डी. एस.गायकवाड सर माहित नाही, असा विद्यार्थी आणि पालक राहत्यात शोधूनही सापडणार नाही. आदर्श शिक्षक कसा असावा याचा वस्तूपाठ घालून देणारे नगर जिल्ह्यात जे मोजके शिक्षक होऊन गेले, त्यातील एक डी.एस. गायकवाड सर होय.
परिस्थिती पुढे रडणारे आयुष्यात हरतात आणि परिस्थितीपुढे लढणारे स्वतःबरोबर इतरांच आयुष्य घडवतात. या विचाराला गायकवाड सरांनी प्रत्यक्षात उतरवले. सरांचं गाव राहाता तालुक्यातील खडकेवाके. त्या काळात बाराही महिने दुष्काळी. घरी उत्पन्नाचे साधन ऊस तोडणीतून मिळणारे दोन पैसे. पोटातली आग विझवण्यासाठी बालपणातच गायकवाड सरांच्या हातीही कोयता आला, परंतु राहत्यातील फादरवाडीच्या शाळेने त्यांना आधार दिला. याच शाळेतील बोर्डिंगमध्ये राहून सरांनी आयुष्याच्या जडणघडणीचा श्री गणेशा केला.
संयम आणि जिद्द या उपजत मिळालेल्या गुणांच्या भांडवलावर त्यांनी कठीण परिस्थितीवर मात करत पदवीनंतर शिक्षण शास्त्राचा अभ्यासक्रम पूर्ण केला. शिक्षक म्हणून रुजू झाले.' शिक्षक म्हणजे माणसाला परमेश्वराने पाठवलेला आशीर्वादच' हे वाक्य गायकवाड सरांना तंतोतंत लागू झाले. परमेश्वराने विद्यार्थी घडविणारा शिक्षक कसा असावा याची प्रेरणा इतरांना देण्यासाठीच सरांना जणू भुतालावर पाठवले. कोळपेवाडी, सोनगाव,राहाता या तीन गावात विद्यार्थ्यांना पुस्तकी ज्ञान देण्याबरोबर जगाचे पुस्तकही त्यांनी शिकवले.गायन,वादन, अभिनय,नाटककार, चित्रकार या सर्व कला परमेश्वराकडूनच त्यांना गॉड गिफ्ट मिळाल्या होत्या.
गणित,सायन्स आणि इंग्रजी यासारखे कठीण विषय शिकवण्याबरोबर सरांनी या कला विद्यार्थ्यांना शिकवल्या.विद्यार्थ्यांना शिक्षणाबरोबर जोडताना गावकरी, पालकांना शाळेशी कसं जोडावं याची कला फक्त गायकवाड सरांकडून शिकावी. शिक्षक म्हणून काम करताना त्यांनी स्वतः मधील सामाजिक कार्यकर्ता कधीच मरू दिला नाही.
सोनगावमध्ये 1995 ला गोरगरिब मुला-मुलींचा सामुदायिक विवाह सोहळा घेण्याचे त्यांनी ठरविले. या विवाह सोहळ्याला माजी खासदार पद्मभूषण स्वर्गीय बाळासाहेब विखे पाटील व माजी आमदार कॉम्रेड स्व. पी.बी.कडू पाटील या राजकारणातील एकमेकांच्या कट्टर विरोधकांना आवर्जून आमंत्रण दिले. गावातील लोकांनी विखे पाटील आणि कडू पाटील विवाह सोहळ्याला येणारच नाही. तुम्ही दोघांपैकी एकाला बोलवायला हवं होतं, असे सांगितले. सरांना मात्र त्यांच्या सत्कर्मावर विश्वास होता.कधीही एकत्र न येणारे हे दोन दिग्गज राजकीय नेते गायकवाड सरांचे आमंत्रण स्वीकारून विवाह सोहळ्याला आले. वधूवरांना त्यांनी आशीर्वाद दिले. विखे पाटील आणि कडू पाटलांची उपस्थिती म्हणजे सरांच्या निस्वार्थ कार्याची पावती ठरली.
