१७३) पर्यावरण जनजागरण, राष्ट्रभक्ती आणि आरोग्य साक्षरता..!
विज्ञानाने आपल्याला काय दिले? पूर्वीचे आजारांचे प्रमाण, आजारांचे प्रकार तपासा. आज ५० टक्क्यांहून अधिक लोकसंख्या डायबिटीस, हाय ब्लड प्रेशर, कॅन्सर, पी सी ओ डि, थायरॉईड, पक्षाघात, ऑस्टिओपोरोसिस, अल्झायमर, ब्रेन कॅन्सर, लुकेमिया आणि विविध प्रकारच्या रोगाने ग्रस्त आहेत.
प्रगत विज्ञानाच्या माध्यमातून केलेल्या उपचारांनी आजार बरे होण्याचे प्रमाण खूपच कमी टक्के आहे.. आयुष्यभर औषधे घेत जगायचे याला आपण प्रगत विज्ञान म्हणायचे काय?
जन्मजात डायबेटिससारखे रोग आढळून येत आहेत . वातानुकुलित जिवन जगणारेआज नैसर्गिक वातावरणात राहू शकत नाहीत.
सरसकट लोकांकडे आज टू आणि फोर व्हिलर वाहने आहेत. वाहन चालविणाऱ्यांची सुटलेली पोटे हा गंभीर विषय आहे. सुटलेली पोटे म्हणजेच ऐश्वर्य, श्रीमंतीची लक्षणे असा प्रवास बनलाय.
पूर्वी शंभरात एखाद दुसरा आजारी पडायचा. कोणतीही मोठी साथ नाही आली तर सहजपणे लोक मरायचे नाहीत. आज काय होतंय? शंभरात पाच लोक सोडले तर प्रत्येकजण रोगाने पिडीत आहेच,
काहीच नाही तर दृष्टीदोष, चिडचिडेपणा, ऍसिडीटी, गुडघेदुखी, अपचन, ॲलर्जी, व्हेरिकोज व्हेन्स, बद्धकोष्ठता, मुळव्याध, हे तर नेहमीचेच झालेत.
आपण सर्व काही विज्ञानाच्या कसोटीवर घासून पाहत आहोत. पूर्वापर संस्कार अडगळीत पडलेले दिसतात. मग या विज्ञानाचा पाठपुरावा करत असताना आपण रोगराईचे प्रमाण वाढवण्यास कारणीभूत ठरलेलो आहोत असे आपणास वाटत नाही का?
प्रत्येक गोष्टीचे उत्तर काळ देत असतो. हरितक्रांतीसाठी रासायनिक खते, कीटकनाशके, अत्याधुनिक ट्रॅक्टर अवजारे आली. अतिरिक्त अन्नधान्य, वनस्पती साठविण्यासाठीसाठी शीतगृहे आली. जगाची मांसाहाराची भूक भागवण्यासाठी जागोजागी कत्तलखाने आले. दळणवळणासाठी रस्ते, रेल्वे, जहाजे, विमाने आणि वाहने आली. जागोजागी प्रचंड मानवी हिताच्या योजना राबविण्यासाठी सिमेंटच्या इमारती नि फ्लायओव्हर्स निर्मिती झाले. हे सारे मानवी हितासाठीच केले. यातून मानवाचे आरोग्य साधले गेले काय? तर याचे उत्तर नकारात्मकच आहे.
मग आता आपण काय करायचे ठरवले आहे. जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात की "आपली आपण करा सोडवणूक".
मेहनत करणाऱ्याला स्वार्थ नि मत्सर सहसा शिवत नाही त्यामुळे तो शक्यतो कधी आजारी पडत नाही. मेहनत करणाऱ्याला दगडावर डोके ठेऊन सुद्धा शांत झोप लागते आणि अजिबात मेहनत न करणाऱ्याला झोप लागत नाही हे सत्य आहे.
आपण विज्ञानाच्या साहाय्याने जेवढे सुधारणांचे जाळे वाढवीत आहोत त्याच गतीने, तेवढाच मोठ्या प्रमाणात पर्यावरणाचा विनाश आपल्याकडून घडत आहे हे सत्य जाणून आत्मपरीक्षण करावे हा या लेखनाचा उद्देश आहे.
लेखक :
पुण्यरत्न डॉ. चंद्रकांत शहासने.
मोबाईल: ९८८१३७३५८५

