अकोले(प्रतिनिधी): - छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्वराज्य निर्माण केले त्यातून सुराज्य बनवले. वडील शहाजी राजे व माता जिजाऊ यांची प्रेरणा व विश्वास सार्थ ठरविला आहे. असे मत शिव व्याख्याते प्रा. नितीन बानगुडे यांनी व्यक्त केले.
अकोले येथील प्रा.एस.झेड देशमुख गौरव समिती च्या वतीने येथील अगस्ति विद्यालयाचे प्रांगनात आयोजित अमृत महोत्सव अभिष्टचिंतन सोहळ्यात प्रमुख व्याख्याते म्हणून प्रा.बानगुडे बोलत होते. या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी बीजमाता,पद्मश्री राहीबाई पोपेरे होत्या. यावेळी कैलासराव वाकचौरे, मधुकरराव नवले, अशोकराव देशमुख, विक्रम नवले, भाऊसाहेब वाकचौरे, आदीसह अनेक मान्यवर व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शिवव्याख्याते प्रा. नितीन बानगुडे यांनी पराभव पहिल्यांदा रणात होत नाही तो मनात होतो.आणि मनाने पराभूत झालेली माणसे रणात पराभूत होत असतात, तर मनाने जिंकलेली माणसे रणात कधीही पराभूत होत नसतात. एस.झेड.देशमुख यांनी अनेक मने जागृत केली.त्यांनी मन मन घडविली,मनांची साखळी तयार केली.त्यांनी जागृत मनांच्या मालिका तयार केल्या. आणि ज्यावेळी मने जागृत होतात त्यावेळी इतिहास घडत असतो. हे दिशादर्शक, प्रेरणादायी काम प्रा.देशमुख यांनी केले. आपल्या विचाराने अनेक पिढया त्यांनी घडविल्या असे गौरवोदगार काढले.
छत्रपती शिवाजी महाराजांचा जाज्वल्य इतिहासातील अनेक प्रसंग आपल्या अमोघ शैलीत सांगत उपस्थितांना भारावून टाकले. वयाच्या बाराव्या वर्षी छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर स्वराज्य सह सुराज्य करण्याची जबाबदारी शहाजी राजे यांनी दिली. इतका मोठा विश्वास वडिलांनी मुलावर टाकला. छत्रपती शिवाजी महाराज यांनी पन्नास वर्षाच्या आयुष्यात नियोजन करून साडेसातशे वर्षाचे पारतंत्र्य संपविले.
छत्रपती हे अफजलखानाचे पोट अन शाहीस्तेखान बोट या पुरते मर्यादित नाही. शिवाजी महाराजांच्या राज्यात राज्याच्या उभारणीत प्रत्येकाचा सहभाग असायचा. त्यांनी महाराष्ट्रसह बाहेर राज्यात ही किल्ले बांधले. छत्रपतींच्या राज्यात एकाही शेतकऱ्यांनी आत्महत्या केली नाही. छत्रपतींनी अनुकंपा तत्वावर नोकरी दिली. धारातीर्थी पडलेलेल्या सैनिकांच्या बालकांच्या शिक्षणाची, खाण्या सर्व जबाबदारी घेतली. विधवाना निम्मा पगाराइतकी पेन्शन, आई वडिलांना पेन्शन म्हणून अडीच शेर धान्य देण्याचे काम केले. राज्याची लिखित राज्यघटना लिहिली सिंहासनाच्या बाजूला असलेल्या तलवारी च्या टोकावर समान असा तराजू लावून सर्वाना न्याय समान देण्याचे प्रतीक उभारले त्यासाठी स्वतंत्र न्यायव्यवस्था उभी केली. महाराजांनी नेहमी दहा हजार मावळ्यांची फौज राखीव ठेवीत असे. खऱ्या अर्थाने राज्य राखीव दलाची संकल्पना महाराजांची आहे असेच म्हणावे लागेल. महाराष्ट्रात पहिले लोकशाही राज्य स्थापना केले. बाबासाहेब आंबेडकर यांनी घटना लिहिताना छत्रपतींच्या विचाराशी सुसंगत असलेली राज्यघटना लिहिली.
