shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

दत्त देवस्थान शांतीधाम बनले आहे - माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे

दत्त देवस्थान शांतीधाम बनले आहे - माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे

 हजारो भक्तगणांच्या उपस्थित दत्त जयंती साजरी

फोटो: शहाजी नगर येथील दत्त देवस्थान येथील श्रींच्या पादुका पालखीत विराजमान करताना माजी मंत्री प्रा.लक्ष्मणराव ढोबळे व मान्यवर.

इंदापूर(प्रतिनिधी):मनाला शांती आणि समाधान या दोनच गोष्टी जीवनाला चांगली कलाटणी देऊ शकतात.शांती आणि समाधान याचा संगम, शहाजीनगर येथील दत्त देवस्थानामध्ये हरी भजनामुळे,अन्नदानामुळे चिरंतर राहिला आहे. त्यामुळे दत्त देवस्थान हे शांतीधाम बनले आहे असे गौरवोद्गार राज्याचे माजी शिक्षण मंत्री प्राध्यापक लक्ष्मणराव ढोबळे यांनी काढले.

           दत्त जयंती सोहळ्यास उस्फूर्त प्रतिसाद दत्त देवस्थान शहाजी नगर येथे दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या गजरात लाभला,दत्त जयंती सोहळ्यातील मानाची आरती राज्याचे माजी शिक्षण मंत्री प्राध्यापक लक्ष्मणराव ढोबळे,शाहू शिक्षण संस्थेच्या मुख्य विश्वस्त कोमलताई साळुंखे- ढोबळे,जय भवानीगड विकास शैक्षणिक संकुलाचे संस्थापक श्रीमंत ढोले,भवानीगड संस्थेच्या उपाध्यक्ष सौ.चित्रलेखा श्रीमंत ढोले,यांच्या हस्ते श्रींच्या पादुका मुख्य पालखीत हरिनामाच्या गजरात ठेवण्यात आल्या.दत्त देवस्थान शहाजीनगर चे प्रमुख महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे इंदापूर तालुका अध्यक्ष नीलकंठ मोहिते व तानाजीराव गायकवाड यांनी स्वागत केले.

                 यावेळी इंदापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती मयुरसिंह पाटील,निरा भिमा सहकारी साखर कारखान्याचे संचालक उदयसिंह पाटील,बाजार समितीचे संचालक शिवाजीराव इजगुडे,इंदापूर नगरपरिषदेचे माजी उपनगराध्यक्ष प्राध्यापक कृष्णाजी ताटे,अरविंद वाघ,यांच्यासह हजारो दत्त भक्त उपस्थित होते. श्री.दत्तात्रयांचा जन्म यावर माजी मंत्री प्राध्यापक लक्ष्मणराव ढोबळे बोलत होते.

           चाळीस वर्षापासून गुरुचरित्र वाचन दत्त देवस्थान मध्ये अखंड सुरू आहे.धावपळीच्या जीवनात कुठेतरी मनाला विसावा आनंद हवा असतो.धार्मिक सांस्कृतिक कार्यक्रमातून नव्या पिढीला प्रबोधन हे दत्त देवस्थान सातत्याने उपलब्ध करून देत आहे.त्यामुळे हजारो भक्तगणांचा ओघ वाढतो आहे याचा आनंद वाटतो.आगामी काळात भक्तगणांच्या अधिकच्या सुविधेसाठी दत्त देवस्थान प्रयत्न करेल.असा आशावाद माजी मंत्री प्राध्यापक लक्ष्मणराव ढोबळे यांनी व्यक्त केला.

  **चौकट:-

" महिलांनी पाळणे गात केला दत्त जन्मोत्सव "

अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता काल्याच्या कीर्तनाने करण्यात आली.श्रींची पालखी मिरवणूक दिगंबरा दिगंबरा या नाम गजरात उंबर प्रदक्षणा करत पार पडली.तर नंतर आरती होऊन भक्तगणांना महाप्रसाद देण्यात आला.हजारो महिलांनी दत्तगुरूंचे पाळणे गात दत्त जन्म उत्सव साजरा केला.




close