जावेद शेख । राहुरी :
तालुक्याच्या दळणवळणाच्या दृष्टिकोनातून महत्त्वाच्या असणाऱ्या तीन रस्त्यांना खासदार सदाशिवराव लोखंडे यांच्या प्रयत्नांमुळे अखेर मंजुरी मिळालेली आहे. त्यामुळे नागरिकांमधून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.
याबाबत माहिती अशी की, खासदार सदाशिवराव लोखंडे यांच्या प्रयत्नाने राहुरी तालुक्यातील ३२ गावांचा दळण वळणासाठी महत्वाचे रस्ते मंजूर करण्यात आलेले आहेत. नागरिकांमधून या रस्त्यांची दुरुस्ती व्हावी अशी मागणी अनेक वेळा केली जात होती, तसेच अनेक सामाजिक संघटना व बाळासाहेबांची शिवसेना पदाधिकाऱ्यांनी याबाबत खासदार सदाशिवराव लोखंडे यांच्याकडे सतत मागणी केली होती.
खासदार सदाशिवराव लोखंडे यांनी याबाबत संबंधित अधिकाऱ्यांना आदेश करत सदर रस्त्यांचे कामांचा प्रस्ताव त्वरित मंत्रालयाकडे सादर करण्या संदर्भात सूचना केल्या होत्या.
त्यानुसार तालुक्यातील १)सोनगाव, सात्रळ, रामपूर, कोल्हार खु, चिंचोली, गंगापूर, दवणगाव, आंबी, अंमळनेर, चांदेगाव रस्ता प्रजिमा १५७ मजबुतीकरण डांबरीकरण करणे रू १ कोटी रुपये
२) संगमनेर, शिबलापूर, गुहा, देवळाली, टाकळीमियां, पाथरे, तीळापुर प्रजीमा २६ मजबुतीकरण डांबरीकरण करणे करिता रू ३.५ कोटी त्याचबरोबर
३) सोनगांव, सात्रळ, कोल्हार चिंचोली,आंबी, अमळनेर, चांदेगांव या रस्त्यासाठी देखील ३ कोटी रुपये मंजूर करण्यात आलेले आहेत,
एकूण साडे सात कोटी रू.चे रस्ते मंजूर करण्यात आलेले आहेत.
सदर कामांसाठी बाळासाहेबांची शिवसेना पक्षचे दोन्ही जिल्हाप्रमुख राजेंद्र देवकर, कमलाकर कोते, संपर्क प्रमुख बाळासाहेब पवार, तालुका प्रमुख सुनील क-हाळे, नगराध्यक्ष सत्यजित कदम, ज्येष्ठ नेते आणासाहेब म्हसे, जयवंत पवार,संपत जाधव यांनी खासदार लोखंडे यांच्याकडे वारंवार पाठपुरावा केला होता.

