शौकतभाई शेख । श्रीरामपूर :-
तालुक्यातील अशोकनगर येथील कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात राष्ट्रपिता महात्मा गांधी व भारताचे दुसरे पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. याप्रसंगी महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले. याप्रसंगी कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाच्या प्राचार्या सुनीता गायकवाड या उपस्थितांना मार्गदर्शन करताना म्हणाल्या राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी भारतीयांना उपोषण, सत्याग्रह, असहकार इत्यादी अहिंसावादी परंतु परिणामकारक अस्त्रे दिली.
आज संपूर्ण जगाला महात्मा गांधी यांच्या विचारांची गरज आहे. महात्मा गांधींनी चम्पारण्य सत्याग्रह, चले जाओ आंदोलन, असहकार आंदोलन, स्वदेशी आंदोलन, दांडी सत्याग्रह इत्यादी यशस्वी आंदोलने केली. शिक्षण हे सक्तीचे व मोफत असायला हवे असा आग्रह महात्मा गांधींनी धरला होता. त्याचप्रमाणे भारताचे दुसरे पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांचे राष्ट्रनिर्मितीमध्ये मोलाचे योगदान आहे. त्यांनी जय जवान-जय किसान हा नारा देऊन नागरिकांना स्वाभिमानाची शिकवण दिली. पाकिस्तानने केलेल्या आक्रमणास त्यांनी सडेतोड उत्तर दिले. ताशकंद करार घडवून आणून शांतता प्रस्थापित करण्याचे काम लालबहादूर शास्त्री यांनी केले. या दोन्ही महापुरुषांचे राष्ट्रनिर्मितीमध्ये मोलाचे योगदान आहे असे गौरवपूर्ण उदगार प्राचार्या सुनीता गायकवाड यांनी काढले.
याप्रसंगी डॉ. संदीप सांगळे, प्रा. सुधीर शेरकर, प्रा. सुनील भरींडवाल, प्रा. योगेश राऊत, प्रा. वनिता भराडी, प्रा. पायल सुराणा, प्रा. सविता दरेकर, प्रा. संगीता खंडीझोड, प्रा. शशिकला साळवे, प्रा. अमित कदम, अशोक गायकवाड, संजय खरात इत्यादी उपस्थित होते.

