बावडा गावच्या विकासासाठी रु.१५.८५ कोटींचा निधी- हर्षवर्धन पाटील
इंदापूर : प्रतिनिधी
बावडा गावच्या विविध विकास कामासाठी एकूण रु.15.85 कोटी रुपयांची निधी देण्यात आला आहे. राज्यामध्ये शिवसेना-भाजपचे सरकार सत्तेवर आल्याने गावच्या विकासासाठी निधीची ओघ सुरु झाला आहे, अशी माहिती भाजप नेते व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी दिली.
बावडा येथे रत्नाई बंगला येथे ग्रामस्थांशी विकास कामांसंदर्भात संवाद बैठकीत हर्षवर्धन पाटील बुधवारी (दि.21) बोलत होते. बावडा गावच्या विकासासाठी रु.11 कोटी 72 लाख रुपयांची विकास कामे मंजूर असून त्यापैकी अनेक विकास कामे सुरु असून उर्वरित विकास कामे येत्या मार्च अखेर पूर्ण होतील. सदर कामांमध्ये रस्ते, काँक्रीट करण, सुशोभीकरण, ड्रेनेज आदी विविध कामांचा समावेश आहे. तसेच गावच्या विकासासाठी आणखी रु.4 कोटी 13 लाख रुपयांचा प्रस्ताव हा मंजुरीच्या अंतिम टप्प्यात असून सदरची कामेही मार्च अखेर पूर्ण केली जातील, असे हर्षवर्धन पाटील यांनी सांगितले.
ते पुढे म्हणाले, बावडा गावातील वालचंदनगर (शाहू चौक) चौकाचे सुशोभीकरण केले जाईल, तसेच बावडा-वालचंदनगर, बावडा-इंदापूर या गावातून जाणाऱ्या रस्त्यावर दुभाजक व त्यावर लाइटिंग आणि रस्त्याच्या दोन्ही बाजूला ड्रेनेजची कामे पूर्ण केली जातील. त्याचप्रमाणे बावडा-बारावाफाटा-माने मळा-नीरा भीमा कारखाना तसेच बावडा-बारावाफाटा-बोकूडदरा-नवले वस्ती- शेटफळ हवेली या दोन्ही रस्त्यांचे डांबरीकरणाचे काम केले जाईल. तसेच नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी बावडा येथे सुमारे रु. 4:कोटी रुपये खर्चून पोलीस कार्यालय व पोलिस निवासस्थान इमारत बांधकामासाठीच्या प्रस्तावास शासनाकडून लवकर मंजूर मिळेल व तेही काम तातडीने पूर्ण केले जाईल. त्याचप्रमाणे बावडा गावासाठी वाड्या- वस्त्यांवर नळ पाणीपुरवठा योजनेसाठी रु.3 कोटी 73 लाख रुपयांचा निधी मंजूर झाला असून सदरचे काम येत्या 6 महिन्यात पूर्ण होईल, अशी माहितीही यावेळी हर्षवर्धन पाटील यांनी दिली.
प्रारंभी प्रास्ताविक सरपंच किरण पाटील यांनी केले. याप्रसंगी निरा भिमा कारखान्याचे संचालक उदयसिंह पाटील, विकास पाटील, मनोज पाटील, महादेव घाडगे, अनिल पाटील, अमरसिंह पाटील, डॉ. लक्ष्मण आसबे, प्रा.पंडितराव पाटील, उपसरपंच निलेश घोगरे, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन एस.टी. मुलाणी यांनी केले. तर आभार ग्रा.पं. सदस्य मुनीर आतार यांनी मानले.

