महिला सरपंच म्हणून ग्रामपंचायत सदस्यांनी मला सहकार्य करावे - सरपंच राजश्री मगर
प्रतिनिधी : संजय वायकर
जेऊर : ३० / अहमदनगर तालुक्यातील जेऊर ग्रामपंचायत नेहमीच चर्चेत राहिली आहे . येथील महिला सरपंच व ग्रामविकास अधिकारी जेऊर गावचा विकास करण्यासाठी अतोनात प्रयत्न करत आहेत . ग्रामपंचायतच्या काही सदस्यांमध्ये नाराजीचा सुर असला तरी महिला सरपंच कोणाचाही विरोध न जुमानता गावच्या विकासासाठी झटत आहेत . यामुळे येथील कारभार सुयोग्य असा पाहावयास मिळणार आहे.
सतत असणाऱ्या पावसाने अतिवृष्टीमुळे गावातील काही भागातील रस्ते प्रमाणापेक्षा जास्त खराब झाले . परिणामी ग्रामसभेत विविध विषयांवर चर्चा करून तसेच रस्त्यांची पूर्ण माहिती घेवुन महिला सरपंच राजश्री मगर व ग्रामविकास अधिकारी बाळासाहेब आतकर सदर प्रश्न लवकरच शासन दरबारी मांडून त्यावर ताबडतोब दखल घेण्यास सांगणार असल्याचे समजते .
जेऊर ग्रामपंचायत मध्ये गावच्या विकासासाठी राजकारण बाजुला ठेवुन ग्रामपंचायत सदस्यांनी एकत्र येणे गरजेचे आहे. जेऊर ग्रामपंचायतच्या कारभाराला मागील आठ महिन्यात चौथा ग्रामविकास अधिकारी बदलला गेला आहे . सध्याच्या ग्रामविकास अधिकार्याकडे दोन गावांचा चार्ज आहे . ग्रामविकास अधिकारी टिकण्यासाठी सर्व सदस्यांनी एकमत ठेवले पाहिजे . प्रत्येकाच्या मर्जीतला ग्रामविकास अधिकारी सदस्यांना हवा आहे .सदस्यांनी कोणतीही नाराजी न ठेवता गावच्या विकासाचा मुद्दा महत्त्वाचा आहे हे लक्षात घेवुन सहकार्य करावे असे महिला सरपंच राजश्री मगर यांनी सांगितले .
विविध विकास कामांसाठी व रस्ते दुरुस्ती करण्यासाठी युद्ध पातळीवर उपाय योजना करणार असल्याचे ग्रामविकास अधिकारी बाळासाहेब आतकर यांनी सांगितले .
सदर प्रश्न शासन दरबारी मांडून ताबडतोब दखल घेण्यासाठी प्रयत्न करणार आहे . अतिवृष्टीने शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झालेले आहे यावर लवकरच उपाययोजना करण्यात येईल . रस्त्यांची पावसाने झालेली दुर्दशा व गावातील विकासाचे प्रश्न लवकरच मार्गी लावण्यात येतील . विकास कामे लवकर होण्यासाठी सदस्यांमध्ये एकमत असणे गरजेचे आहे . एक महिला सरपंच म्हणून गावच्या ग्रामपंचायत सदस्यांनी मला सहकार्य करणे अपेक्षीत आहे . गावचा कारभार सुयोग्य कसा राहिल यासाठी नेहमीच प्रयत्नशील रहाणार आहे .
सरपंच राजश्री मगर

