका शेवटच्या षटकात एक क्षेत्ररक्षक सर्कल मध्ये ठेवण्याची शिक्षा होणे, फलंदाजीत जम बसल्यानंतरही हाराकिरी करणे, पाकच्या फलंदाजांना लगाम घालण्यात अपयश येणे या गोष्टी रोहितच्या लौकीकाला साजेशा नव्हत्या.
         या व अनेक चुकांचा परिणाम म्हणजे भारताचा लाजिरवाणा पराभव होण्यात झाला असला तरी भारताने यातून सावरून पुढील दोन्ही सामन्यात सरस खेळ केला तर पुढच्या रविवारी पुन्हा एकदा पाकशी अंतिम सामन्यात लढून झालेल्या पराभवाचा वचपा काढण्याची व आशिया चषकातील हॅट्रीकसह आठवे विजेतेपद मिळविण्याची संधी आहे. त्यासाठी टाळता येणाऱ्या चुका टाळून संघात योग्य समन्वय साधणे गरजेचे आहे. शिवाय प्रत्येकाला आपली जबाबदारी ओळखून खेळावेच लागेल.

डॉ.दत्ता विघावे
क्रिकेट समिक्षक. 
इंटर नॅशनल मेंबर ऑफ वर्ल्ड पार्लमेंट,
ग्लोबल वर्कींग कमिटी मेंबर ऑफ डब्ल्यूसीपीए.
मेंबर ऑफ युनायटेड नेशन्स ग्लोबल टॅलेंट पुल,
प्रतिनिधी भारत. 
Email:  dattavighave@gmail.com
close