shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

सावित्रीबाई लढल्या म्हणून आम्ही घडलो - मयुरा ठोंबरे -पाटील . सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त विशेष लेख

सावित्रीबाई लढल्या म्हणून आम्ही घडलो - मयुरा ठोंबरे -पाटील
सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त विशेष लेख
इंदापूर प्रतिनिधी: 
क्रांतीज्योती समजून घेताना....
आज ३ जानेवारी२०२३ क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची १८९ जयंती आपण साजरी करत आहोत.
सावित्रीबाई लढल्या म्हणून आम्ही घडलो हे वाक्य खूप काही सांगून जातं...
सावित्रीबाई कोण होत्या?..त्या प्रतिभावांच्या शिक्षक होत्या, शिक्षण तज्ञ नामवंत कवयित्री उत्तम संघटक व प्रभावी वक्त्या होत्या. प्रत्येक क्षेत्रामध्ये त्या प्रभावी कार्य करत होत्या. मला वाटते एका स्त्रीने स्त्रीच्या हक्कासाठी केलेला संघर्ष म्हणजेच क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले.
त्यावेळी त्या स्त्रियांच्या शिक्षणासाठी हक्कासाठी लढल्या नसत्या तर आजची परिस्थिती किती बिकटअसती .याचा विचार करवत नाही. त्यांनी केलेले कार्य अनमोल आहे. त्यांची यशोगाथा शब्दात मांडणं कठीण आहे पण हा छोटासा प्रयत्न.....