महाराज यांचे गुप्तहेर खाते अतिशय प्रबळ होते. बहिर्जी नाईक सोडून कोणत्याही गुप्तहेराचे नाव अजूनही माहीत नाही. असे सांगतांना कारणे सांगणारे कधीही जीवनात यशस्वी होत नाही, महाराजांनी शून्यातून राज्य स्थापना केले. प्रतिकूल परिस्थितीला अनकुल परिस्थिती करण्यात महाराज यशस्वी झाले म्हणून ते सुराज्य करू शकले. महाराज यांच्या लढाई रात्री अन त्याही अमावस्या च्या रात्री केल्या मात्र श्रीगोंदयाचा किल्ला दिवसा जिंकला तोही युद्ध न करता ही युद्धनीती महाराजांची होती. कारण सर्वच लढाई तलवारीच्या जीवावर जिंकता येत नाही तर बुद्धीच्या जीवावर जिंकता येते. हे त्यांनी दाखवून दिले.
तामिळनाडूमध्ये साजरा व गोजरा हे दोन किल्ले बांधले, मोगलांना एक किल्ला जिंकण्यासाठी किमान एक वर्ष लागेल या पद्धतीने जिंजीचा किल्ला केवळ पन्नास हजारात घेतला व सुराज्याच्या भवीतव्याच्या व सुरक्षिततेच्या दृष्टीने साडे सात लाख रुपयांचे ३६० किल्ले बांधले. असे नियोजन छत्रपतींनी केले होते.
मोगलांच्या विरोधात १४० लढाया केल्या त्यापैकी एकही लढाई न हरणारे संभाजी राजे एकमेव राजे होते. महाराष्ट्राच्या नादाला जो लागला त्याचा औरंगजेब झाला असल्याचे ते म्हणाले. शहाजी राजे, छत्रपती शिवाजी राजे व संभाजी महाराज यांचा इतिहास पुढच्या पिढी ला प्रेरणादायी राहील असे प्रा.बानगुडे यांनी सांगत उपस्थित श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले.
पदमश्री राहीबाई पोपेरे म्हणाल्या की, अनेक विद्यार्थी घडविले असून त्यांच्यावर चांगले संस्कार केले. कोणतीही तडजोड न करता जीवन जगणारे हे खरे आदर्श आहेत. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सारखे युवक अन जिजामाता यांचे सारखे युवती तयार व्हाव्यात अशी अपेक्षा व्यक्त केली.
प्रा.एस झेड देशमुख यांनी आपला जीवनातील संघर्षमय जीवनपट उलगडवून सांगितला. विद्यार्थ्यांनी निर्व्याज पणे प्रेम केले यातच मला सर्व काही मिळाले, याच्या सारखा जीवनात दुसरा आनंद नाही. वेळेबाबत अतिशय सतर्क असल्याने त्यामुळे मला राजकारणातुन बाहेर पडावे लागले. आमदार खासदार निवडणूकीसाठी मला संधी होती मात्र मी ती घेतली नाही.एकही रुपया खर्च न करता संगमनेर नगर परिषदेत नगरसेवक झालो. पूर्वी चे पुढारी चळवळीतुन तयार व्हायचे आताचे
पुढारी हे फ्लेक्स बोर्ड चे पुढारी असून ते ढाब्यावर बसून जन्माला येतात अशी मल्लिनाथीही त्यांनी केली. आई कडून चिकाटी व वारकरी असलेल्या वडिलांकडून चांगल्या मार्गाने पैसे कमवायचे हे शिकलो.आपली हिंदू संस्कृती असून आपले नवीन वर्ष चैत्र पाडव्याला सुरू होते ३१ डिसेंबर ला नाही.आजची पिढी वाचन करीत नाही हे दुर्दैव आहे.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत दूधगंगा पतसंस्थेचे कार्य. संचालक अशोकराव शिंदे यांनी केले. सूत्रसंचालन अगस्ति कारखान्याचे मुख्य लेखापाल एकनाथ शेळके यांनी मानपत्राचे वाचन शिक्षक चंद्रविलास गव्हाणे यांनी तर आभार विजय सावंत यांनी मानले. या कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी संजय भुजबळ, आत्माराम रंधे, विजय सावंत, अनिल नाईकवाडी, जगदीश चौधरी ,अशोक शिंदे, भीमाशंकर तोरमल ,राहुल ढोक आदीनी प्रयत्न केले.

