२३ ऑक्टोबरपासून ऑस्ट्रेलियात टि२० विश्वचषक स्पर्धा सुरू होत असून त्या पार्श्वभूमीवर विश्वचषक विजेतेपदाचे स्वप्न बघणाऱ्या भारतीय संघास मोठा हादरा बसला आहे. अष्टपैलू खेळाडू रविंद्र जडेजाच्या पाठोपाठ भारतीय गोलंदाजीचा आधारस्तंभ म्हणून ओळखला जाणारा वेगवान गोलंदाज जसप्रित बुमराहा पाठीच्या दुखापतीमुळे सदर विश्वचषक स्पर्धेला मुकणार तर आहेच पण पुढील चार ते सहा महिने त्याला क्रिकेट पासून दूरच राहावे लागण्याची शक्यता आहे.
युएईमध्ये नुकत्याच झालेल्या आशिया चषक स्पर्धेलाही जसप्रित बुमराहा याच पाठीच्या दुखण्यामुळे मुकला होता. त्याचा मोठा फटका टिम इंडियाला बसला व सुपर फोरमध्येच भारताला गाशा गुंडाळावा लागला होता. त्यावेळी बुमराहाच्या गैरहजेरीत अनुभवी भुवनेश्वर कुमार निष्प्रभ ठरला तर अननुभवी आवेश खान व अर्शदिपसिंग आपला प्रभाव पाडण्यात कमी पडले होते. याच प्रमुख कारणामुळे भारताचे आशिया चषक जिंकण्याचे स्वप्न भंगले होते.
त्या दरम्यान बुमराहाने बंगलोरस्थित राष्ट्रीय क्रिकेट अकाडमी
(एनसीए) मध्ये पुनर्वसन प्रक्रिया केली. त्यानंतर ऑस्ट्रेलियाविरूध्द झालेल्या टि२० मालिकेसाठी त्याला निवडले खरे मात्र पहिल्या सामन्यात त्याला खेळविलेच नाही तेंव्हाच यात काही तरी काळंबेरं असल्याचं वाटू लागलं. त्यानंतर दुसऱ्या सामन्यात त्याला खेळवलं खरं पण त्याला त्याची जुनी लय सापडली नाहीच, शिवाय चार षटकात त्याला पन्नास धावांचा मोठा मार बसला. या दरम्यान त्याच्या तंदुरूस्तीवरही शंका घेऊ लागल्या होत्या. मात्र तिसऱ्या सामन्यात त्याला न खेळवून संघ प्रबंधनाने जणू मुक संमतीच दिली.
ऑस्ट्रेलियाविरूध्द मालिका भारत पिछाडीवरून जिंकला खरा, मात्र बुमराहासारखा मोहरा गमवावा लागला. ऑस्ट्रेलिया पाठोपाठ दक्षिण आफ्रिका संघही भारतात आला परंतु त्यांच्या विरूध्द बुमराहाला संघात निवडलेच गेले नाही. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या सामन्यात दिपक चाहर व अर्शदिपसिंग संघात आले. त्यांनी मिळालेली संधी व स्वींग होणाऱ्या खेळपट्टीचा अचूक लाभ उठवत दक्षिण आफ्रिकेचे पहिल्या पंधरा चेंडूतच कंबरडे मोडून सामन्याचा निकाल काय लागणार हे लिहून ठेवले व झालेही तसेच. टिम इंडियाने तो सामना आठ गडी राखून जिंकला. मात्र त्यानंतर बुमराहाच्या गंभीर दुखापतीची बातमी बाहेर आली आणि भारताच्या टि२० वर्ल्ड कप मिशनला प्रथम ग्रासे मक्षीपःत झाला.
वर्कलोड मॅनेजमेंटचा गवगवा करणारी बीसीसीआय बुमराहा प्रकरणानंतर आरोपाच्या घेऱ्यात आली आहे. बीसीसीआय भारतीय खेळाडूंना इतर देशांच्या लीगमध्ये खेळू देत नाही. मात्र आयपीएलमध्ये त्यांच्या तंदुरूस्तीचा कुठलाही अभ्यास न करता खेळण्यास मुभा देते. मग तो खेळाडू देशासाठी महत्वाच्या स्पर्धा अथवा मालिकांसाठी फिट असो वा नसो. तीच गत बुमराहा बाबत बीसीसीआय, निवड समिती, टिम मॅनेजमेंट यांच्याकडून झाली आहे.
