प्रतिनिधी : आसावरी वायकर
सोलापूर : दि.७ / "वृत्तपत्र लेखकांनी पत्र- लेखनाच्या माध्यमातून सोलापूरच्या शाश्वत विकासासाठी महत्त्वाची भूमिका बजावली पाहिजे". असे मत सोलापूर आकाश वाणीचे वृत्तनिवेदक आणि 'मसाप' जुळे सोलापूरचे अध्यक्ष पद्माकर कुलकर्णी यांनी व्यक्त केले.
सोलापूर जिल्हा वृत्तपत्र लेखक मंचच्या वतीने बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त पत्रकार दिनाच्या औचित्य साधून कुलकर्णी यांचा सत्कार केला. त्यावेळी ते बोलत होते. सोलापूर शहर ज्येष्ठ नागरिक संघ, समन्वय समितीचे अध्यक्ष गुरुलिंग कन्नूरकर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते.
प्रारंभी दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेला सर्व मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. पद्माकर कुलकर्णी पुढे बोलताना म्हणाले की "वृत्तपत्र लेखकांनी शहरातील प्रश्नांची उकल करत वाचकपत्रे लिहावीत. विविध वर्तमानपत्रांना भेटी द्याव्यात आणि संपादकांशी सुसंवाद साधून. वर्षाकाठी किमान एक तरी कार्यशाळा घ्यावी".
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वृत्तपत्र लेखक मंचचे सहकार्यवाह अरुण धुमाळ यांनी केले तर आभार कोषाध्यक्ष प्रा. अशोक म्हमाणे यांनी मानले. या समारंभाला वृत्तपत्र लेखक मंचाचे अध्यक्ष प्रेमचंद मेने, कार्याध्यक्ष फैय्याज शेख, सदस्य अशोक खानापुरे, ज्योती मेने, प्रांजली मोहीकर आदी मान्यवर उपस्थित होते.