शिक्षक म्हणून सरांनी जितके प्रामाणिकपणे काम केले तितकेच राहात्याला मुख्याध्यापक झाल्यावरही.ज्या शाळेत विद्यार्थी म्हणून ते शिकले, त्या शाळेत आधी शिक्षक नंतर ते मुख्याध्यापक झाले. असा बहुमान फार थोड्या लोकांच्या पदरी पडतो. मुख्याध्यापक म्हणून काम करताना सरांनी पालक मेळावा, विद्यार्थ्यांसाठी वेगवेगळ्या स्पर्धा,सहली आयोजित केल्या. शिक्षकांनी ज्ञान मिळवण्यासाठी सतत चौकस राहील पाहिजे. विद्यार्थ्यांच्या प्रश्नांची उत्तरे आवर्जून दिली पाहिजे.आम्ही तत्व, विचारामुळे घडलो. तुम्हीही याच गोष्टींची साधना करा. तुम्ही घडले तर विद्यार्थी घडतील.हे बरोबरच्या सहशिक्षकांना ते आवर्जून सांगायचे. त्यामुळे सर जितके आदर्श शिक्षक ठरले तितकेच मुख्याध्यापकही. शासनाच्या नियमाप्रमाणे सरांची सेवा संपली परंतु त्यांच्यातील शिक्षक कधीही मेला नाही.
सेवानिवृत्तीनंतरही माजी विद्यार्थ्यांना भेटणं,त्यांच्या सुखदुःखात सहभागी होणं, इतकच काय अडचणीत असलेल्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणे हाच सरांचा नित्यक्रम होता.दिवाळी, नाताळाला घरी आलेली मुलं सरांना आवर्जून भेटायला यायची. वाढलेल्या वयामुळे सर थकले होते. आजारीही होते पण त्यांनी घडवलेले विद्यार्थी आले कि सरांची दुखणे पळून जायचे.आयुष्यात मी कमवलेली हीच खरी संपत्ती,असे सांगायचे.
भेटायला आलेल्या मुलाच्या चेहऱ्यावरून हात फिरवत मुलांना आशीर्वाद द्यायचे. सरांचा मोठा मुलगा डॉ.जयंत गायकवाड माझा मित्र. त्याच्यामुळेच त्याचा लहान भाऊ जयेशचीही ओळख झाली.
बारा वर्षांपूर्वी राहत्याच्या चर्चसमोर सरांचा सेवापूर्ती सोहळा झाला होता. त्या कार्यक्रमालाही जयंतच्या आग्रहामुळे येण्याचा योग आला.
दोन दिवसापूर्वी याच चर्च समोर सरांच्या ४० व्या निमित्त जयंतने काढलेल्या गॉडफादर टाइम्स या विशेषांकाच्या प्रकाशनाला दोन दिवसापूर्वी प्रमुख पाहुणा म्हणून उपस्थित राहिलो. तहसीलदार कुंदन हिरे, भाजपचे नेते डॉक्टर राजेंद्र पिपाडा, माजी नगराध्यक्ष कैलास सदाफळ, डॉक्टर स्वाधीन गाडेकर, राहता प्रेस क्लबचे अध्यक्ष रामभाऊ लोंढे, पत्रकार बाळासाहेब सोनवणे आदींसह गायकवाड परिवारावर प्रेम करणारे अनेक आप्तेष्ट, नागरिक जमले होते.कार्यक्रम सुरू झाला. माझ्या मनात सरांच्या सेवापुर्ती सोहळ्यातील त्यांची हसरी मूर्ती घर करू लागली. माझी नजर ते गेलेली आहेत हे माहीत असूनही जमलेल्या गर्दीत त्यांना शोधू लागली. जस जसे वक्ते बोलू लागले, सरांच्या कार्यावर प्रकाश टाकू लागले, तस तसा जयंत बरोबर मीही क्षणभर हळवा झालो.
वाटलं परमेश्वराने इतक्या चांगल्या माणसाला न्यावच का? मनातल्या भावना आवरत मी बोलायला उभा राहिलो, तेव्हा नकळत ओठातून शब्द उमटले... डी.एस. गायकवाड सर हा विचार होता. माणूस शरीराने जातो. विचाराने नाही.
आज शैक्षणिक क्षेत्रात झालेला अंधार बघता शिक्षकच विद्यार्थ्यांवर करत असलेले अत्याचार आणि दुराचाराच्या घटना बघता या अंधारात गांगरलेल्या शिक्षक, पालकांसाठी आधार ठरतो तो फक्त गायकवाड सरांचा विचार. हा विचार सर्व शिक्षकांनी अंगीकारल्यास शिक्षण क्षेत्रातील अपप्रवृत्ती कायमची संपेल. भाषण संपलं. कार्यक्रमही संपला.गायकवाड फॅमिलीचा निरोप घेऊन मी गर्दीतून जायला निघालो. सरांच्या स्मृती मनाच्या पटलावरून जायला तयार नव्हत्या.
माझी कार अस्तगाव फाट्यापर्यंत आली, तेवढ्यात मोबाईलची रिंग वाजली. फोन होता मला घडविणाऱ्या शिक्षकांचा. ते म्हणाले, विकास कुठेय?काय करतोयस? मी म्हणालो, सर तुमच्याच आदर्श विचारांचा जागर पेरतोय...!