बुमराहा भारताचा प्रमुख गोलंदाज आहे. त्याची उपस्थिती संघात चैतन्य निर्माण करते. त्यासाठी त्याच्या महत्वाच्या सामन्यात खेळण्याचे किंवा खेळविण्याचे कुठलेच नियोजन न ठेवल्याने भारताला महत्वाच्या स्पर्धांमध्ये बुमराहाला गमवावे लागत आहे.
वास्तविक बुमराहा सन २०१६ पासून सातत्याने आयपीएल खेळत आहे. या दरम्यान तो एखाद दुसरा अपवाद वगळता १०६ सामने मुंबई इंडियन्ससाठी खेळला आहे. तर त्या उलट मागील दोन वर्षात भारताने खेळलेल्या ४९ टि२० आंतरराष्ट्रीय सामन्यांपैकी केवळ दहा सामनेच खेळला आहे. या दरम्यान भारताने टि२० विश्वचषक व आशिया चषक त्याच्या अनुपस्थितीत गमावला असला तरी टिम इंडिया आयसीसी मानांकनात क्रमांक एकवर आहे.
वास्तविक लिग क्रिकेटपेक्षा देशासाठी खेळणं महत्वाचं आहे. यासाठी खेळाडूंनीही देशाला प्रथम प्राधान्य देणं गरजेचं असताना आयपीएलला अग्रक्रम दिला जातो. मात्र याचा फटका देशाच्या राष्ट्रीय संघाला बसतो. यावर तातडीने दिर्घकालीन नियोजन होणं गरजेचं आहे. तरच भविष्यात असे प्रश्न उद्भवणार नाहीत.
ऑस्ट्रेलियातील खेळपट्ट्या वेगवान गोलंदाजांना मदत करणाऱ्या असल्याने अनुभवी बुमराहाची कमी टिम इंडियाला जाणवणार असली तरी ऑस्ट्रेलियातील पूर्व इतिहास वेगळंच काही सांगून जातो.
सन २०२१ मध्ये ऑस्ट्रेलियात कसोटी मालिकेत भारत १-० असे पिछाडीवर असताना, नियमीत कर्णधार विराट कोहली कौटुंबीक कारणास्ताव मायदेशी परतला. संघातले तब्बल नऊ प्रमुख खेळाडू जखमी अथवा जायबंदी होऊन संघाबाहेर गेले. शेवटच्या गाबा कसोटी करिता तर अकरा तंदुरूस्त खेळाडू मिळणंही मुश्किल झाले होते. त्यावेळी नटराजन, सुंदर, शार्दूल सारखे नेटबॉलर टिम इंडियात खेळले. या सर्वांनी चमत्कारीक कामगिरी करताना इतिहास घडवला व तब्बल ३२ वर्षानंतर गाबावर कांगारूंचा ढाबा उध्वस्त केला. अजिंक्य राहाणेने यशस्वी नेतृत्व केलेली ती मालिका आयसीसीने कसोटी इतिहासातील सर्वोत्तम मालिका जाहीर करून टिम इंडियाला लढण्यासाठी नवीन प्रेरणाच दिली.
प्रतिकुलतेवर मात करण्याची भारताची खास परंपरा असल्याने यावेळीही टिम इंडिया आहे त्या खेळाडूंसह सर्वोत्तम कामगिरी करेल व विश्वचषक पटकावूनच मायदेशी परतेल असे मला तरी मनोमन वाटते. त्यामुळे बुमराहा, जडेजा व आणखीही कोणी नसले तरी भारतीय संघास फरक पडणार नाही. कारण जे खेळाडू उपलब्ध आहेत तेही आपले कर्तव्य समजतात म्हणून तर त्यांना राष्ट्रीय संघात निवडले आहे.
डॉ.दत्ता विघावे
क्रिकेट समिक्षक.
इंटर नॅशनल मेंबर ऑफ वर्ल्ड पार्लमेंट,
ग्लोबल वर्कींग कमिटी मेंबर ऑफ डब्ल्यूसीपीए.
मेंबर ऑफ युनायटेड नेशन्स ग्लोबल टॅलेंट पुल,
प्रतिनिधी भारत.
Email: dattavighave@gmail.com