सावित्रीबाई शिकल्या मुलींना शिकवलं हे आपण अत्यंत सहजपणे बोलतो अथवा त्याबद्दल लिहितो असतो पण ज्या परिस्थितीमध्ये त्या शिकल्या व त्यांनी हा संघर्ष केला त्याचा आढावा घेतल्यावर समजते सावित्रीबाई कोण होत्या कशा होत्या....
तो एक काळ होता...
ज्यामध्ये मुलगी जन्माला येणे हे पाप मानले जायचं .जन्माला आलेली मुलगी ही ओझं समजलं जायचं. महिलेला कमजोर व अबला समजले जायचे. अत्यंत दुष्ट समाज त्याकाळी होता. मग महिलांचे शिक्षण तर दूरचीच गोष्ट होती. चुल आणि मुल या पलीकडे तिला दुसरं काही माहिती नव्हतं. आणि तशा  त्या काळामध्ये  शिक्षणाचा दर फक्त २.५% टक्के होता, तोही फक्त पुरुषांचा .महिलांचा शिक्षण तर शून्य टक्के होता.
अशा या अंधकाराच्या काळात सावित्रीबाई ज्योतिबा फुले या वाघिणीचा जन्म झाला. त्या काळामध्ये स्त्रियांचे जगणे मुश्किल होते. मग शिक्षण तर काय दुरची गोष्ट.. सावित्रीबाईंनी हे सर्व पाहून स्त्री शिक्षणाचा ध्यास घेतला.
त्यांनी आधी स्वतः शिक्षण घेतले आणि नंतर त्या इतरांना शिकवू लागल्या.
यासर्व कार्यामध्ये त्यांना ज्योतिबा फुले यांची लाख मोलाची साथ लाभली. दोघांनी मिळून शिक्षणाची प्रकाश वाट इतरांना दाखवली हे काम करत असताना समाजातील काही उरमोट लोकांनी त्यावेळी रस्त्यावरून जाताना त्यांच्या अंगावरती शेण फेकले ,खालच्या दर्जाचे भाषा त्यांना वापरली. पण दोघेही डगमगले नाहीत किंवा या कार्यातून हटले नाहीत. त्यांनी त्यांचे काम सुरूच ठेवले. हा संघर्ष करीत असताना सुरुवातीला त्यांनी स्त्रियांमध्ये आत्मविश्वास निर्माण केला, त्यांना बळ दिले. भारतामध्ये पहिली शाळा त्यांनी पुण्यातील भिडेवाडा येथे चालू केली. शाळा सुरू केल्यावर त्यामध्ये फक्त नऊ मुली होत्या. पण त्यांना ज्ञान देण्याचे काम त्यांनी केले व हा लढा चालूच ठेवला. शिक्षण देत असताना पहिलीपासूनच मुलांना इंग्रजी विषय सुद्धा शिकवला जेणेकरून आपली मुले कुठेही कमी पडू नयेत. हाच त्यांचा दृष्टिकोन.
नवजात कन्या बालकांसाठी कन्यासीशुग्रह उभारले. तिथे त्या सर्व नवजात कन्यांचा संभाळ करीत असत. समाजात तेव्हा मुलगी झाली म्हणून नवजात कन्या यांना नीट वागणूक मिळत नव्हती. त्यांना नीट सांभाळ जात नव्हते. पण सावित्रीबाईंनी हा प्रकार मोडीत काढण्यासाठी हा प्रयत्न सुरू केला. त्या कन्याशिशुगृहा मध्ये त्यांचा संभाळ करीत आणि नंतर त्यांना योग्य प्रकारे शिक्षण सुद्धा देत. त्यांचे हे कार्य खरच अभिमानास्पद आहे.
मुलगी नको मुलगा हवा अशी त्याकाळच्या लोकांची भावना होती. पण सावित्रीबाईंनी त्याचा विचार केला नाही . त्यांनी मुलींच्या शिक्षणाला प्राधान्य दिले आणि त्याचा उपयोग आज आपण समाजात बघतो.  स्त्री ही पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून काम करते. कोणत्याच क्षेत्रामध्ये आज तिथे प्रभुत्व कमी नाही. आज साक्षरतेचे प्रमाण पाहिले तर ८८ टक्के लोक आज साक्षर आहेत. सुशिक्षित आहेत .पण असे असताना सुद्धा. समाजात वावरताना आजही एक शोकांतिका जाणवते. आजही काही लोक जुन्या मानसिकतेचे दिसतात. वंशाला दिवा पाहिजे मुलगा पाहिजे या अट्टाहासावर बसलेले असतात. वंशाला दिवा पाहिजे म्हणताना त्यांना एक कळत नाही की वात शिवाय पणती पेटत नाही. पण मुलगी झाली म्हणून तिला  नाली मध्ये रस्त्याच्या कडेला फेकणारे असुरी विचारांचे लोक आजही समाजात वावरताना दिसतात. त्यांना माझा एकच प्रश्न आहे कसले तुम्ही सुशिक्षित? कसले तुम्ही साक्षर? एवढा कसा मागासलेला  हा समाज आहे?
पावणे दोनशे वर्षांपूर्वी सावित्रीबाईंनी केलेला लढा हा पुन्हा एकदा करावा लागेल का हा प्रश्न मनात पडतो. समाज आजही भरकटलेल्या स्थितीत आहे. भरकटत आहे .आजही त्यांना मुलींची किंमत पूर्णतः समजलेली नाही. आजही मुलींना बघण्याची नजर  काही अंशी संशयास्पद असते.असे असताना बोटावर मोजण्या एवढे लोकही असं मजेत आहेत जे मुलींना सन्मानाने जगवतात. सन्मानाने वाढवतात आणि त्यांना उच्च शिक्षण देऊन स्वतःच्या पायावर उभे करतात. आणि त्यांना संपत्ती म्हणतात. निर्भीड बनवतात. अशा लोकांची समाजाला खरंच गरज आहे.
मुली शिकाव्यात म्हणून लेक शिकवा लेक वाचवा अभियान सुद्धा सुरू केले. पण ते किती यशस्वी झाले हे पूर्णपणे सांगता येत नाही. सर्वात भयानक बाब म्हणजे आज स्त्रीच स्त्रीची दुश्मन झाली आहे. इंटरनेट सोशल मीडियाच्या दुनियेत वावरताना फक्त बाहेरच्या रूपाला किंमत देऊन आमच्या भगिनी समाजामध्ये वावरताना दिसतात. समाजसेवा करायला नको म्हणतात .गोरगरिबांना मदतीसाठी पुढे येत नाहीत. येणाऱ्या असतात पण संख्या खूप कमी. तू मोठे की मी मोठी या वादातच बऱ्याचशा जणी अडकलेले आहेत. घरामध्ये सुद्धा आवरताना मोठ्या स्त्रीने छोट्या स्त्रीचा सन्मान केला  तर अनेक वाद मिटतील व अनेक संसार सुखी होतील. पण स्त्रिया समजून कधी घेतील हा पुन्हा एकदा पडलेला प्रश्न.
अशा समाजासाठी पुन्हा क्रांतीज्योती  सावित्रीबाईंना जन्म घ्यावा लागेल का?
पण प्रत्येकीने जर ठरवले त्यांचे गुण आत्मसात केले तर प्रत्येकी मध्ये सावित्रीबाई जिवंत राहतील. हेच खरं सत्य. आपण सर्वजण यांनी एकमेकींना केलेला सन्मान दिलेली मदतीची भावना केलेले सहकार्य हेच खरे सावित्रीबाईंना मानवंदना. अशाप्रकारे सावित्रीबाई समजून घेताना हा लेख लिहिण्याचा प्रयत्न आज एक सावित्रीची लेक म्हणून केला आहे. सावित्रीबाईंना बद्दल लिहिणे एवढ्या कमी अक्षरात शक्य नाही.
जाता जाता या आईबद्दल एक लिहावं वाटतं
"क्या गरम होगा वो खून,
और क्या उसकी जुबानी होगी...
जिंदगी होगी उनकी मेहबूबा,
और मौत मी दिवानी होगी"
अशा या थोर क्रांतीज्योतीला शतशः नमन.
     लेखन: सौ .मयुरा ठोंबरे - पाटील
                इंदापूर
close