shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

इंदापूर शहरात ईद-ए-मिलादुन्नबी उत्साहात व शांततेत साजरी

इंदापूर शहरात ईद-ए-मिलादुन्नबी उत्साहात व शांततेत साजरी

जुलूसमधील भारतीय ध्वज, भगवा, हिरवा ध्वज आणि मस्जिदे नबवीच्या प्रतिकृतीने वेधले सर्वांचे लक्ष

इंदापूर प्रतिनिधी:मुहम्मद पैगंबर समस्त मानवजातीसाठी कृपा बनवून पाठविण्यात आले होते. उच्च-नीच, काळा-गोरा, स्पृश्य अस्पृश्य याला इस्लाममध्ये थारा नसून, समता आणि बंधुता, एकेश्वरवाद, अंधश्रद्धामुक्त आणि चिकित्सक समाज हाच इस्लाम आणि मुहम्मद पैगंबर साहेबांच्या शिकवणींचा गाभा आहे. सर्व मानव एकाच निर्मात्याची निर्मिती असूनही मानवजात हजारो जाती आणि धर्मात विखुरली आहे. या अखिल मानवजातीला परमेश्वराच्या आज्ञेने समतेच्या एकाच छत्रछायेखाली आणून बंधुतेवर आधारलेली समाजव्यवस्था निर्माण करण्यासाठी पैगंबर साहेबांनी आपले आयुष्य वेचले. त्यामुळे पैगंबर साहेबांचे जीवनचरित्र प्रत्येकाने वाचणे आज काळाची गरज आहे.
इंदापूर (९ ऑक्टोबर) :- सकल मानवजातीला शांतीचा, समतेचा, बंधुत्वाचा आणि सद्भावनेचा संदेश देणारे इस्लामचे शेवटचे पैगंबर मुहम्मद (सल्ल.) यांची जयंती (ईद-ए-मिलादुन्नबी) इंदापूर शहरात उत्साहात आणि शांततेत साजरी करण्यात आली. यावेळी काढण्यात आलेल्या जुलूसमध्ये (मिरवणूक) हजारो मुस्लिम बांधव, लहान मुले आणि मुली सहभागी झाले होते. आज (९ ऑक्टोबर) कसबा परिसरातून सकाळी १० वाजण्याच्या सुमारास नारा-ए-तकबीर अल्लाहू अकबरच्या जयघोषात निघालेला हा जुलूस नेहरू चौक, खडकपुरा, बाबा चौक, मारुती मंदिर गल्ली, खडकपुरा, शेख मोहल्ला, तेली गल्ली अशी होत पाऊणे बाराच्या सुमारास दर्गाह मस्जिद चौकात पोहोचला.

जुलूसाची सांगता दर्गाह मस्जिदचे इमाम कारी अब्दुल करीम मुशाहिदी यांच्या उपदेशाने करण्यात आली. मुशाहिदी यांनी उपदेशामध्ये मुहम्मद पैगंबरांच्या, अखिल मानवजातीच्या भल्यासाठी आणि समस्त मानवांना हजारो दुष्कृत्यांच्या चिखलातून बाहेर काढून एकाच परमेश्वराच्या कृपेच्या छत्रछायेखाली आणणाऱ्या शिकवणींना उजाळा दिला.


जुलूसमध्ये मुस्लिम बांधवांनी हाती घेतलेल्या हिरव्या आणि भगव्या झेंड्यासह भारतीय ध्वजाने व पैगंबरांनी मदिनेत उभारलेल्या मस्जिदे नबवीच्या प्रतिकृतीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. मिरवणुकीदरम्यान विविध सामाजिक संघटनांकडून चौकाचौकात मुस्लिम बांधवांना मिठाई, बिस्किटे आणि विविध वस्तूंचे वाटप करण्यात आले. वरील बाबी पाहता ही जयंती सद्भावनेचा संदेश देणारी ठरली.

पैगंबर जयंतीनिमित्त शहरात विविध कार्यक्रमांचे आयोजन

ईद-ए-मिलादुन्नबी निमित्त शहरातील टिपू सुलतान यंग सर्कल या सामाजिक संघटनेकडून हिजामा (cupping Theropy) कॅम्प आयोजित करण्यात आला होता. तर इंदापूर मुस्लिम जमातच्या वतीने दर्गाह मस्जिद चौकात जुलूसमध्ये सामील आणि शहरातील गोर गरीब आणि गरजू लोकांसाठी जेवणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. तर श्रीनाथ मित्र मंडळाच्या वतीने शहरातील सरस्वतीनगर भागात शरबत वाटपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
close