shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

वाद संवाद भाषाविज्ञान

१७८) वाद संवाद भाषाविज्ञान..

गेल्या अनेक वर्षापासून आपल्याकडे प्रत्येक गोष्ट विज्ञानाच्या कसोटीवर घासून पडताळणी करण्याचा एक प्रवाह चालू आहे.अलीकडे विविध वक्तव्यांवरून जे वादंग निर्माण होत आहेत त्या संदर्भात यापुढे भाषा हा विषय देखील विज्ञानाच्या परिभाषेत घासून पुसून समजून घेणे गरजेचे आहे असे वाटते.

संपूर्ण विश्वात असंख्य भाषा आहेत. अर्थात या सर्व भाषांना देहबोलीची साथ असते आणि व्यक्त होणारी भाषा देहबोलीच्या साह्याने त्याचा मतितार्थ सांगत असते. भाषेमध्ये श्लेष आणि उपमा दोन महत्त्वाचे अलंकार आहेत. कदाचित भविष्यामध्ये या दोन्हीही अलंकारांवर बंदी येण्याची शक्यता वाटते. कारण भाषा समजून घेण्याची संवेदना जर पराकोटीची एकांगी हटवादी असेल तर त्यातून केवळ वादच उत्पन्न होणार. कायदा, सुव्यवस्था आणि निकोप समाजव्यवस्थेकरिता संवाद महत्त्वाचा असतो. 

एकच शब्द, एकच वाक्य विविध प्रकारच्या देहबोलीने विविधांगाने  नि विविधार्थाने व्यक्त होते तेव्हा भावार्थ बदलतात.भाषा समजून घेताना व्यक्तींमध्यील पूर्वग्रह हे देखील अत्यंत महत्त्वाचे असतात. परस्परांतील नातेसंबंध देखील महत्त्वाचे असतात. कोणत्या वेळी, कोणत्या प्रकारे, कोणत्या संदर्भात, कोणते वाक्य वापरले  याची जाण भाषा समजून घेणाऱ्याला असणे तितकेच महत्त्वाचे आणि जरुरीचे असते. त्यामुळे भाषा समजून घेताना काळ हा देखील तितकाच महत्त्वाचा असतो. 

प्रत्येक बारा कोसावर भाषा बदलते त्यामुळे बोलणे समजून घेताना मायबोलीतील पारंपारिक शब्दांचे संदर्भ व भावार्थ याचा देखील अभ्यास करणे क्रमप्राप्त होते. 
विदर्भातील झाडीबोली, धुळे जळगावची अहिराणी, डहाणूची वारली, पालघरची वाडवळी, जनजातीमधील कातकरी, ठाकरी,कोरकू, रायगड ठाण्यातील मधील आगरी, कोकणातील मालवणी अशा विविध बोलींतून आपली मराठी प्रमाण भाषा तयार झालेली आहे. अशाप्रकारे प्रत्येक प्रमाणभाषेच्या विविध बोली असतातच.  एखाद्या भूभागावर जो शब्द सहजगत्या दैनंदिन व्यवहारात उच्चारला जातो तो दुसऱ्या भूभागात अपमानकारक समजला जातो.  सद्याच्या सुधारणांच्या गतिमान युगात स्थलांतरे मोठ्या प्रमाणात होत आहेत. त्यामुळे सद्याच्या भाषेच्या भावार्थासंदर्भातील वादांचे स्वरूप पहाता भाषाविज्ञानाचा अभ्यास करणे ही काळाची गरज ठरणार आहे.

लेखक : पुण्यरत्न डॉ. चंद्रकांत शहासने (देशभक्तकोशकार)
मोबाईल क्रमांक : ९८८१३७३५८५
close